Bookstruck

मिरी 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'किती छान ! कृपाकाकांचे काढ एक चित्र.'

'जवळ मिरी बसलेली आहे, असे ना ?'

'इश्श ! मी कशाला त्या चित्रात ?'

'मिरे, मी आता जाते हं. अशी खोली नीट ठेवीत जा. कृपाकाकांना त्रास नको देऊस. माझा मुलगा मागे आजारी होता. कृपाकाका यायचे. त्याला फळे द्यायचे. बसायचे. धीर द्यायचे. कृपाकाका म्हणजे सर्वांचे काका. खरोखर त्यांचे कृपाराम नाव त्यांना शोभते. सर्वांवर कृपा करणारे, दया करणारे ते राम आहेत. गरिबांचे ते देव आहेत.'

असे म्हणून जमनी गेली, मुरारीही गेला. मिरी एकटीच तेथे बसली होती. थोडया वेळाने कृपाराम आले. त्यांनी आपला नगरकंदील घेतला. त्यांनी शिडी उचलली. ते गेले रोजचे काम करायला. आपली कार्यमय सायंसंध्या करायला; जगाला प्रकाश द्यायला. मिरीही उठली. तिने शेगडी पेटवली. आत्याबाईकडे तिला काम करावे लागतच असे. थोडीफार सवय होती. तिने पोळया करायचे ठरविले. तिने कणीक घेतली. भिजवली. तिने शेगडीवर तवा टाकला. परंतु पोळयांच्या ऐवजी आरोळयाच चांगल्या असे तिने ठरविले. लहानलहान आरोळया ती करू लागली. त्या तव्यावर टाकून मग निखार्‍यात त्यांना शेकवी. सुंदर फुगत होत्या त्या.

'काय ग मिरे, काय करतेस ? यशोदाआईंनी येऊन विचारले.

'आरोळया करून ठेवते.'

'वा, तुला येते का सारे ? कालवण काय करशील ?'

'काय करू ?'

'या तव्यावर बेसनाचे पीठ कालवून टाक. येथे आहे का डब्यात ? हो, आहे. हे बघ. मी या वाटीत काढून ठेवते. हे बघ. इतके मीठ नि इतके तिखट पुरे. वाटले तर एखादे आमसूल टाक. कालव नि फोडणी करून दे ओतून.'

'मी करीन फोडणी. सारे सामान पाहून ठेवले आहे.'

'कृपाकाकांना आज तुझ्या हातचे जेवण.'

'उद्या सकाळी चहाही मी करून देईन. यांतल्या आरोळया राहतील, त्या सकाळी चहाबरोबर होतील.'

« PreviousChapter ListNext »