'मुरारी !'

'काय ? स्पष्टपणे विचार.'


'तुला तुझ्या धन्याच्या त्या मुलीबरोबर मी पाहिले.'

'त्या गावी ना ? अग, तिचे वडील आजारी होते. त्यांनी मला तिला ताबडतोब आणण्यासाठी पाठवले. म्हणून मी तिकडे आलो. तिला त्या उपवनात गाठले.'

'मुरारी, लवकरच येईन.' ती म्हणाली. 'भेट होईल ना ?' तिने विचारले. 'तुझ्याशिवाय प्राण जाईल.' वगैरे शब्द मी ऐकले.'

'अग, तिच्या वडिलांना मी लवकरच येईन असा निरोप ती देत होती. वडिलांची भेट होईल ना ? असे ती दु:खाने विचारीत होती; तुझ्याशिवाय प्राण जाईल हे तिच्या पित्याचे शब्द मी तिला सांगत होतो. वा ! मिरे, तुम्ही बायका सुताने स्वर्गास जाणार्‍या आहांत. काही तरी अर्धवट ऐकायचे, मागचा पुढचा संदर्भ माहीत नसायचा आणि उगीच आकांत करायचा. काल मी किती आशेने तुझ्याकडे आलो. परंतु तू नाचली नाहीस. आनंदाने उचंबळली नाहीस. जणू सारे प्रेम नष्ट झाले आहे असे वाटले.'

'आणि तू तरी बोललास का ? जाताना शाल प्रेमाने दिली, तीही अंगावर घेतली नाहीस ? तशीच हातात घेऊन गेलास. खरे की नाही ?'

'मला वाटले मी पाठवलेली शाल तू परत करीत आहेस. मला वाईट वाटले. जणू माझे काही जवळ ठेवायचे नाही असे तू ठरवले असे मला वाटले.'

'तुझा पक्षी परत केला का ? तो गालिचा परत केला का ? तुझी पत्रे परत केली का ? ती तुझी पत्रे शंभरदा मी वाचीत बसते. ती पत्रे म्हणजे सारा खजिना.'

'पक्षी जिवंत आहे ?'

'हो. मिरे ये, मुरारी ये' असे म्हणतो. परंतु मुरारी कसा मिरीकडे येतो असे वाटले. काल त्या पाखराला जवळ घेऊन मी रडले. मुरारी, खरेच का तू माझा आहेस ?'

'आईच्या हया दहनभूमीवर मी तुझी प्रतारणा करीन का ? मिरी, तू माझी मिरी आहेस. तू माझे सर्वस्व आहेस.'

त्या दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले.

'माझ्याकडे बघ', ती म्हणाली.

ते कसले अश्रू होते ? सुखाचे की दु:खाचे ते अश्रू अनिर्वचनीय होते. त्या अश्रूंत एकमेकांचे सारे जीवन होते. ते एकमेकांना मिळत होते.

'मुरारी, काल तुला हॉटेलात कोणी भेटले ?'

'हो.'

'मुरारी, ते माझे वडील.'

'काय म्हणतेस. मिरे ?'

'आणि सुमित्राताईंचे ते प्रियकर.'

'तू काय काय तरी सांगत आहेस ?'

मिरीने मुरारीला ते पत्र वाचायला दिले. त्याने वाचले.

'करुणगंभीर जीवन.'

'चल आता घरी.'

'मी मागून येईन.'

'आता दूर नको राहूस.'

'कोण म्हणतो दूर राहायचे ? परंतु मला काम आहे. तिसर्‍या प्रहरी येईन.'

दोघे जात होती. बंगल्याजवळ दोघे आली.

'मुरारी वाटते ? कधी आलास ?' कोणी विचारले.

'मिरीचा प्राण आला.' दुसरे कोणी म्हणाले.

मिरी बंगल्यात गेली. मुरारी निघून गेला. मिरी सुमित्राताईंकडे आली.

'मिरे, कोठे गेली होतीस ?'

'समुद्रावर. मुरारीही भेटला. तो माझाच आहे. उगीच माझा गैरसमज झाला. आणि सुमित्राताई, तुम्हांला एक बातमी सांगू ? तुम्ही शांत चित्ताने ऐकाल ?'

'सांग बेटा.'

'शांताराम आले आहेत.'

'शांताराम, माझा शांताराम ?'

'होय, तुमचे शांताराम आणि या मिरीचे तेच जन्मदाते. तुम्ही शांतारामांच्या मुलीचे आजपर्यंत पालनपोषण केलेत.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel