'तू मला शिकव. तुझी आई शिकवील.'
'आता फार बोलू नकोस तू.'
'मी डोळे मिटून पडते. तू म्हण गाणे.'
'कोणते गाणे ?'
'मघा म्हणत होतास. मी ऐकत होते. आणि देवाला प्रार्थना केलीस; होय ना ?'
'हो.'
'कुठे असतो हा देव ?'
'वर आकाशात. बोलू नकोस. मी म्हणतो अभंग. आजोबांनी शिकविलेला अभंग. कृपाकाकांचा आवडता अभंग.
“शुध्द बीजापोटी
फळे रसाळ गोमटी
मुखी अमृताची वाणी
देह देवाचे कारणी
सर्वांगे निर्मळ
चित्त जैसे गंगाजळ
तुका म्हणे याती
हो का तयाची भलती.'
मुरारी वयाने फार मोठा नव्हता. परंतु किती तन्मयतेने त्याने तो अभंग म्हटला ! कृपाकाकांच्या संगतीने त्याच्या बालहृदयात भक्तीचे बीज रुजले होते. मुरारी म्हणजे एक रत्न होते.
मिरी झोपली होती. मुरारी अभ्यासाचे पुस्तक आणून तेथे वाचीत बसला होता. काम आटोपून कृपाकाका आले. शिडी ठेवल्याचा आवाज आला. आपला नगरकंदील खुंटीला ठेवून ते आत आले.
'मुरारी, उशीर झाला मला.'
'कृपाकाका, घाम आला होता मिरीला. मी तो नीट पुसला. आणि मी थोडी कढत कॉफी तिला दिली आणून. आता पुन्हा ती झोपली आहे.'
'ताप निघणार आज. तुमची सर्वांची मला किती मदत होते ! नाही तर मी एकटयाने काय केले असते ?'
'कृपाकाका, तुम्ही एकटे नाही. किती तरी तुमच्यावर प्रेम करतात. तुम्ही जगमित्र आहात ! मी जातो हं.'