'आई, नाना असे गं काय वागतात ? त्यांना जगात कोणी चांगले दिसतच नाही ! मी इतके दिवस ऐकून घेत असे. परंतु आज मिरीविषयीच वाटेल ते बोलले. मला राग आला. मिरी का त्या बंगल्यात राहून बिघडेल ? तिला का बंगल्यात राहायची हौस होती ? ती खोली सोडून जाताना ती रडली नाही का ? म्हणाले ; मिरी कोणाची मुलगी ! असू दे कोणाची. सारी माणसेच आहेत. कोण आहे श्रेष्ठ, कोण आहे कनिष्ठ ? सारे मातीतून आले नि मातीतच जाणार ! जो कृपाकाकांसारखा वागेल तो खरा श्रेष्ठ, तो खरा देवमाणूस.'

'मुरारी, नाना असे बोलतात म्हणून रागावू नकोस. त्यांच्या मनात वाईट नसते. परंतु त्यांच्या जीवनात निराशा फार असल्यामुळे ते असे बोलतात. अरे, मी त्यांची सर्वांत मोठी मुलगी. तू झालास नि तुझे वडील वारले. आपली मुलगी विधवा झालेली पाहून कोणा बापाला वाईट नाही वाटणार ? माझ्या पाठची माझी बहीण होती. कर्ज काढून चांगल्या स्थळी त्यांनी तिला दिली. परंतु नवरा पुढे दारुडया झाला. तो बायकोचे हाल करी. शेवटी तिने जीव दिला. नानांनी एका मित्राला अडचणीत पैसे दिले. त्या मित्राने पुढे फसविले. नानांचे घरदार गेले. जे जे चांगले म्हणून ते करायला गेलो, त्यातून त्यांना वाईटच अनुभव आले. म्हणून ते निराश झालेले आहेत. त्यांना कोणाचा विश्वास नाही वाटत. कशाचा भरंवसा नाही वाटत. तुझ्यावर त्यांचे किती प्रेम आहे ! तुझी कोणी स्तुती केली की, त्यांना किती आनंद होतो ! परंतु पुन्हा तेच म्हणतील, 'काय होणार आहे त्याच्या हातून ? चैनी होईल, नाहीतर शेणातल्या किडयांप्रमाणे बसेल कोपर्‍यात. पराक्रम नाही व्हायचा त्याच्या हातून.' मुरारी, पाठीमागचे त्यांचे सारे आयुष्य कसे गेले ते लक्षात आणून त्यांच्या बोलण्या-चालण्याकडे आपण पाहिले पाहिजे. त्यांच्यावर न रागावता त्यांची कीव करायला हवी, आपण अधिकच चांगले होऊन त्यांची श्रध्दा पुन्हा जिवंत होईल आणि मागल्यावरचा त्यांचा विश्वास पुन्हा येईल असे केले पाहिजे. समजलास ना ? मुरारी, वरवर पाहून जगात चालत नाही बाळ.'

इतक्यात गाणे गुणगुणत मिरी आली.

'किती उशीर मिरे !' मुरारी म्हणाला.

'आज मायलेकांना पोटभर बोलू दे म्हटले.'

'चल, चावट आहेस ! आई, आम्ही फिरायला जाऊ का ?'

'जा. परंतु फार नका उशीर करू परत यायला. आज मिरी येथेच जेवून जाईल.'

'वा छान !'

'नको यशोदाआई.'

'जेवल्याशिवाय नाही हो जायचे आज.'

ती दोघे फिरत फिरत गेली.

'मुरारी, आज समुद्रावर जाऊ. बंदरावर.'

'तिकडे घाण असते, नि गडबड असते.'

'मग कोठे जायचे ? टेकडी तर लांब आहे.'

'टेकडीवरच जाऊ. आज मला पुष्कळ बोलायचे आहे तुझ्याजवळ.'

'काय रे बोलायचे आहे ? मी का एवढी मोठी आहे माझ्याजवळ पुष्कळ बोलायला ?'

'मोठयांच्या संगतीत तर राहतेस ना ? मिरे, माझी नोकरी सुटणार आहे. पुढे काय करायचे ? पुन्हा का आईवर ओझे घालू ? मला वाटते कोठे दूर जावे. आपले दैव उदयास येते का पाहावे. काम करीन, कष्ट करीन, परंतु कोणाचा तरी आधार हवा. आज मी खूप निराश आहे मनात. गरिबाला कोठे आधार नसतो. मिरे, मी का हुशार नाही ? परंतु पुढे यायला थोडा वाव लागतो. कोणीतरी हाताशी धरावे लागते. जाऊ निघून दूर ?'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel