'मुरारी आहे.'

'तू पाहिले होतेस मला येताना.'

'नाही काही. परंतु अशा खोडया तुझ्याशिवाय कोण दुसरे करणार ? माझे मोठे डोळे तुला कुस्करून टाकायचे असतील !'

'फुले कोणी कुस्करते का ? का त्यांना कुरवाळतात ?'

'एवढया जोराने डोळे धरणे हे तुझे कुरवाळणे वाटते ? आणि तू आलास का ? दोन दिवसांत एकदा तरी आलास का ? मिरी तुझ्यासाठी रडत होती.'

'मला जा म्हणतेस आणि आलो नाही तर पुन्हा रडतेस ? विचित्रच आहेस तू.'

'असू दे जा. मी वाईटच आहे. तू कशाला आलास ?'

'मिरे, उद्यापासून मी एका ठिकाणी नोकरी धरली आहे. आता फक्त शनिवारी रात्री येईन, रविवारचा दिवस राहीन. पुन्हा सोमवारी उजाडत जाईन. दर आठवडयास असेच. आता वरच्यावर मी भेटणार नाही. दररोज भांडायला नाही. म्हणून आज आलो. चल, आपण फिरायला जाऊ.'

'चल, बाजारपेठेतून जाऊ.'

दोघे फिरायला गेली. मुरारी मिरीला सारे दाखवीत होता. बाजारपेठेत मोठमोठी दुकाने होती. मोठमोठे बंगले होते. तो पहा एक बंगला. तो सुंदर दिवाणखाना. आत हंडया आहेत. झुंबरे आहेत. सुंदर दिवे आहेत. आणि त्या पाहा दोनतीन मुली. त्यांची जरीची पातळे. अंगावर दागिने ! मिरी बघतच राहिली.

'काय बघतेस, मिरे ? ते घर तुला का आवडले ?'

'केवढे घर ! हंडया-झुंबरे. त्या मुली बघ. जरीची पातळे !'

'तुला हवे का जरीचे पातळ !'

'कोण देईल मला ! कृपाकाका गरीब आहेत आणि सगळयांनाच मिळतील जरीची पातळे ?'

'मी देईन तुला पातळ. जरीचे पातळ. मी मोठा होईन.'

'मोठा होऊन काय करशील ?'

'आईला विश्रांती देईन. तिला चांगली लुगडी घेईन. आजोबा मग घरीच बसतील. त्यांना म्हातारपणी मग श्रम नकोत आणि तुला पाहिजे असेल ते देईन.'

'आणखी काय करशील ?'

'मी मोठा होईन आणि जवळ असेल ते सर्वांना देईन. गरिबांचा मित्र होईन. कृपाकाकांचा कित्ता गिरवीन.'

'कधी होशील तू मोठा ? तुला त्या ठिकाणी किती मिळणार पगार ?'

'जेवून-खाऊन पंधरा रुपये.'

'फक्त पंधराच ? आणि दिवसभर तेथे राबायचे !'

'आरंभी असेच असते. मला अनुभव मिळेल. नदी उगमाशी किती लहान असते. तीच पुढे केवढी होते !'

'मुरारी, तू मोठा झाल्यावर मला विसरशील.'



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel