काही दिवस गेले. एके दिवशी मिरी आत्याबाईकडे पुन्हा गेली. परंतु आत्याबाई देवाघरी गेल्या होत्या.

'तुम्ही आला होतात, त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्या गेल्या.' सून म्हणाली.

'तुम्हाला आता कोण ?' मिरीने विचारले.

'मी माझ्या मामीकडे जाईन. मोलमजुरी करीन. ते पुन्हा आले तर ठीक.'

'तुला मी काय मदत देऊ ?'

'सारे आभाळच कोसळले, तेथे किती मदत कराल ?'

'माझ्याजवळ फक्त पाच रुपये आहेत ते घे. सुखी राहा. बाळाचे नाव काय ?'

'अर्जुन.'

'सुंदर नाव.'

बाळाचा पापा घेऊन मिरी निघून गेली. ती घरी आली, तो तिला एक आश्चर्यकारक वस्तू दिसली. चिवचिव आवाज ऐकू आला. गोड किलबिल. काय होते तेथे ? एक सुंदर पिंजरा तेथे होता आणि त्यात एक सुंदर पक्षी होता.

'अय्या, किती छान ! कोणी दिला मुरारीच्या आई ?'

'तो आफ्रिकेतून आला आहे, मुरारीने तुला एक भेट पाठवली आहे. आणि ही लोकरीची सुंदर शालही त्याने तुला पाठवली आहे. मुरारी खुशाल आहे. त्या व्यापार्‍याच्या घरी या वस्तू आल्या. त्या सुमित्राताईकडे गेल्या. त्यांनी पुन्हा येथे पाठवल्या.'

'सुमित्राताई गेल्या नाहीत वाटते प्रवासाला ?'

'नाही. ही त्यांची चिठ्ठी आहे आणि हे मुरारीचे पत्र.'

मिरीने सुमित्राताईंची चिठ्ठी वाचली. काय होते तिच्यात ?

'प्रिय मिरीस सप्रेम आशीर्वाद.

आमचा सफरीचा बेत अकस्मात थांबला. बाबा जरा आजारी पडले. आता ते बरे आहेत. पुढे युरोपच्या सफरीवर जाऊ असे ते म्हणत आहेत. आज मुरारीकडून आलेल्या भेटीच्या वस्तू तुझ्याकडे पाठवीत आहे. सुंदर पक्षी ! जणू मुरारीच पक्ष्याचे रूप घेऊन आला आहे. तुझ्या प्रेमाच्या सुंदर पिंजर्‍यात नाचणारा मुरारी ! मिरे, तो पक्षी लहानसा आहे. परंतु 'मिरी मिरी' म्हणतो. मुरारीने त्याला एकच शब्द शिकवला आहे असे दिसते. तू त्याला दुसरा शब्द शिकव. आणि शालही किती मऊ मऊ आहे ! जणू मुरारीने आपल्या अश्रूंनी ती बनवली आहे. प्रेमळ स्मृती, नाजूक भावना ! किती तरी त्या शालीत आहे; नाही ?

मुरारीचे आजोबा बरे आहेत ना ? आई बरी आहे ना ? तू शुश्रूषेची प्रेमदेवता आहेस. मग काय कमी ? आनंदी राहा नि सर्वांना आनंद दे.'

ते पाखरू मला पाहता येईना. परंतु त्याच्या चोचीत पेरूची फोड दिली. शेजारच्या एका मैत्रिणीकडून हे पत्र- ही चिठ्ठी-लिहवून घेतली.

तुझी-
सुमित्राताई

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel