'लोक व्यवहारी आहेत. त्या व्यापार्याची एकुलती मुलगी. नि तुमच्यावर त्याचे प्रेम आहे.'
'त्यांचे प्रेम असून काय उपयोग ?'
'तिचेही असेल तर ?'
'परंतु तिच्याशी काय करावयाचे आहे ? माझे लग्न कधीचे ठरले आहे. माझ्या आईने ते मनात लावून ठेवले होते. आई जरी जगात नसली, तरी तिची पवित्र इच्छा का मी मोडू ?'
'परंतु आईने जिच्याशी तुमचे लग्न व्हावे असे मनात इच्छिले, तिच्यावर तुमचे प्रेम आहे का, तिचे तुमच्यावर आहे का ?'
'आमचे एकमेकांवर प्रेम होते, आहे.'
'त्या मुलीचे नाव काय ? ती का श्रीमंतीची आहे ?'
'गरीब आहे.'
'अशा भिकारणीशी का तुम्ही लग्न करणार ? वेडेच आहात तुम्ही. तुमच्या धन्याची मुलगी तुम्हांला मिळेल. प्रयत्न करा. घरजावई व्हाल. जगात पैसा ही महत्त्वाची वस्तू आहे. प्रेमाने पोट भरत नाही. चढता संसार चालवता येत नाही. तुमची आई जिवंत नाही ना ? प्रश्नच मिटला.'
'तुम्ही कोण आहात ? मी पैशाचा पुजारी नाही. मी अशी माणसे पाहिली आहेत की, जी गरीब असूनही हृदयाने श्रीमंत होती. खरी संपत्ती हृदयाची. मी उदार भावनांची पूजा करायला शिकलो आहे. आणि आज इतकी वर्षे जी माझ्या हृदयात आहे, तिला का टाकू ? मला ते शक्यच नाही.'
'तुम्ही तुमच्या हृदयदेवतेकडे अद्याप गेला नाही ?'
'जाईन. दिवे लागल्यावर आज जाईन.'
'त्या मुलीचे नाव सांगा.'
'मिरी.'
तो पाहुणा उठून गेला.
सायंकाळ झाली होती. आकाशात आज ढग आले होते.
पाऊस येणार की काय ? पावसाळयाचे दिवस आलेच होते. वाराही सुटला होता. फिरायला गेलेले लोक भरभर घराला परतत होते. मिरी गॅलरीत उभी होती. तो कोणी तरी अंगणात आले असे तिने पाहिले. ती थरथरली. ती एकदम खाली गेली. तिने दार उघडले. मुरारी आत आला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. तेथे एका खुर्चीवर मुरारी बसला. तीही बसली.
'बरी आहेस ?' त्याने विचारले.
'तू बरा आहेस ना ?' तिने प्रश्न केला.
मिरी खाली तोंड करून बसली होती. कोणीच बोलेना. बाहेर पाऊस पडत होता. विजाही चमचम करीत होत्या. सुमित्रा वरती खुर्चीत पडून होती. प्रेमा बाहेर गेली होती. कृष्णचंद्र वाचनालयात गेले होते. आजीबाई घरात स्वयंपाक करीत होत्या. तेथे दिवाणखान्यात मिरी नि मुरारी दोघेच होती. याचे माझ्यावर प्रेम नाही, असे ती मनात म्हणत होती. हिचे माझ्यावर प्रेम नाही, असे तो मनात म्हणत होता.
'जातो मी.' तो म्हणाला.
'बाहेर पाऊस आहे; थांब.' ती म्हणाली.