वसंता : त्या घरांत कोण रडते आहे ?

वेदपुरुष : मला आतां वेळ नाहीं, सारी घरें रडत आहेत. सारीं गरीब माणसें आक्तोश करीत आहेत. तेथें एक दारूड्या राहतो. तो दारू पिऊन आला म्हणजे बायकोला मारतो.

वसंता : बैलांना टोंचण्याची आरीची काठी त्याच्या हातांत आहे व त्या काठीनें पत्नीला तो टोंचीत आहे! काय हें क्रौर्य !

वेदपुरुष : ख्रिस्ती लोकांना वाटतें एक ख्रिस्त क्तॉसवर दिला गेला. परंतु घरोघर क्तॉस आहेत! बळी दुर्बळाला कॉसवर चढवीत आहेत.

वसंता : हा अडाणी दिसतो. म्हणून हा असा पशूसारखा वागत आहे.

वेदपुरुष : दारू ही प्रज्ञावंतालाहि पशु करील. दारू पिणारा सावध कसा राहील ? त्याला ताळ ना तंत्र, विवेक ना विनय ? या हिंदुस्थानांत दारूपायीं झालेला अनर्थ लेखणीनें लिहितां येणार नाहीं. हजारों महाभारतें भरतील लाखों आयाबहिणींची अब्रू दारूपायीं दरसाल हरघडीं धुळींत मिळविली जात आहे. सोशिक सत्तवशील बायका खेंटरें खात आहेत, काठ्या खात आहेत, अरीनें टोचून घेत आहेत! एका दारूडयानें पत्नीच्या डोक्यांत वरवंटा घातला, एकानें मुसळ घातलें, एकानें बायकोचा हात चुलींत घातला, एकानें तिला फटके मारले! दारू! केवढा कहर! लाखों सोन्याचे संसार मातीमोल झाले, दु:खाचे नरक झाले. या दारूपायीं घरंदाज बसले, कुलशीलवान कलंकित झाले. लक्षवधि ज्यांची इस्टेट, तें रस्त्यांत भीक मागूं लागले.

वसंता : खानदेशांत अंमळनेरजवळ एक गांव आहे. तेथें असाच एक मोठा जमीनदार होता. उंच घोड्यांच्या गाडींतून तो गावीं यायचा. गांवच्या दरवाजावर उभें राहून लोक त्याच्या येण्याची वाट पहायचे. तो पैसे उधळीत यायचा, गोरगरीब त्याला दुवा देत, त्या दिडक्या उचलून घेत. परंतु त्या उदाराला दारूचें व्यसन लागलें. त्याचें सारें सारें गेलें. मोठमोठ्या हवेल्या सावकारांच्या हातांत गेल्या. त्याच्याजवळ कांही राहिलें नाहीं. चिंधी लावून तो पायीं भटकायचा. एखादी बैलगाडी भेटली तर तो म्हणायचा, ''ए भाऊ, मला घेतोस रे जरा गाडींत! माझ्यानें चालवत नाहीं.'' त्याचे ते शब्द ऐकून शेतकरी रडत. गाडीवाले त्याला गाडींत घेत. वेदपुरुषा! आमच्या खानदेशांत या दारूनें सर्वनाश केला आहे! कोणत्याहि खेडयांत जा. तेथें प्रचंड हवेल्या कुलपें लावलेल्या, गहाण पडलेल्या आढळतील. इतिहास विचारला तर दारूचा प्रताप लोक सांगूं लागतात.

वेदपुरूष : परंतु कोण करतें दारू बंद ? एक वेळ शाळा नसली तरी चालेल, परंतु दारू आधीं हवी. गुत्ता आधीं हवा, माणसाला एकदां पशु बनविलें म्हणजे सारें काम संपलें. मग त्याच्यावर कायद्याचें राज्य चालविणें योग्यच ठरतें. हें दारूचें उत्पन्न म्हणे शिक्षणाकडे लावून दिलें आहे. एका हातानें ज्ञान द्या व दुसर्‍या हातानें दारू पाजून तें ज्ञान मातीमोल करा. सारा चावटपणा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel