मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठया व्यापार्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापार्याने त्याला भेटीला बोलावले होते. घरात तो काहीच बोलला नाही. नीटनेटका पोशाख करुन तो त्या व्यापार्याकडे गेला. प्रश्नोत्तरे झाली.
'पुढे-मागे परदेशात जाल का ? चारपाच वर्षेसुध्दा तिकडे राहावे लागेल.'
'मी घरी आईला विचारून कळवितो.'
'तुम्ही जावे असे मला वाटते. तुमच्याविषयी माझा फार चांगला ग्रह झाला आहे.'
'तुम्हांला माझा पत्ता कोणी दिला ?'
'तुम्ही एका बाईला रस्त्यात मदत केली होतीत ?'
'हो.'
'त्याच बाईंनी तुमचे नाव सहज सुचवले नि पत्ताही दिला.'
'मी जाऊ ?'
'मग उद्यापासून कामाला याच. परदेशात जायचे की नाही ते मागावून ठरवू.'
'येतो तर. प्रणाम.'
मुरारी घरी आला. त्याने आईला सारी हकीगत सांगितली.
'आई, तुम्हांला सोडून जाणे जीवावर येते.'
'अरे, चार-पाच वर्षे हां हां म्हणता जातील. तुझ्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने विचार नको का करायला ? मी आणि नाना येथे दोघे जपून राहू. तू माझे ऐक. आलेली संधी दवडू नकोस. आधीच गरिबांना संधी मिळत नाही. खरे ना ? तुझ्या गुणांमुळे तुझ्यावर तो व्यापारी प्रसन्न झाला आहे.'
'आई, पुढे-मागे त्याच्या धंद्यात तो थोडी भागीदारीसुध्दा मला देईल. अशा अर्थाचे तो थोडे काही बोलला. परंतु मी आधी काही कर्तबगारी दाखवायला हवी.'
'त्याचे म्हणणे खरे आहे. तुझी हुशारी दिसली तर तो भागीदारी देईलही. बाळ, तू जा. आमच्या मोहात पडू नकोस.'
'आई, सेवेसाठी राहणे हा का मोह ? आणि परदेशात जायचे मनात येत असले तरी ते तुझ्यासाठीच. तू माझ्यासाठीच आजपर्यंत किती कष्ट केलेस ! तुला विश्रांती मिळाली नाही. नेहमी राब राब राबावे लागले.'
'मुरारी, आईला मुलासाठी कष्ट करण्यात कठीण नाही वाटत. तू मोठा हो, चांगला हो, हीच माझी आशा. सर्वांनी तुला भले म्हणावे, तू कर्तबगारी करून पुढे यावेस असे मला वाटत असते. म्हणून बाळ, ही संधी दवडू नकोस.'
काही दिवस गेले. मुरारी त्या व्यापार्याकडे नोकरी करू लागला होता. हळूहळू त्याच्यावर धन्याचा अधिकाधिक लोभ बसू लागला. परदेशात मुरारीने जावे म्हणून तो आग्रह करू लागला. एके दिवशी रात्री मिरी नि मुरारी समुद्रतीरी बसली होती. त्या वेळेस सारं शांत होते. जरा बाजूला जाऊन दोघे बसली होती. समुद्र बराच आत गेला होता.