'घर बघून ठेवीन.'

'आताच चलं आमच्याबरोबर.'

ती तिघे निघाली. एका बंगल्यात शिरली. लहानसा टुमदार तो बंगला होता. सभोवती बाग होती. कृष्णचंद्रांनी सुमित्राला तिच्या खोलीत नेले. खोली स्वच्छ होती.

'मिरे, बस, ये माझ्याजवळ.' सुमित्रा म्हणाली. कृष्णचंद्रांनी मिरीला खाऊ आणून दिला. ती तेथे सारे बघत होती.

'ही किती पुस्तके ! ही कोण वाचते ?'

'मी वाचीत असे पूर्वी, जेव्हा डोळे होते तेव्हा. आता बाबा वाचून दाखवतात. नवीन चांगले पुस्तक दिसले की ते घेऊन येतात. तू शीक वाचायला लवकर. मग तू ही पुस्तके वाचशील.'

'मला येतील का वाचता ?'

'माणसाच्या मनात असले म्हणजे त्याला सारे येते.'

'मी शिकेन. खूप शिकेन. मुरारी म्हणतो की खूप शीक.'

'जा आता घरी. वाट पाहतील.'

'मी फुले नेऊ ? कृपाकाकांना देईन. ध्रुवनारायणांच्या चित्राला घालीन माळ करून.'

'आणि तुझ्या केसात नको का लबाडे ? मी घालीत असे माझ्या केसात !'

'तुमच्या केसात घालू का मी ?'

'आता नको. मी का लहान आहे ? तू घाल हो तुझ्या केसात. ने तोडून. कशात नेशील ? बाबा तिला रुमाल द्या एखादा.'
मिरी एका सुंदर रुमालात फुले घेऊन घरी गेली. तिने यशोदाआईंना ती फुले दाखविली.

'सुमित्राताई फार मायाळू आहेत.' त्या म्हणाल्या.

'त्यांच्या घरी कोण करते काम ?'

'त्यांच्या घरी एक आजीबाई आहे. ती सारे करते. ती जणू त्यांच्या घरातलीच झाली आहे. कृष्णचंद्रांचे मुलीवर फार प्रेम. बिचारी आंधळी आहे; परंतु आमच्यापेक्षा तीच डोळस आहे. तिला सर्वत्र देवाचे राज्य दिसते.'

'देवाचे राज्य ?'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel