'तुमचा मुरारी माझ्याशी खेळेल का ?'
'हो. तू बरी हो; मग खेळा हं दोघे.'
'हे काय शिवता ?'
'अंगातले.'
'कोणाला ?'
'तुला; कृपाकाकांनी हे गरम कापड आणले आहे. तुला पेटी हवी ना ?'
'छान आहे कापड !'
'तू आता बोलू नकोस.'
'बरे तर मग, पडून राहू डोळे मिटून ?'
'हो.'
मिरी शांतपणे पडून राहिली. थोडया वेळाने कृपाराम आला.
'कसे आहे यशोदाबाई, मिरीचे ?'
'शुध्दीत होती. लापशी दिली तिला. मग ती चांगले बोलत होती आता तिला बरे वाटेल, असे दिसत आहे चिन्ह.'
'तुम्हांलाही त्रास.'
'कृपाकाका, तुम्ही त्या मुलीला जवळ घेतलेत. आम्ही का इतकीशी मदतही करू नये तुम्हांला ? ही पेटी झालीच शिवून. ती जागी झाली म्हणजे तुम्ही तिला घाला. मी आता जाते हं !'
'जा, तुम्हांला आता घरचे काम आहे. मुरारी शाळेतून अजून आला नाही वाटते ? आज शनिवार ना ?'
'तो ड्रॉइंगच्या परीक्षेस बसणार आहे. त्यासाठी आणखी थांबावे लागते त्याला.'
'यशोदाबाई, तुम्हांला फार कष्ट पडतात. तुमचा मुरारी केव्हा एकदा मिळवू लागेल ते खरे.'
'कर्तव्य करीत राहायचे. तुमचे उदाहरण आमच्या डोळयांसमोर आहे. मी जाते. काही लागले सवरले तर तुम्ही सांगा. रात्री मुरारीही येईल जागायला, पहारा करायला. बरे का ? संकोच नका करू. नाही तर तुम्ही आणखी आजारी पडायचेत. दम्याचा झटका यायचा. जाते हं.'
'जा हं.'