कृष्णचंद्रांचे वय जवळजवळ साठ वर्षांचे होत आले होते. सुमित्राची आई वारल्यापासून ते आज इतकी वर्षे अविवाहित राहिले. सुमित्राचेच वय आता जवळजवळ पस्तीस-छत्तीस वर्षांचे होते. इतकी वर्षे अविवाहित राहून, विधुरावस्थेत राहून आता उतार-वयात त्यांनी एकाएकी का बरे हा पुनर्विवाह केला ? का त्यांची ही एक लहर होती ? का त्या विधवा स्त्रीला नि यांना दोघांनाही उतार-वयात कोणाचा आधार हवा होता ? सुमित्रा आजारी असे, ती गेली तर आपणांस कोणीच नाही. असे का त्या वृध्दाच्या मनात आले ? काही असो. तर्क करण्यात अर्थ नाही. कृष्णचंद्रांचा हा पुनर्विवाह म्हणजे सर्वांना एक आश्चर्याचा विषय झाला होता.

गडीमाणसे शहरातील घराची झाडलोट करीत होती. सुमित्राताई, मिरी, आजीबाई सारी खेडयातून आपल्या घरी राहायला येणार होती. तयारी झाली. एके दिवशी सारी मंडळी पुन्हा शहरात आली. घराची, बागेची साफसफाई झाली. घराला नवीन रंग देण्यात आला. आपल्या यजमानांची नि नव्या यजमानिणीची ते सुसज्ज घर वाट बघत होते.

एके दिवशी कृष्णचंद्र आले. त्यांची नव पत्‍नीही आली. मिरी सामोरी गेली. गडीमाणसे धावली. किती तरी सामान होते. ट्रंका, चामडयाच्या पेटया, गाद्या, करंडया ! किती सामान !

'ही मिरी बरे का ?' कृष्णचंद्रांनी मिरीची ओळख करून दिली.

परंतु नव पत्‍नीने तिरस्कारसूचक हास्य केले. ती एक शब्दही बोलली नाही. ती इकडेतिकडे बघत घरात शिरली. तिथल्या एका आरामखुर्चीत ती बसली.

'चहा सांगा आधी.' ती म्हणाली.

'मिरे, चहा कर जा. आजीबाईंना चांगला नाही करता येणार. तू कर. जा.'

मिरी गेली, तिने चहाचे आधण ठेवले. कृष्णचंद्रांनी सुमित्राला हात धरून खाली आणले.

'ही माझी आंधळी सुमित्रा. माझा प्राण.' ते म्हणाले. सुमित्राने हात जोडून जरा वाकून प्रणाम केला.

'मुळीच नाही दिसत वाटते ?' नवीन आईने विचारले.

'मुळीच नाही.' पिता म्हणाला.

'परावलंबी जिणे. सारे दुसर्‍याला करायला हवे. आज फारच उकडते आहे. नाही ? अद्याप तुमच्या शहरात वीज नाही वाटते ? मागासलेलेच दिसते गाव. पंखा तरी द्या एखादा. हुश्श्य ! नकोसा जीव होत आहे.'

'मिरे, अग मिरे !'

'काय बाबा ?'

'पंखा दे बरे बेटा आणून.'

मिरीने पंखा आणून दिला. कृष्णचंद्र नव्या राणीला वारा घालू लागले.

'जरा जोराने तरी घाला. मी काही नाजूक राणी नाही; उडून नाही जाणार. द्या, इकडे तो पंखा. तुम्हांला वारासुध्दा घालता येत नाही.'

'शिकवायला कोणी नव्हते गेली वीस वर्षे, तुम्ही आता शिकवा.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel