या तीन बहिणी त्या बंगल्यात आल्या. त्याचप्रमाणे एक नवीन तरुण मनुष्यही ओळख काढून त्या बंगल्यात वरच्यावर येऊ लागला. त्या तरुणाचे नाव रमाकांत.

एके दिवशी दिवाणखान्यात मडी, लडी, प्रेमा, राणीसरकार सारी बसली होती. मिरी सुमित्राताईंना काही तरी वाचून दाखवीत होती. इतक्यात ते रमाकांत शीळ घालीत आले. डोक्यास साहेबी टोपी होती. एक लांडा सदरा नि लांडी तुमान घालून ते आले होते. हातात रिस्टवॉच होते. बोटात अंगठी होती. तोंडात सुंदर सिगरेट होती. नाकाजवळ थोडी मिशी होती. असे रमाकांत आले.

'या रमाकांत, तुमची आम्ही वाटच पाहात होतो. माझ्या वडिलांच्या फर्ममध्ये तुम्ही बंगलोरला होतात. जवळचेच नाते. किती दिवस राहणार इकडे ?'

'माझी लहर आहे. हा सुंदर मुलूख पाहायला आलो. कोणी ओळखीचे नाही. परंतु आमची ओळख निघाली. कुणकूण कळल्यावर आलो तुमच्याकडे. करमेनासे झाले की तुमच्याकडे येतो.'

'आपण खेळू या.' लडी म्हणाली.

'पाच जणेच ?' मडी म्हणाली.


'तुमची चौथी बहीण कुठे आहे ?' रमाकांत म्हणाले.

'ती मिरी ? ती का आमची बहीण ? ती एक निराधार मुलगी आहे. सुमित्राताईंची ती जणू मोलकरीण' मडी म्हणाली.

'तिला बोलवा ना ?' रमाकांतांनी सांगितले.

'मी बोलावते.' प्रेमा म्हणाली.

प्रेमाने शेवटी मिरीला आणले.

'बसा मिराबेन.' रमाकांत म्हणाला.

'कोण कोण भिडू ? मिरी आमच्याकडे नको.' लडी म्हणाली.

'मिरी माझ्याकडे.' तो रमाकांत एकदम बोलला. आपण एकदम मिरीला एकेरी नावाने संबोधले म्हणून तो जरा चपापला. शरमला.

'माफ करा हां मिराबेन.' तो लज्जारक्त होऊन म्हणाला. शेवटी प्रेमा, मिरी नि रमाकांत एका बाजूला झाली आणि राणीसरकार नि त्या दोन छबेल्या एका बाजूला. खेळ रंगला. मडी, लडी यांच्यावरच सारखी पिसणी राहत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel