'येईल पत्र. काळजी नका करू. तुम्हांला बरे का नाही वाटत ? तुम्ही वाळल्यात.'

'मिरे, हल्ली मुरारीचे आजोबा कसे तरी वागतात. एखाद्या वेळी घराबाहेर पडतात. कोठे लांब जाऊन बसतात. घरी येत नाहीत. मी शोधायला जाते. कसे तरी करून त्यांना घरी आणते. वाटेतच हट्ट धरून उभे राहातात. लोक हसतात. घरी नीट खात नाहीत. रात्री अंथरुणात बसूनच राहातात. कसे करू मी ?'

'तुमच्याकडे मी येऊन राहू का ?'

'परंतु सुमित्राबाईंची सेवा कोण करील ? ती एक देवता आहे. त्यांचे सुखदु:ख तूच ओळखशील. तेथेच राहा.'

'येथल्या शाळेत कदाचित मला नोकरी मिळणार आहे. तसे झाले तर मला येथे यावेच लागेल. आणि कोठे दुसरीकडी बिर्‍हाड करण्यापेक्षा तुमच्याकडेच राहीन. एकटी कोठे राहू ? मला तुमचा आधार होईल.


'तसे असेल तर ये राहायला. तू का मला परकी आहेस ? जसा मुरारी, तशी तू. मनात किती मनोरथ आहेत ? आज कशाला बोलून दाखवू मिरे ? तू सुखी हो.'

'मी जाते हां आज !'

असे म्हणून मिरी गेली आणि खरेच ती एका शिक्षणसंस्थेत गेली. त्या संस्थेच्या चालकांना भेटली. त्यांना एका स्त्री-शिक्षिकेची जरुरीच होती. बोलणे झाले.

'तुम्ही अर्ज करा. लगेच तुम्हांला घेऊ.' चालक म्हणाले.

'मी आभारी आहे.' मिरी म्हणाली. नमस्कार करून, काही सामान घेऊन गाडीतून ती परत निघाली. नाना प्रकारचे विचार करीत ती जात होती. लंकेला जाण्याचे तिला रहित करावे लागणार होते. सुमित्राताईबरोबर मग कोण जाणार ? कृष्णचंद्र काय म्हणतील ? मी कृतघ्न आहे असे त्यांना वाटेल का ? अनेक विचार मनात येत होते. शेवटी गाडी घरी आली. मिरी फारसे बोलली नाही. कृष्णचंद्र कोठे बाहेर गेले होते.

'मिरे, आज तुझी गोड गुणगुण ऐकू येत नाही ती ? यशोदाआईकडे सारे क्षेम आहे ना ? मुरारीचे पत्र आले का ?'

'यशोदाआई काळजीत आहेत. मुरारीच्या आजोबांचे लक्षण नीट नाही. ते भ्रमिष्टासारखे वागतात. यशोदाआईंना कोणाची तरी मदत हवी. मी त्यांच्याकडे जायचे ठरवीत आहे. एका शाळेत मला नोकरी मिळत आहे. ती नोकरी करीन. यशोदाआईंकडे राहीन.'

'नोकरी कशाला करतेस ?'

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel