'तुम्हाला वेदना अनुभवल्याशिवाय मातृप्रेमाचा आनंद उपभोगायला हवा आहे. खरा आनंद, खरे वात्सल्य तुम्हांला अनुभवता येणार नाही. इतर मातांनी प्रसूतिवेदना अनुभवाव्या, मुलांना लहानाचे मोठे करावे, आणि मग ती मुले तुम्ही वाढवणार ! मला हे कसेसेच वाटते. ही कमालीची स्वार्थी दृष्टी असे मला वाटते. रागावू नका.'

'आंधळे, तू माझे रूप पहातीस तर असे म्हणतीस ना. अशा कुरूप स्त्रीशी कोण लग्न करणार ? कसा ती संसार मांडणार ? उपदेश करणे सोपे आहे. थांब मी उतरतेच.'

ती लठ्ठ बाई खाली उतरली. गाडी जात होती. अंधार पडू लागला.

'मिरे, खरेच मी चूक केली. एखाद्या वेळी आपणच फार शहाणी असा माणसांना नकळत गर्व असतो. आंधळी, खरेच मी आंधळी.'

'परंतु नकळत एक थोर विचार तुमच्या तोंडून ऐकला. मला नवीन दृष्टी मिळाली. परंतु सुमित्राताई, ज्यांना एखाद्या ध्येयाशी लग्न लावायचे आहे, त्या अविवाहित राहिल्या तर ?

'मी अपवादात्मक गोष्टी सोडून द्यायला तयार आहे.'

गाडी अंगणात आली.

'किती उशीर, मिरे ?' कृष्णचंद्र म्हणाले.

रात्री जेवणे झाली. अंगणात खाटा टाकून सारी बसली होती. दूर कोल्हे ओरडत होते. मिरी त्यांना वेडावीत होती.

'मिरे, आता तू लहान का आहेस ?' कृष्णचंद्र म्हणाले.
'मी का फार मोठी आहे ?' ती हसून म्हणाली.

'सुमित्रा, माझ्या मनात एक विचार आला आहे. आपण दूरचे सुखपर्यटन करून येऊ. लंकेत जाऊ. लंका फार सुंदर आहे. हिंदुस्थानच्या चरणाशी बसलेली सोन्याची लंका. सुंदर समुद्र, सुंदर निसर्ग. नारळांची बने, रमणीय डोंगर. निसर्गाची संपत्ती तिकडे उधळलेली आहे. निसर्गाच्या सौंदर्याचे सोने सर्वत्र आहे. जायचे का ?'

'जाऊ; परंतु मिरी बरोबर हवी.'

'ती येईलच. तुला सोडून ती कशी राहील ? मी तिला येऊ नको म्हटले तरी ती आधी निघेल. खरे ना मिरे ?'

'हो.'

आणि खरोखरच प्रवासाची तयारी होऊ लागली. एके दिवशी मिरी यशोदाआईंना भेटायला गेली. बरेच दिवसांत ती गेली नव्हती. मुरारीचे पत्रही बरेच दिवसात आले नव्हते. मुरारीच्या घरी चिंता होती. त्याचे आजोबा जरा वेडसर झाले होते. यशोदाआईही कृश झाल्या होत्या.

'मिरे, बरी आहेस ना ? सुमित्राताई बर्‍या आहेत ? मुरारीचे पत्र नाही ना ? किती लांब गेला !'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel