'सुमित्राताई, कामाची सवय का वाईट ? या कामाचा अभ्यास होईल. धोबीकामात तरबेज होईन. मिळालेले ज्ञान काही फुकट नाही जात आणि तुमचे काम करण्यात मला आनंद असतो. चला फिरायला.' मिरीने हात धरून सुमित्राला नेले. बागेत दोघी फिरत होत्या. दोघींचा उदार संवाद चालला होता.

रस्त्यावर म्युनिसिपालिटीचे दिवे लागले. एकदम मिरीचे लक्ष गेले.

'सुमित्राताई, रस्त्यांतले दिवे लागत आहेत. कृपाकाका रोज दिवे लावीत जावयाचे, खांद्यावर शिडी, हातात कंदील ! मी लहानपणापासून त्यांना बघत असे. सुंदर काम. नाही का ?'

'प्रकाश देणे, सर्वत्र प्रकाश पसरविणे याहून अधिक पवित्र, अधिक चांगले असे दुसरे काय आहे?'

'आपल्या गावात आता वीज येणार आहे म्हणतात. मग सर्वत्र विजेचे दिवे होतील. नको शिडी घेऊन जायला. बटन दाबले की सर्वत्र प्रकाश. गंमत होईल, नाही ? कृपाकाका परत आले तर चकित होतील, म्हणतील सारी नवीन दुनिया. आपल्या शहरात किती बदल होत आहेत ! बंदर मोठे झाले. कारखाने वाढत आहेत. कॉलेज होणार म्हणे. जग झपाटयाने बदलत आहे.'

'क्षणाक्षणाला वस्तुमात्रात बदल होत असतो. आपणही सारखे बदलत आहोत. तुझ्यात किती बदल झाले, माझ्यात किती झाला, खरे ना ?'

'सृष्टीचा कायदाच आहे की बदला नाही तर मरा. होय ना ? झाडांची जुनी पाने गळतात, नवीन येतात. नदीचे जुने पाणी जाते. नवीन येते. आपण थंडी आली तर गरम कपडे घालतो. उन्हाळा आला तर पातळ वापरतो. थंडीत गरम पेय पितो. उन्हाळयात थंड सरबत घेतो. काळाप्रमाणे बदल करावा लागतो.

'परंतु कधीकधी माणसे काळाप्रमाणे बदलायला तयार होत नाहीत. मग समाजात उत्पात होतात. क्रांत्या होतात. ऋतुमानाप्रमाणे खाण्यापिण्यात, कपडयालत्त्यांत बदल करतो. परंतु आपल्या विचारांत, आचारांत, कल्पनांत बदल करायला, नवीन दृष्टी घ्यायला तो तयार नसतो, सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे विचारात बदल होणे. जीवनाची नवनवीन दृष्टी येणे. आपण विश्ववंद्य विभूतींना युगपुरुष म्हणत असतो. श्रीकृष्ण युगपुरुष होते. भगवान बुध्द युगपुरुष होते. याचा अर्थ हाच की, त्या त्या युगाला अनुरूप धर्म अनुरूप आचार-विचार, अनुरूप नवदृष्टी त्यांनी दिली. नेहमी जुने तुणतुणे वाजविणे वेडेपणा आहे.'

'चला आता आत जाऊ. गार वाटते जरा, नाही ?'
'चला, जाऊ ?'

वरती गॅलरीत जाऊन दोघीजणी बसल्या. तो तिकडून प्रेमा नि रमाकांत रस्त्यातून येताना दिसली. दोघे अंगणातील फाटकाशी उभी होती. शेवटी रमाकांत गेला. प्रेमा आत आली. ती एकटीच वर गच्चीत जाऊन बसली.

मिरीने खाली जाऊन जेवणाची तयारी केली. आजीबाईंना तीच मदत करी, सारी जेवायला बसली. सुमित्राताई अलीकडे सायंकाळी जेवत नसत. थोडे दूध घेत. जेवताना विनोद चालला होता; थट्टा चालली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel