निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेच तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनार्‍याला आली. सुमित्राताईंना हात धरून उतरवण्यात आले. थोडयाशा पाण्यातून मंडळी तीरावर आली. ती खाडी होती. दोन्ही तीरांवर दाट झाडी होती. नारळाची बने होती. जवळच शिवालय होते. आपले यात्रेकरू तेथे जाणार होते. तीरावरल्या एका धर्मशाळेत त्यांनी आपले सामान ठेवले. तेथल्या खानावळवाल्यास जेवणाचे सांगून डोंगर चढायला मंडळी लागली. तो अपरिचित मनुष्य झपाझप चढत पुढे गेला. मिरीही वेगाने पुढे जात होती. डॉक्टर नि सुमित्राताई हळूहळू येत होती. मिरी मध्येच उभी राही नि सभोवतालचे सृष्टिसौंदर्य बघे. किती तरी गलबते दूर दिसत होती. त्यांची पांढरी शिडे फडफडत होती. जणू हंसपक्षीच क्रीडा करीत होते. दूरच्या खडकांवर लाटा आपटताना दिसत. कोटयवधी तुषार उडत. त्या खडकांच्या ठिकर्‍या उडविण्यासाठी संतापून संतापून जणू त्या लाटा येत. आपल्या गतीला विरोध करणार्‍या त्या खडकांचा चक्काचूर करावा असे त्यांना वाटे. परंतु त्यांचा चुरा होई. आणि दुरून हिरवी निळी दिसणारी ती झाडे. पलीकडची काही डोंगरशिखरे, आकाशाला भिडायला गेलेली. मिरी बघत राही. परंतु पुन्हा भानावर येई नि पळे. त्या पाहुण्याला आपण गाठू असे तिला वाटे. परंतु तो पाहुणा कधीच वर निघून गेला होता. मिरीला भीती वाटू लागली. आता किर्र झाडीतून रस्ता होता. तिला शीळ ऐकू आली. ती घाबरली. कोणाची ती शीळ ? ती पाखरांची होती. समुद्रकाठचे मत्स्याहारी पक्षी. किती गोड त्यांची ती शीळ असते. त्यांची शीळ ऐकून म्हणे मासे भुलतात व पाण्यात जरा वर येतात, की हे पक्षी त्यांना पटकन् मटकावतात.

मिरी एकदाची चढण चढून वर आली. आता वर सपाटी होती. तिने आजूबाजूला बघितले. ते शिवालय आता जवळ होते. इतक्यात एक दगड उशाला घेऊन झोपी गेलेला तो पाहुणा तिला दिसता. ती त्वरेने तेथे आली. त्या पाहुण्याच्या तोंडाकडे ती पाहात होती. निद्रेतही त्याचे तोंड चिंतातूर दिसत होते.

'नाही. मी नाही. मी असे करीन ? माझ्या हृदयात तू आहेस. दुर्दैव !'

असे काही तरी झोपेत तो बडबडला. तो कुशीवर वळला. मिरीला त्याची करुणा वाटली. हा का दु:खीकष्टी जीव आहे ? त्याच्या जीवनात का निराशा आहे ? अंधार आहे ? त्याच्याविषयी तिला सहानुभूती वाटू लागली. तो पाहा एक लहान हिरवा किडा. गवतातला किडा. त्या पाहुण्याच्या कपाळावर तो चढला. किडयातूनच उत्क्रांत झालेल्या मानवाच्या कपाळावर तो प्रेमाने सहल करीत होता. मिरी खाली वाकली. तिने हलकेच त्या किडयाला उचलून दूर फेकले.

'हे माझे जीवन नको. मला कशाला कोण जवळ करील ? माझी असून माझी नाहीत. अरेरे !'

तो पुन्हा बडबडला. तो पाहा आणखी एक किडा आणि तो एक मुंगळा ! मिरी पुन्हा खाली वाकली. तिने त्या जिवांना हाकलले. परंतु तिच्या डोळयांतील दोन अश्रू त्याच्या मुखावर पडले. तो एकदम जागा झाला. त्याने आपले डोळे उघडले. मिरीच्या मोठया डोळयांकडे तो पाहत राहिला. त्याने तिचा हात पकडला. मुंगळयाला दूर करणारा हात.

'बाळ, तू का रडतेस ? तुझ्या डोळयांत हे पाणी का ? तू का माझ्यासाठी रडत होतीस ? माझी तुला माहिती आहे ? असे एखाद्या परक्यासाठी रडू नये. का बरे रडलीस ?'

'तुमची सचिंत मुद्रा बघून, तुमचे अस्फुट शब्द ऐकून. तुम्ही दु:खी आहांत.'

'तुला काही स्वत:ची दु:खे नाहीत ? दुसर्‍यासाठी आणखी कशाला रडायचे ?'

'मला स्वत:ची दु:खे नसती तर मी दुसर्‍यासाठी रडले नसते. मी स्वत:साठी रडले आहे. म्हणून तर दुसर्‍यासाठी अश्रू येतात. जो स्वत: दु:खातून गेला नाही, त्याला दुसर्‍याच्या दु:खाची कल्पना कशी येणार ?'

'तू सुखी आहेस का ?'

'होय.'

'तू का आपली दु:खे विसरलीस ? भूतकाळातील दु:खांची तुला आता आठवण नाही का ?'

'मी माझा भूतकाळ विसरले नाही. तो विसरू शकणारही नाही.'

'तरी तू सुखी आहेस ?'

'होय.'

'मग ती तुझी दु:खे पोरकट असतील. लहानपणाच्या लुटूपुटूच्या खेळांप्रमाणे, भातुकलीच्या खेळातील सुखदु:खांप्रमाणे. तू अद्याप मूल आहेस. लहान आहेस.'

'मी लहान कधीच नव्हते. दु:खामुळे लहान मुले अकाली प्रौढ होतात.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel