'मिरे, हे सारे जीवन असेच आहे. जगात काही केवळ फुले नाहीत. काटेही आहेत. सुख आहे, संकटे आहेत. प्रकाश आहे नि अंधारही आहे. पदोपदी कसोटीचे प्रसंग आहेत.'

'कठीण आहे हे जग. कठीण आहे का संसार.'

'अशा जगातच आपणास सुख पिकवायचे आहे. दगडधोंडे दूर करून, गवत दूर करून मनुष्य सोन्यासारखे धान्य पिकवितो, त्याप्रमाणे संसारातही दु:खक्लेश बाजूला सारून आनंद निर्माण करायचा असतो.'

'सोपे नाही हे करणे.'

'श्रध्दा असली म्हणजे कठीण नाही. या सर्व धडपडीतून शेवटी मांगल्याची प्राप्ती होईल, अशा आशेने उद्योग करीत राहायचे. त्या प्रभूचा हात शेवटी मागे आहे. तो वरदहस्त ज्याला दिसतो, त्याला तो दु:ख-निराशेतही मदत करतो. मिरे, तू नेहमी आशेने राहा. आनंदी राहा.'

सुमित्राताईंनी मिरीच्या केसांवरुन हात फिरविला. दोघीजणी मुक्या होत्या. थोडया वेळाने मिरी उठून गेली. स्वयंपाकीणबाईला मदत करायला खाली निघून गेली.

असे दिवस जात होते. परंतु सुमित्राताई एकाएकी आजारी पडल्या. मिरी तिची सेवाशुश्रूषा करीत होती. परंतु एके दिवशी मिरीच्या कानांवर पुढील संवाद आला. सुमित्राचे वडील कृष्णचंद्र जेवत होते. मिरीचे जेवण झाले होते. ती बागेत जरा फिरायला गेली होती. फिरून आली तो ते शब्द तिने ऐकले.

'या मिरीला ताईच्या खोलीत जाऊ देऊ नका. सारखी तेथे बडबड करीत असते आणि जवळ असली म्हणजे ताईही बोलत राहते. मिरीला सांगा तुम्ही.' स्वयंपाकीणबाई सांगत होती.

'परंतु मिरीशिवाय ताईला तर करमत नाही.' कृष्णचंद्र म्हणाले.

'न करमायला काय झाले ? इतके दिवस का मिरीच होती ? मी आहे. गडीमाणसे आहेत. त्या मिरीला चार दिवस जाऊ दे त्या यशोदाबाईंकडे.'

मिरीच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. सुमित्राताईंची किती प्रेमाने, भक्तीने ती सेवाशुश्रूषा करीत होती. तिच्या कोमल मनावर तो वज्राघात होता. तिच्या डोळयांतून पाणी आले आणि त्या दिवसापासून मिरी सुमित्राताईच्या खोलीत जाईनाशी झाली. ती शाळेत जाई. तिचे लक्ष लागत नसे. ती बागेत फिरे, तिचे लक्ष लागत नसे. ती बागेतील फुलांना कुरवाळीत बसे. घरात येऊन ती कामधाम करी. मोलकरणीला भांडी घासायला मदत करी.'

'मिरे, तू कशाला भांडी घासतेस ? तू का मोलकरीण आहेस ? राहू देत ती.' कृष्णचंद्र त्या दिवशी म्हणाले.

'मी मोलकरीणच आहे. गरिबाच्या घरात मी वाढले. एका गरीबानेच पुढे मला आधार दिला आणि हल्ली भांडीही पुष्कळ असतात. सुमित्राताईंच्या खोलीत जाऊन त्यांची शुश्रूषा करता येत नाही. परंतु त्यांची भांडी तरी लख्ख घासू दे. तेवढेच मला समाधान. मोलकरणीबरोबर काम करण्यात मला काही कमीपणा वाटत नाही. माझा मुरारी एका मोलकरणीचाच मुलगा आहे. गरिबांना, कष्ट करणार्‍यांना मी तुच्छ मानू लागले तर मुरारीलाही तुच्छ मानावे लागेल. यशोदाआईंना तुच्छ मानावे लागेल. देवाघरी गेलेल्या कृपाकाकांना तुच्छ मानावे लागेल. घासू द्या मला भांडी. सुमित्राताईंचे आता बरे आहे ना ?'

'मिरे, तुला असे बोलायला कोणी शिकविले ? कोण तुझा गुरू ?'


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel