'मी तुला माझ्याकडे ये म्हणणार होतो. तू मला मुलीसारखीच आहेस. मी तुला थोडीथोडी वैद्यकी शिकवीन, तुझ्या सेवामय जीवनात ती विद्या तुला उपयोगी पडेल. येतेस माझ्याकडे?'
'नको डॉक्टर; सुमित्राताईंचे वडील म्हणतील की पुन्हा कोणाच्या तरी आधारावरच राहिली. तुमच्या प्रेमाची मी आभारी आहे. मला अशीच तुमची मुलगी माना. परंतु वसतिगृहात राहू द्या. मुलीही मला आग्रह करताहेत.'
'जशी तुझी इच्छा. केव्हाही माझ्याकडे येत जा. तुझेच घर समज.'
'तुमचे घर तर विश्वासाचे आहे. तुम्ही एकटे, परंतु सार्या जगाचे झाला आहात. धन्य तुमचे परोपकारी जीवन. प्रेमळ सेवामय जीवन. निरहंकारी, नि:स्वार्थ जीवन. तुम्ही, सुमित्राताई, कृपाकाका म्हणजेच देवाची रूपे. या जगाला थोडी गोडी, मधुरता तुम्हासारख्यांमुळे येते. या संसाराला शोभा, रमणीयता, तुमच्यासारख्यांमुळे आहे. या संसारवनातील तुम्ही कल्पवृक्ष, या मरुभूमीतील तुम्ही अखंड झरे. डॉक्टर तुमचे पाय धरावे असे नेहमी मनात येते. गरिबांकडे तुम्ही आधी जाता. कोणत्या बोळात, कोणत्या अंधार्या खोलीत, कोण अनाथ आजारी आहे, याची तुम्हांला माहिती. तिकडे तुमची पावले आधी वळतात. तुमचे पाय थकत नाहीत. तुम्हाला मोटर लागत नाही आणि घरात वेळ मिळेल तेव्हा ब्रेड नि दूध घेता. हा तुमचा आहार. धन्य तुम्ही !'
'मिरे, चल आता जाऊ.'
दोघे निघाली. डॉक्टर दवाखान्यात गेले. मिरी झोपडीत आली. तिने सामानाची आवराआवर केली. काही वस्तू प्रेमस्मृती म्हणून तिने ट्रंकेत भरल्या. पुष्कळसे सामान तिने गरिबांना दिले आणि शेवटी पिंजर्याजवळ येऊन उभी राहिली.
'राजा, चला आता येथून.' ती त्याला म्हणाली. परंतु राजा आज रडवेला होता. तो नाचला नाही. तो शांत, स्तब्ध होता. जणू ध्यानस्थ मुनी.
मिरी वसतिगृहात राहायला आली. मुली तिच्याभोवती गोळा झाल्या. जणू नवप्रकाश आला, नवजीवन आले, असे त्या लहानमोठया मुलींना वाटले. श्रीमंतांच्या मुलींनी कपाळाला आठया पाडल्या. एकदोन डोळे मिचकावीत गेल्या. चालायचेच असे. बहुरत्न वसुंधरा !
मिरी त्या मुलींमध्ये मिसळली, एकरूप झाली. ती कोणाचे केस विंचरी, कोणा लहान मुलीच्या केसांत फुले घाली. ती त्यांच्यात हसे, खेळे, उडया मारी. ती त्यांना सुंदर पुस्तके वाचायला देई. अडलेले सांगे, कोणी मुलगी आजारी पडली तर तिची शुश्रूषा करायला ती पुढे असे. प्रार्थनेच्या वेळी ती कधी प्रार्थना सांगे. कधी मुलींना समुद्रावर पोहायला नेई. तेथले सारे जीवनच नवे बनले.