'म्हणणार. त्या भिकार्‍यांनी का तिला शिक्षण दिले असते ? ज्ञानाचे डोळे दिले असते ?

'बाबा, त्या गरिबांविषयी तुम्ही अनुदार बोलू नका. ज्ञानाचा डोळा कर्तव्याचा पंथ दिसावा म्हणून असतो. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. परंतु मी त्यांची कधी गणती करीत बसत नसे. प्रेमामुळे मी तुमच्याकडे राहात असे. तुमच्या पैशांमुळे नाही.'

'वात्रटपणाने बोलू नकोस. पैशांशिवाय जगात काही चालत नाही. तो भिकारडा मुरारी. आफ्रिकेतून तुला त्याने काय पाठवले ? पाठवले पैसे ?'

'मी पैशाची पूजा करणारी नाही ?'

'तू कृतघ्न आहेस. तुला घरातल्याप्रमाणे वागवले. तुला शिक्षण दिले. त्या शिक्षणाच्या जोरावरच आज जात आहेस. म्हणे नोकरी करीन. शिक्षण दिले म्हणून ना ?'

'बाबा, आपण तिला शिक्षण दिले ते यासाठीच ना की, तिने स्वावलंबी व्हावे ? ती दुसर्‍याच्या दयेवर अवलंबून राहावी असे का तुम्हांला वाटते ?’

'तुम्ही काही कोणी बोलू नका. जग कृतघ्न आहे.' असे म्हणून कृष्णचंद्र गेले. कशीबशी जेवणे झाली. अंगणात खाटेवर सारी पुन्हा बसली. वरती तारे चमचम करीत होते. जवळ गोठयात गाय शांतपणे रवंथ करीत होती. वासरू पाय जवळ घेऊन झोपले होते.

'बाबा, वर्तमानपत्रे दाखवू वाचून ?'

'मी वाचीन. तू नको वाचून दाखवायला. तू जा. चालती हो. बघू कशी एकटी राहतेस ते. माझ्याशिवाय तुला कोणाचा आधार आहे ? तो भिकारडा मुरारी. त्याचा आधार ? तो कशाला इकडे येतो ! राहील तिकडेच. बनेल साहेब, करीन लग्न, मांडील संसार. येथे राहा वा जा. माझ्याशी पुन्हा बोलू नकोस. कशी एकटी राहतेस बघू.'

'बाबा, तुमच्या आजपर्यंतच्या आधाराबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन. परंतु त्या आधाराने तुम्ही मला पंगू बनवू पाहात असाल, मिंधी बनवू पाहात असाल तर त्या आधारापासून दूर राहायला मला शिकू द्या. त्या विश्वंभराचा आधार सर्वांना आहे. लहान किडयामुंग्यांनाही जो आधार देतो, तो मला देईल. तुम्ही दिलेल्या आधाराचा तुम्हांस अहंकार नको. मी निराधारही राहू शकेन. एकटी राहू शकेन. माझा मुरारी येईल. आणि समजा, तो न आला, तरीही मी धैर्याने राहीन. त्याची, तुम्हा सर्वांची, कृपाकाकांची स्मृती मनात ठेवून कृतघ्न न होता मी विशाल जगात स्वावलंबनाने जगेन, सुमित्राताई, तुम्ही आशीर्वाद द्या. बाबा तुम्हीही द्या.'

'मग काय तू जाणार ?' कृष्णचंद्रांनी कठोरपणाने विचारले.

'हो गेले हे पाहिजेच. ते कर्तव्य पहिले. ते मला हाक मारीत आहे. तुमच्या सहानुभूतीचा त्याग करावा लागेल. तुमचे स्नेहप्रेम मला गमवावे लागले तरीही मी गेले पाहिजे. पहिले कर्तव्य प्रथम.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel