मिरी रडत घरी निघून गेली. ती शाळेत जाईनाशी झाली. कृपाकाकांनी खूप समजूत घालण्याची खटपट केली. परंतु मिरी ऐकेना. शेवटी सुमित्राबाईंनी मिरीला घरी बोलावले. त्यांनी तिची समजूत घातली. त्या म्हणाल्या, 'मी तुमच्या वर्गावरच्या बाईंना तसेच मुख्य बाईंना कळवले आहे. त्या मला ओळखतात. माझ्याकडून पुस्तके नेतात. तुला चिडवणार्‍या मुलींना त्या रागे भरल्याही. आता तू जा शाळेत. असे हट्टास पेटू नये.'

मिरी पुन्हा शाळेत जाऊ लागली. ती शरीराने वाढत होती. मनाने, बुध्दीने वाढत होती. कृपाकाकांना परम आनंद होत होता.

परंतु ते आजारी पडले. त्यांना संधिवाताचा फार मोठा झटका आला. मुरारीही चार दिवस रजा घेऊन सेवाशुश्रूषा करण्यासाठी आला. कृष्णचंद्र सुमित्राला घेऊन आले होते. सुमित्रा कृपाकाकांजवळ बसली होती. ती त्यांना म्हणाली, 'तुम्ही मिरीची काळजी करू नका. मिरीला मी माझ्याकडे नेईन, तुम्ही निश्चिंत राहा. माझ्याकडून होईल तेवढे तुमचे मी करीन.'

'आता मी सुखाने मरेन. मिरी मोठी गोड मुलगी आहे. किती झपाटयाने ती सुधारत आहे ! किती चांगली होत आहे. तिला किती समजते ! माझ्या जीवनात तिने किती आनंद ओतला !'

'तुम्ही अनेकांच्या जीवनात आनंद ओतला आहे. कृपाराम, तुम्ही आमच्याकडे काम करायला होतेत. तुम्हांला दुकानात काम करावे लागे. आणि ती पेटी तुमच्या अंगावर पडली. किती दिवस तुम्ही आजारी होतेत !'

'परंतु तुम्ही माझी काळजी घ्यायला लागलात आणि इतर काम मला होत नसे म्हणून वडिलांकडून ही म्युनिसिपालिटीची नोकरी मला देववलीत. तुमचे उपकार.'

'उपकार कसले, कृपाराम ? तुम्ही आमचे काम करताना मरणार होतेत. गोरगरिबांचे प्राण असे किती जात असतील. कारखान्यांतून अपघात होतात आणि मग थोडी नुकसानभरपाई देतात. परंतु गेलेले प्राण, त्यांची का किंमत होईल ? ज्यांचा मनुष्य मरतो, त्यांना काय वाटत असेल ? कृपाराम, तुमची प्रकृती त्या वेळेपासून नाजूक झाली होती. तुम्ही लग्नही केले नाही. कारण, केव्हा झटका येईल याचा नेम नव्हता. तुम्ही सर्वांजवळ गोड बोलायचे, गोड हसायचे, सर्वांना मदत करायचे. खरोखरच तुम्ही प्रकाश देणारे होतात. तुम्ही नुसते म्युनिसिपालिटीचे दिवेच लावीत नव्हता, तर अनेकांच्या हृदयांतही तुम्ही प्रेमस्नेहाचे, माणुसकीचे, उदारतेचे नंदादीप लावले आहेत. मंडईत जावे, सारे तुमची आठवण काढतात. काल मिरी गेली होती मंडईत, तर एकाने तुम्हांला आवडणारी भाजी दिली; दुसर्‍याने फळे दिली, तुमची आस्थेने चौकशी करीत. मिरी मला सारे सांगत होती. धन्य तुमचे जीवन !'

'सुमित्राबाई, तुम्हांला सारे चांगले दिसते. तुम्ही निराळे डोळे मिळविले आहेत. तुम्ही तर देवाच्या राज्यात वावरता. कोणाला वाईट कधी तुम्ही म्हटले आहे का ? तुमच्या जीवनात इतकी शांती, इतके समाधान, इतके निरपेक्ष प्रेम; हे सारे कोठून आले ? दुसरे कोणी आंधळे झाले असते तर आदळआपट केली असती. जगाला शिव्या देत तो राहिला असता. तुमची गोष्ट निराळी. आणि प्रकाशबाबू ! कोठे असतील ते ! तुम्ही एका शब्दानेही त्यांना नाव ठेवले नाही.'

'कृपाराम, नको त्यासंबंधी बोलणे, माझा प्रकाश माझ्याजवळ आहे. आंधळी असूनही मी इतकी आनंदी, शांत, प्रसन्न राहते ती का उगीच ? बाबांनी प्रकाशला घालवले. प्रकाशचे शरीर त्यांनी घालवले. प्रकाशचा तेजस्वी, मंगल आत्मा माझ्या हृदयमंदिरात आहे. त्याची प्रभाच माझ्या जीवनाला व्यापून आहे. बाबांना आता वाईट वाटते. प्रकाशवर त्यांनी केलेले आरोप खरे नव्हते, हे त्यांना मागून कळले. परंतु आता काय ? प्रकाश पृथ्वीवर असला तर सुखी असो. देवाघरी असला तर सुखी असेलच. प्रकाशशिवाय कोणाचीही मूर्ती माझ्या डोळयांसमोर कधी दिसू नये म्हणून का प्रभुराजाने माझे बाह्य डोळे नेले ?'

'सुमित्राताई, तुम्ही सर्व गोष्टींत चांगलेच पाहता. माझ्या मिरीला तुमची थोर संगती मिळेल. मिरी म्हणजे एक रत्‍न आहे. तुमच्या संगतीत या हिर्‍याला नीट पैलू पडतील. तिचे तेज अधिकच फाकेल. मिरीला तुमच्या पदरात मी घातले आहे. मी तुम्हांला बोलावणारच होतो. तुम्हीच आलात. जणू माझ्या मनाची वेदना तुम्हांला कळली.'



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel