'मिरे, मी आफ्रिकेत जायचे ठरवीत आहे. आईची चिंता वाटते. पाच वर्षे तरी मी येणार नाही. लांबचा प्रवास; एकदम थोडेच येता येणार आहे ? आजोबा तर थकल्यासारखे दिसतात. परंतु तेही मला म्हणाले की, जा, आपण भेटू. मी काही मरणार नाही. तू येईपर्यंत मी जिवंत राहीन. काय करू ते सांग.'

'मुरारी, तुझ्या आईने जरी आपण होऊन तुला आग्रहपूर्वक जायला सांगितले, तरी मनात तिला दु:खच होत असेल. तू तिच्या जिवाचे जीवन आहेस. तू तिच्या जीवनाचा आधार आहेस. तिच्या सार्‍या आशाआकांक्षा तुझ्यापाशी केंद्रित झालेल्या आहेत. तिला तुझा अभिमान वाटतो. तिला तुझा विश्वास वाटतो. तू कीर्तिमान व्हावेस, मोठे व्हावेस असे तिला साहजिकच वाटते. आपल्या मुलाचे नाव सर्वांच्या ओठांवर नाचावे याहून मातेला दुसरा थोर आनंद कोणता आहे ? परंतु तू गेलास तर ती माऊली तुझ्या वाटेकडेच डोळे लावून असणार यात शंका नाही. मी काय सांगू ? मी एवढेच सांगते तुला की, तू गेलास तर तुझ्या आईची, तुझ्या आजोबांची मी शक्य ती काळजी घेईन. तुझ्या ठायी मी त्यांना होईन. नाही तरी मी का आता तुम्हांला परकी आहे ? एक निराधार मुलगी होते मी. कृपाकाकांनी हे पंखहीन पिलू उचलून आणले. तू, तुझी आई, दोघांनी मला प्रेम दिले आहे. मी का ते विसरेन मुरारी ? मला किती तरी वाटते तुम्हा सर्वांविषयी. ते बोलून तरी दाखवता येईल का ?'

'मिरे, मी आफ्रिकेत जायला धजत आहे तो कोणाच्या जोरावर ? आईला, आजोबांना मी सोडून गेलो असतो का ? परंतु तू आहेस म्हणूनच मी जायचे ठरवीत आहे. मिरे, तूच नेहमी पत्र पाठवीत जा. आईला, आजोबांना लिहिता थोडेच येते ? माझी आलेली पत्रे तूच त्यांना वाचून दाखवीत जा. त्यांना आनंद देत जा. त्यांचे दुखले खुपले पाहात जा. माझी सारी भिस्त तुझ्या या प्रेमळ, प्रामाणिक, टपोर्‍या डोळयांवर. मिरे, मी का अधिक सांगायला पाहिजे ? आपण दोघे एकरूप आहोत. तू माझी नि मी तुझा. नाही का ? पाच वर्षे. केवढा काळ ! परंतु हा काळ जाईल. आपण पुढे एकमेकांची होऊ; लग्न करू; सुखाचा संसार करू; आईला, आजोबांना सुख देऊ. तू धीराने राहशील ना ?'

'मुरारी, तू माझ्या हृदयात आहेस. माझ्या जीवनाचा तू धनी, तू स्वामी. माझ्या जीवनाचा तू राजा, तू नाथ. माझ्या त्या पहिल्या आजारीपणात तू माझी शुश्रूषा केलीस. मला कॉफी पाजलीस. मला ते सारे आठवते. तू लिहायला शिकवलेस; नीट वागायला शिकवलेस; देवाची भक्ती दिलीस. तू आणि सुमित्राताई यांचे किती उपकार ?'

'परंतु आम्हांला तरी हा दिवा कोणी दाखवला ? कृपाकाका हे आपणा सर्वांचे गुरु ! त्यांचे जीवन म्हणजे एक मार्गदर्शक दीपस्तंभ होता.'

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel