तसे नाही, परंतु माझे डोळे चांगले नाहीत. आत्याबाई नेहमी नावे ठेवायची.'
'कोण आत्याबाई ?'
'ती मला मारणारी; माझे मांजरीचे पिलू उकळत्या पाण्यात टाकणारी; मला घरातून घालवून देणारी.'
'तू का ती मिरी ? कृपारामांनी आणलेली ती का तू ?'
'हो. तुमच्या ओळखीचे आहेत कृपाकाका ?'
'हो; तू बरी आहेस आता ?'
'आता बरी आहे मी. घरात काम करते.'
'तू शाळेत जातेस का ? आता शाळा उघडतील. मी कृपाकाकांना सांगितले आहे. शीक. वाचायला शिकलीस की माझ्याकडे येत जा. छानछान पुस्तके देईन. ती मला वाचून दाखव. शहाणी हो.'
'तुमचे घर कोठे आहे ?'
'कृपाकाका दाखवतील.'
'तुमचे डोळे नाहीत. किती वाईट गोष्ट. डोळे हवेत.'
'परंतु नाहीत त्याला काय करायचे ? परंतु देवाने मला आत डोळे दिले आहेत. तेथे सारे चांगलेच दिसते. तुझी आत्याबाईसुध्दा तेथे मला चांगली दिसते.'
'ती दुष्ट आत्याबाई. मी परवा मुरारीबरोबर जात होते. तो सायंकाळ झाली नि आत्याबाईंचे घर आले. मुरारी पुढे गेला. मी एक दगड घेऊन आत्याबाईंच्या खिडकीवर मारला; नि पळून आले.'
'मी ऐकले होते.'
'कोणी सांगितले तुम्हांला ? कृपाकाकांनी ?'
'हो, असे नको पुन्हा करूस ? तुला आई-बाप नाहीत. आत्याबाईंनी बरे-वाईट का होईना, तुला इतके दिवस सांभाळले. खरे ना ? आणि ते पिलू त्यांनी रागाने फेकले. ते चुकून त्या पाण्यात पडले. मुद्दाम फेकले असेल का ?'