मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना.

'सुमित्रा, कधी होणार तू बरी ?'

'बाबा, तुम्ही एकटेच युरोपच्या यात्रेला जा. एवढा दूरचा प्रवास माझ्याच्याने झेपणार नाही. आणि खरेच, मी बरी तरी केव्हा होणार ? किती तरी दिवसांपासून तुम्हांला कोठे तरी दूरच्या प्रवासाला जाण्याची इच्छा आहे. मागे लंकेकडे जाणार होतो. तेही जमले नाही. आता युरोपात जायचे आपण ठरवीत आहोत. परंतु अजून मला नीट शक्ती येत नाही. तुम्ही या ना जाऊन. मला बरे वाटल्यावर इकडेच कुठे तरी जवळपास जाऊन येऊ. घारापुरीची लेणी पाहू; जुहूला जाऊ. परंतु तुम्ही या युरोपला जाऊन.'

'मिरे, खरेच जाऊ का ? तू सुमित्राचे सारे नीट करशील ? सुमित्रा म्हणजे माझा प्राण आहे.'
'मी सारे करीन.'

एके दिवशी कृष्णचंद्र युरोपच्या प्रवासाला निघाले. प्रथम ते कोलंबोस जाऊन लंकेतील निसर्गसौंदर्य पाहून मग तेथून युरोपची बोट घेणार होते. गडीमाणसांना काम वगैरे सांगून ते गेले. घरात आता सुमित्रा, मिरी नि आजीबाई. सुखासमाधानात वेळ जात होता. मिरी मुरारीच्या पत्राची वाट पहात होती. आजोबा, आई यांच्या शोककारक निधनाचे पत्र तिने पाठविले होते. परंतु मुरारीचे उत्तर येईना. तो रागावला असेल का, निराश होईल का ? अनेक विचार मिरीच्या मनात येत. मायेचे आता इकडे कोणी उरलेले नाही म्हणून तो येणारही नाही कदाचित, अशी शंका क्षणभर तिच्या मनात डोकावे. परंतु मी नाही का मायेची, असे मनात येऊन ती स्वत:ला धीर देई. वाट पाहता पाहता एके दिवशी मुरारीचे पत्र आले. फार सुंदर होते ते पत्र.

'प्रियतम मिरा,

हृदय विदीर्ण करणारे तुझे पत्र मिळाले. ज्या गोष्टीला मी भीत होतो ती गोष्ट शेवटी झाली. मी आईला सुखी करीन ही माझी लहानपणापासूनची इच्छा धुळीस मिळाली. आजोबा मुरारी, मुरारी हाक मारीत समुद्रावर बसत. आजोबांचे इतके प्रेम माझ्यावर असेल असे मला वाटत नव्हते. त्यांचे अप्रकट प्रेम त्यांना आतून पोखरी; विध्द करी, तुला ते पूर्वी नावे ठेवीत. परंतु शेवटी तुझेच फक्त ते ऐकत. माझ्या नावाचा त्यांना तू घास देत होतीस. मिरे, शेवटी त्या दोघांची सेवा तुझ्या हातून व्हावयाची होती. तुझ्या हातांना ते पुण्य लाभावयाचे होते. कृपाकाकांनी तुला आणले ते का आम्हा सर्वांना तुझा आधार मिळावा म्हणून ? त्या काळी तू निराधार म्हणून आलीस. आज तू आधारदेवता झाली आहेस. आजोबा गेले आणि लगेच आई गेली. प्रेममूर्ती आई, माझ्यासाठी सदैव राबली आणि शेवटी झिजून झिजून निघून गेली.

मिरे, मी त्यांच्याजवळ नव्हतो; परंतु तू होतीस. तू त्यांना कमी पडू दिले नाहीस. माझ्या हातूनही अशी सेवा घडली नसती. सेवा स्त्रियांनीच करावी. तुझ्या स्वाधीन त्या दोघांना करून मी इकडे निघून आलो. तू कर्तव्य पार पाडलेस. कृष्णचंद्रांचे शिव्याशाप सहन करूनही तू निघून आलीस. नोकरी धरलीस. शाब्बास तुझी.

मिरे, पूर्वीपासून मी तुझ्यावर प्रेम करीत आहे. परंतु या पृथ्वीवरील भौतिक बंधनांपेक्षाही, मर्त्य बंधनांपेक्षाही स्वर्गीय अशा अमर बंधनांनी आपण आज एकत्र आलो आहोत. अत:पर माझ्या आशा, माझे उद्योग, माझे मनोरथ, माझ्या प्रार्थना, सारे तुझ्यासाठी असेल. डॉक्टरांनी आईची शेवटची इच्छा लिहून पाठवली. तुझ्या पत्राला ती जोडलेली होती. आईने, आजोबांनी, परमेश्वराने तुला नि मला एकत्र जोडले आहे. ही बंधने-स्वर्गीय प्रेमाची बंधने आता कोण तोडील ? जन्मोजन्मी आपण एकमेकांची राहू.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel