'त्याचे आडनाव निराळे, माझे निराळे. आई एक परंतु घराणी निराळी. माझे बाबा शांतारामवर प्रेम करीत नसत. नाईलाज म्हणून त्यांनी त्याला घरात ठेवले होते. आपल्या पत्‍नीच्या पूर्वसंसाराची ती स्मृती त्यांना डोळयांसमोर नको असे. कोणी जर विचारले की हा कोण ? तर सांगत की, आहे असाच एक अनाथ मुलगा. त्याने फार शिकावे असे त्यांना वाटत नसे. परंतु माझ्या आईच्या आग्रहामुळे त्याला ते शिकवीत होते. शांतारामला कधीकधी ते मारीत. मग मी रडत असे. माझ्या आईला-म्हणजेच शांतारामच्याही- यामुळे वाईट वाटे.

'पुढे आमची आई आजारी पडली. ती देवाघरी जाणार असे दिसू लागले. एके दिवशी तिने शांतारामला व मला जवळ बोलावले. पूर्वीच्या पतीची अंगठी तिच्या बोटात होती. तिने ती शांतारामच्या बोटात घातली.

'तुझा पिता थोर होता. त्याच्या स्मृतीस काळिमा लावू नकोस. नीट वाग. कोणाच्या वस्तूला हात लावू नकोस. स्वाभिमान सोडू नकोस. सत्याची सेवा कर. सुमित्रा, तू नि शांताराम एकमेकांस अंतर देऊ नका, तुझ्या वडिलांचे शांतारामवर प्रेम नाही. परंतु तू त्याला प्रेम देत जा.' असे ती माऊली म्हणाली. आमच्या डोळयांतून अश्रू येत होते. ती माऊली देवाघरी गेली. माझी आई गेली. मी झाले तेव्हापासून ती आजारी होती. तरी बरीच वर्षे वाचली. शांताराम पोरका झाला. मी मातृहीन झाले. घरात एक स्वयंपाकीण बाई ठेवण्यात आली.

'माझ्या बाबांचे औषधांचे, रासायनिक वस्तूंचे दुकान होते. कृपाराम आमच्या दुकानातच कामाला होते. एकदा एक पेटी त्यांच्या अंगावर पडली. मरायचेच, परंतु वाचले. त्यांना शारीरिक शक्तीचे काम पुढे करता येत नसे. बाबांनी त्यांना म्युनिसिपालिटीचे दिवे लावण्याचे काम दिले. कृपारामांवर शांतारामाचे नि माझे प्रेम होते. ते आम्हांला गोष्टी सांगत.

'शांतारामचे शिक्षण बंद करण्यात आले, बाबांच्या दुकानातच तो काम करू लागला. जणू एखाद्या नोकराप्रमाणे बाबा त्याला वागवू लागले. त्याला वाईट वाटे. तो बुध्दिमान होता. खूप शिकावे असे त्याला वाटे. परंतु काय करणार ? मिरे, शांतारामावर मी प्रेम करीतच होते. तोही माझ्यावर करी. परंतु बाबांना ते आवडत नसे. आम्ही एकमेकांशी बोललेलेही त्यांना खपत नसे. ते संतापत, चिडत. आम्ही एकत्र बसणे, एकत्र फिरायला जाणे, काहीही त्यांना नको असे. त्यांनी मला तंबी दिली, धमकी दिली. परंतु आम्ही एकमेकांजवळ बोलल्याशिवाय राहात नसू.

'आमचे प्रेम वाढले. बाबांना ते दिसून आले. ते चडफडत. आम्ही दाद देत नसू.'

'सुमित्रा, तू येशील माझ्याबरोबर ? आपण येथून दूर जाऊ. आपण एकमेकांची होऊ, सुखाचा संसार करू.'

'शांताराम, परंतु बाबांना कोण ? तेही एकटे आहेत. आपण त्यांची मनधरणी करू. तेच आपले हात एकमेकांच्या हातात देतील. ते तुझे जन्मदाते नसले, तरी माझे आहेत. मुलीचे मनोरथ ते धुळीस मिळवणार नाहीत.'

'मला ते अशक्य दिसते.'

'असे आमचे एके दिवशी बोलणे चालले होते. तो बाबा आले. हातातील काठी त्यांनी उगारली. आम्ही एका टेबलाजवळ बसलेलो होतो.

'हरामखोर, कसल्या गोष्टी करतो आहेस ? शंभरदा सांगितले की, तू तिच्याजवळ बोलत जाऊ नकोस म्हणून, तरी लाज नाही तुला ? आणि येथे प्रेमचेष्टा करतोस आणि दुकानातले तिकडे पैसे खातोस ? पैशाची अफरातफर केलीस की नाही ? आज माझ्या दृष्टोत्पत्तीस सारे आले. हे पैसे घेऊन नि माझी मुलगी पळवून जाणार होतास, होय ना ? नीघ येथून.'

'मी पैसे खाल्ले ? काय म्हणता ?'
'होय. तू.'

'शांतारामला राग असह्य झाला. त्याने त्या टेबलावरची एक बाटली बाबांना मारण्यासाठी फेकली; परंतु ती बाबांच्या शेजारी असलेल्या मला लागली नि मी एकदम ओरडले. त्या बाटलीत ऍसिड होते. माझ्या डोळयांत ते उडाले. आगडोंब झाला. शांताराम दारातून निघून गेला होता आणि मी आंधळी झाले. बाबांनी पुष्कळ उपचार केले. परंतु डोळे जळून गेले. दृष्टी पुन्हा आली नाही.

'त्या दिवसापासून शांताराम माझ्या दृष्टीस पडला नाही. तो पुन्हा आला नाही. माझे डोळे गेले ते त्याला कळले असेल. आपण काय केले असे मनात येऊन तो परत आला नसेल. जे माझे सुंदर डोळे त्याला आवडायचे, जे माझे डोळे तो लहानपणी झाकायचा, तेच त्याच्या हातून न कळत नाहीसे केले गेले. परंतु त्याचा हेतू थोडाच तसा होता ? तो संतापला होता. जवळ होते ते बाबांकडे त्याने भिरकावले. ती बाटली मी आडवायला गेले. तो माझ्या डोळयांतच ती उपडी झाली. दोन्ही डोळे गेले. जणू शांताराम पुन्हा दिसायचा नव्हता म्हणून आधीच डोळे निघून गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel