'असे तुला वाटते का ?'
'काय सांगू ? एखादे वेळेस वाटते की, मिरीला कोणी राहणार नाही. कृपाकाकांनाही अलिकडे बरे नसते. त्यांचे सांधे दुखतात. तरी त्यांना काम करावे लागते. ते परवा यशोदाआईजवळ काय म्हणाले माहीत आहे का ?'
'काय म्हणाले ?'
'मी फार दिवस वाचणार नाही. या मिरीचे कसे होईल ? असे ते म्हणाले. माझ्या कानी पडले.'
'कृपाकाका एवढयात नाही जाणार सोडून.'
'तुझ्या देवाला माहीत.'
'माझा देव तुझाही आहे, सर्वांचा आहे.'
'माझे कोणी नाही.'
'मिरे, असे का म्हणतेस ? तुला आत्याने घराबाहेर घालवले. तुला कृपाकाका मिळाले. मी आहे. आई आहे. सुमित्राताई आहेत. कृष्णचंद्र आहेत. जमनी आहे. किती मित्र !'
'परंतु देवाने दिले, तोच पुन्हा नेईल !'
'तो एक नेईल तर दुसरे दहा देईल. त्याची दया अनंत आहे. चल, आपण भराभर जाऊ.'
'मुरारी, ते बघ कृपाकाकाचा जात आहेत. आपण त्यांचे ओझे घेऊ.' दोघे धावत गेली.
'काय ग मिरे ?'
'तुमची शिडी मी घेते. आणा.'
'उचलेल का तरी ? वेडी आहेस तू. नाही तर मलाच घे कडेवर. घेतेस ?'
'इश्श ! हे काय कृपाकाका ?'
'मग ही शिडी कशी घेशील ?'
'मी म्हणजे मुरारी घेईल.'
'अस्से ! आपले नाव आणि मुरारीला काम ?'
'मी कंदील घेते. आणा.'
मुरारीने खरेच शिडी घेतली. मिरीने कंदील घेतला. तिघे हसत-खेळत घरी आली.
आणि दुसर्या दिवशी मुरारी त्या नोकरीवर गेला. मिरीही आता शाळेत जाऊ लागली. तिला समजूत आली होती. ती वर्गात पहिली असे. श्रीमंतांच्या मुली तिला हसत. एकदा तर काही मुली तिच्या पाठीस लागल्या. 'म्युनिसिपालिटीचे दिवे लावणार्याची मुलगी ' असे म्हणून तिला हिणवीत होत्या.
'दिवे लावणारा वाईट वाटते ?' तिने विचारले.
'आता तूही उद्या दिवे लाव.' मुली मोठयाने हसून म्हणाल्या.