हिंदुधर्मातील सर्वांत श्रेष्ठ वस्तू कोणती ? हिंदुधर्माचा प्राण, हिंदुधर्माचे खरे भूषण कशात आहे ? या प्रश्नासंबंधी चाललेली चर्चा हल्ली नेहमी कानांवर पडते या चर्चेत सर्वदा जिव्हाळा, आंतरिकता- खरी कळकळ असते असे नाही, तरी पण चर्चा चाललेली आहे. हिंदुधर्मातील कोणता भाग सर्वोत्कृष्ट, कोणती गोष्ट हिंदुधर्माचे शिरोभूषण आहे, हे हिंदुधर्म मानणार्‍यांपैकी किती जणांस माहीत असेल बरे ? परके लोक हिंदुधर्माची पुष्कळ स्तुती करतात, हिंदुधर्मातील चांगल्या गोष्टी दाखवतात. खरोखरच तशी वस्तुस्थिती असेल तर हिंदुधर्म नष्ट होणार नाही. परधर्माचे हल्ले तो परतवील. परंतु पोकळ स्तुतीत अर्थ नसतो. एखाद्या धर्माचे खरे रहस्य न कळता सस्मित अशी केलेली स्तुती तो खरी स्तुती नव्हे. परके लोक कितीही शुध्द मनाचे असले व सतेज बुध्दीचे असले तरी, हिंदुधर्म व हिंदुसमाजरचना ह्या दोन गोष्टींतील फरक त्यांना सहजासहजी कळणे अशक्य आहे. आपली जी समाजरचना आहे, तिच्यात ना धड धार्मिक, ना अधार्मिक अशा शेकडो गोष्टी घुसलेल्या आहेत. परंतु जरी हिंदुसमाजरचना धुळीत मिळाली, ही टोलेजंग भव्य इमारत जमीनदोस्त झाली, तरीही हिंदुधर्मात जे विशेष विचार आहेत, ते मौल्यवान विचार आहेत, त्यांना काडीइतकाही धोका पोचणार नाही. ते विचार अमरच राहतील. हे विचार पूर्वेकडे वा पश्चिमेकडे उभयत्र पूज्यच मानले जातील; ते सदैव सर्वांना योग्य व संग्राह्य असेच राहतील. जगात जे नाना धर्म आहेत, त्यांच्यात बर्‍यावाईटाची खिचडी आहे. दूध व पाणी मिसळलेले आहे, परंतु हिंदुधर्मात काही तत्त्वे अशी सांगितली गेली की, ज्यांच्यात कसलीही मिसळ नाही; ते विचार शुध्द शंभर नंबरी सोन्याप्रमाणे आहेत; ते विचार सूर्यचंद्राप्रमाणे सदैव तळपतच राहतील. त्या विचारांना क्षुद्र गोष्टींशी मिसळून जाण्याचा संभवच मुळी नाही. हिंदुधर्मातील उपनिषदे हा एक भाग केवळ शाश्वत ज्ञानाला, चिरंतन विचारालाच वाहिलेला आहे. तेथे सर्व हिरेमाणकेच आहेत. तेथे केरकचरा नाही. सटरफटर नाही. ती तत्त्वे काळाने काळवंडणार नाहीत, निस्तेज व नि:सत्त्व होणार नाहीत. टपोर्‍या मोत्यांप्रमाणे ती तत्त्वे सदैव तेजाळ व पाणीदार राहतील; न कोमेजणार्‍या फुलांप्रमाणे, न तुटणार्‍या तार्‍यांप्रमाणे चमकत राहातील.

हिंदुधर्मात दंतकथांचे भरपूर भांडार आहे. परंतु इतर कोणत्याही धर्मातील तत्त्वांपेक्षा हिंदुधर्मातील तत्त्वे दंतकथांवर कमी विसंबून आहेत. मुळीच विसंबून नाहीत, असे म्हटले तरी चालेल. पाश्चिमात्य लोकांच्या धर्मश्रध्देला जर ऐतिहासिक कातरी लावली तर ती धर्मश्रध्दा टिकणार नाही. त्या श्रध्देला व विश्वासाला आधार मिळणार नाही. परंतु हिंदुधर्माचे तसे नाही. सत्यासाठी चालविलेली कोणतीही धडपड, सत्यासाठी होणारा कोणताही प्रयोग, त्याला हिंदुधर्म पवित्र मानतो. ज्ञानासाठी धडपडणारा कोणीही असो, तो धर्मवीर मानला जातो. आपल्यापेक्षा दुसर्‍याची दृष्टी खोल पाहू शकते, दूरवर पोचू शकते, एवढ्यासाठी त्याचा छळ होण्याची हिंदुस्थानात भीती नाही. ब्रूनो हा भारतात जन्माला आला असता, तर जिवंत जाळला गेला नसता. गॅलिलिओ भारतात अवतरता तर त्याचा छळ होता ना. ज्ञानासाठी केला जाणारा प्रत्येक प्रामाणिक व आंतरिक प्रयत्न हा सनातन धर्मांत पूज्य मानला जातो; त्या प्रयत्नाला उत्तेजन देण्यात येते. कोणत्याही रूपाने, कोणत्याही मार्गाने सत्य येवो; सनातन धर्माला त्याची चीड नाही. हिंदुधर्मातील हीच परमश्रेष्ठ वस्तू असावी. हिंदुधर्माचा खरा अलंकार म्हणजे हीच दृष्टी कदाचित् असेल असे वाटते.

हिंदुधर्म कधीही रानवट, दांडगट बनला नाही. ज्ञानाशी, शिक्षणाशी त्याचा कधी विरोध नव्हता. गांधर्ववेद, आयुर्वेद, धनुर्वेद सारे वेदच. ज्ञान मात्र पवित्र व पूज्य आहे. सेव्य व संग्राह्य आहे, असे हिंदुधर्म मानतो. सत्याची विविध रूपे हिंदुधर्म सारखीच संपूज्य मानतो; त्यात भेद बघत नाही. सत्य हे सत्यच असणार. जे लोक हिंदुधर्मीयांस मूर्तिपूजक म्हणून हिणवितात, तेच खरोखर हीन व मूर्तिपूजक आहेत. हिंदु धर्मांतील मूर्तिपूजा ज्ञानाला विरोध करीत नाही, सत्याला अनंत रूपांनी प्रकट होण्यास अवसर देते. सर्व ज्ञान पावन आहे. त्या खोल व गहन गुहेतून जे जे ज्ञानधन कोणी बाहेर आणील, त्या ज्ञानापैकी कमी बंधनकारक कोणते; अधिक बंधनकारक कोणते, हे ठरविण्याचा आपणास अधिकार नाही. प्रत्येकाने स्वत:च्या श्रध्देप्रमाणे सत्यनिष्ठ राहिले पाहिजे. गणितविद्या ही सुध्दा दैवीच. शास्त्रज्ञ हेही ऋषीच. पाणिनि व आर्यभट्ट हे ऋषीच होत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel