'तू का मुरारी ?' मिरीने डोळे उघडून विचारले.
'हो. झाली का झोप ?'
'मुरारी, मला घाम आला आहे.'
'मी पुसतो हं. आधी खिडकी लावून घेतो. वारा नको लागायला.'
त्याने खिडकी लावून घेतली. त्याने तिची ती पेटी काढली, तिचा सारा घाम त्याने नीट पुसला. पुन्हा ती पेटी त्याने तिला घातली.
'पडून राहा हं मिरे. तुला काही गरम हवे का प्यायला ? कॉफी हवी ?'
'कोण करील कॉफी ?'
'मी करीन. मला येते करायला.'
'दे मला कॉफी, आत्याबाई स्वत: पीत असे. मला नसे देत.'
मुरारीने आपल्या घरून कॉफी करुन आणली. मिरीने ती कढत कढत कॉफी घेतली. पांघरूण घेऊन ती पडून राहिली.
'मुरारी, तू माझ्याबरोबर खेळशील ?'
'हो.'
'मी तुला आवडेन का ?'
'न आवडायला काय झाले ? तू का वाईट आहेस ?'
'आत्याबाई मला वाईट म्हणायची. माझ्या डोळयांना नावे ठेवायची. म्हणे, केवढाले डोळे!'
'मला तर असे मोठे डोळे आवडतात. ज्यांचे डोळे किरटे असतात, ती माणसे दुष्ट असतात.'
'आणि मोठया डोळयांची माणसे ?'
'ती प्रेमळ असतात. सुंदर असतात.'
'तू शाळेत जातोस ना ?'
हो. तू जात होतीस का ?'
'मला कोण घालणार शाळेत ?'
'बरी झालीस म्हणजे कृपाकाका शाळेत घालतील. मी तुला शिकवीन. शहाणी हो. कृपाकाकांना कामात मदत कर.'