'पुन्हाही असे म्हणशील का ? जगाचा तिरस्कार करशील का ?'
'अशक्य, अगदी अशक्य, आता जगाला मी नेहमी प्रेम देईन. कारण, या जगानेच मला आधार दिला. या जगाने मला प्रेम दिले. भरपूर प्रेम.'
'जगाने तुला प्रेम दिले ?'
'हो. कृपाकाकांनी दिले. मुरारीने दिले, सुमित्राताईंनी दिले. कृपाकाका एकटे होते. वृध्द होते, तरी त्यांनी या अनाथ मुलीला जवळ केले. आई ना बाप, बहीण ना भाऊ, अशी मी होते. परंतु त्या कृपाकाकांनी मला प्रेम दिले आणि मुरारी, त्याची आई यशोदा, यांनी मला प्रेम दिले. आणि या आंधळया सुमित्राताई ! कृपाकाका मेल्यावर सुमित्राताईंनी मला वाढविले. त्या स्वत: आंधळया आहेत. परंतु त्यांनीच मला कधी न जाणारा प्रकाश दिला. अमर श्रध्दा त्यांनी मला दिली. जगावर प्रेम करायला त्यांनीच मला शिकविले. मी पूर्वी किती दु:खी होते ! रोज मारहाण व्हायची, नीट खायला मिळायचे नाही. सारी ददात. मला त्या आठवणी येतात. परंतु त्यामुळेच हे मिळालेले प्रेम अधिक मौल्यवान वाटते.'
'जगाने तुला प्रेम दिले ? त्या आंधळीने तुला श्रध्दा दिली ?'
'हो. जगात ज्याप्रमाणे आपले आईबाप असतात, त्याप्रमाणे या सर्व विश्वाचा कोणी तरी मायबाप आहे असे मला वाटते. ज्या क्षणापासून या श्रध्देचा माझ्या जीवनात उदय झाला, त्या क्षणापासून मी निश्चिंत झाले, सुखी झाले.'
'तुला अलिकडे कधी दु:खकारक प्रसंगांना तोंड द्यावे लागले नाही ? तू का केवळ सुखी आहेस ?'
'तसे नाही. पुष्कळ कसोटीच्या प्रसंगांतून मीही जात आहे. मुरारीची आई गेली, मुरारीचेही बर्याच दिवसात पत्र नाही. कधीकधी मी एकटी रडतही बसते. कधीकधी अगदी सुनेसुने वाटते.'
'तरी तू अशी आनंदी कशी ? पाखरासारखी सुखी, उल्हासमूर्ती कशी ?'
'समोर मला गिळायला दु:खनिराशेची दरी आ वासून भेसूरपणे उभी राहिली, तरीही आशेच्या त्या अनंत आधारावर, अनादिकाळापासून सज्जनांनी ज्याचा आधार घेतला, त्या दयामय प्रभूच्या आधारावर मी उभी असते. त्या अनंत दयेवरची माझी श्रध्दा अभंगच असते. आणि त्या भयाण दरीतही मी हसतमुखाने उतरते.'
'तुला त्या मुरारीचे पत्र नाही ?'
'नाही.'
'तो एखाद्या वेळेस तुला फसवील.'
'नाही. तो फसवणार नाही.'
त्या दोघांचे असे बोलणे चालले होते तो डॉक्टर नि सुमित्राताई आली.
'देवाचे दर्शन घेतलेस का !' डॉक्टरांनी विचारले.
'तुमच्याशिवाय कसे घेऊ ? तुमच्याशिवाय देव कोण दाखवणार ?' मिरी म्हणाली.
'कोठे आहे देव ?' पाहुण्यांनी विचारले.
'तो वर तेथे.' डॉक्टर म्हणाले.
'देव अंतर्बाह्य सर्वत्रच आहे.' सुमित्रा म्हणाली.
तो पाहुणा आता मुका नव्हता. त्याला आता कंठ फुटला होता. तो एखाद्या मुलासारखा बोलू लागला. जणू त्याला नव्यानेच वाचा सापडली होती.
'डॉक्टर, तुमचे पाहुणे बोलू लागले.' सुमित्रा म्हणाली.
'डोंगरावरची, देवाजवळची, प्रेमळ, प्रसन्न हवा त्याला लागली आणि त्याची हृदयवीणा बोलू लागली. खरे ना मिरे ?' डॉक्टर म्हणाले.
'डॉक्टर, तुम्ही कवीही आहात वाटते ?' पाहुण्याने प्रश्न केला.
'धंदा कोणताही असो, मनुष्य जर कवी नसेल तर त्याचा धंदा यशस्वी होणार नाही. कवी म्हणजे दुसर्याविषयी सहानुभूती असणे. दुसर्यांच्या भावना ओळखणे. सुखदु:खे, गरजा ओळखणे. क्रांतिकारक हे सर्वांत मोठे कवी असतात. कारण, कोट्यवधी दीनदरिद्री जनतेच्या हृदयाशी ते एकरूप झालेले असतात.' डॉक्टरांनी प्रवचन दिले.