आपणांवर सोपविलेले काम, टाकलेली जबाबदारी, पार पाडणे म्हणजे देवाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे होय. ज्या वेळेस आपणांवर काही जबाबदारी सोपविण्यात येते, काही विश्वास टाकण्यात येतो, त्या वेळेस परमेश्वर परीक्षा घेत आहे असे समजावे. जे काम आपणांवर सोपविण्यात आले ते पार पाडण्याची आपण आपली शिकस्त केली पाहिजे. तुकारामांनी म्हटले आहे, “विश्वासाची धन्य जाती.” आपल्यावर सारे विश्वास ठेवतात, याहून भाग्याची व कृतकृत्यतेची दुसरी कोणती गोष्ट ? जे काम आपण पुरे करीत नाही, शेवटास न नेता अर्धवटपणे सोडून देतो, ते अपूर्ण राहिलेल्या यज्ञाप्रमाणे आहे. आणि यज्ञ अर्धवट राहणे म्हणजे स्वत:चा नाश करून घेणे होय. इंद्रजिताच्या भंगलेल्या यज्ञांतून, पुरा न झालेल्या त्या यज्ञांतून विजयरथ बाहेर पडला नाही. अर्धवट यज्ञांतून फलप्राप्ती नाही. त्याप्रमाणे अर्धवट काम करून फायदा नाही. कर्म म्हणजे यज्ञच तो. सामाजिक कर्तव्ये, नागरिकत्वाची किंवा इतर राष्ट्रीय कर्तव्ये करीत असताना आपण आपल्या वैयक्तिक भावना, खाजगी प्रश्न, घरची सुखदु:खे, वैयक्तिक तंटे व विरोध-सारे घरीच ठेवून बाहेर पडले पाहिजे. सार्वजनिक कर्माची जबाबदारी मजवर असताना मी माझा क्षुद्र अहं त्या वेळेस विसरून गेले पाहिजे. माझ्या सार्वजनिक कर्तव्यक्षेत्रात ही घरातील स्वार्थमत्सराची भुते, ह्या उंदीरघुशी बाहेर येता कामा नयेत. सार्वजनिक जबाबदारी शिरावर असताना स्वत:चा स्वार्थच काय तर स्वत:चे आरोग्यही क्षणभर दूर ठेविले पाहिजे. थोर मॅझिनी म्हणत असे, “माझ्या राष्ट्राला माझी जरुरी असताना मी आजारी कसा पडू शकेन !” न्यायमूर्ती रानडयांना त्यांची प्रकृती बरीच बिघडल्यामुळे डॉक्टर लाहोरच्या सामाजिक परिषदेस त्यांना जाऊ देताना; त्या थोर संताच्या, आधुनिक ऋषीच्या डोळ्यांतून घळघळ पाणी आले ! “माझ्यावर ही जबाबदारी आहे-” ह्या विचाराने आपणास पराकाष्ठेचे प्रयत्न करण्यास सामर्थ्य आले पाहिजे; पराकाष्ठेचा त्याग करावयास स्फूर्ती वाटली पाहिजे.  “माझी जबाबदारी पार पडली, आता मी सुखाने मरतो-” असे बाजीप्रभू म्हणाले. “माझे डोके तरी किल्ल्यांत जाऊन पडू दे, नाही तर किल्ला हातात पडू दे-”  असे भीष्म प्रतिज्ञ चिमाजीअप्पा बोलले. “आधी कोंडाण्याचे लगीन, मग माझ्या रायबाचे-’ असे जबाबदारी ओळखणारा नरवीर तानाजी म्हणाला.  “प्रत्येकाने आपल्यावरची जबाबदारी पार पाडावी अशी इंग्लंडची अपेक्षा आहे-”  हा लहानसा संदेश नेल्सनने दिला होता. परंतु त्यात अपार प्रेरणा व स्फूर्ती होती. जबाबदारी पार पाडणे, विश्वासाला पात्र होणे- फार भव्य व दिव्य आहे ही गोष्ट. तुम्ही पडलेत तरी चालेल, परंतु जबाबदारी पार पाडा.

याच्यावर दया दाखववी की नाही, याच्या बाबतीत न्यायाच्या काटा जरा सौम्य करू का- वगैरे प्रश्नांना दुसरे उत्तर नाही. ज्याची अत्यंत आवश्यकता असेल ते करा. जेथे जरूर असेल तेथे दया दाखवा, जेथे सौम्य होणे आवश्यक असेल तेथे जरा सौम्य व्हा. ज्याच्यावर दया करावयाची, त्याला त्या दयेची कितपत जरुरी आहे, तो त्या दयेला मनात किती किंमत देईल- हे पाहिले पाहिजे. श्रीमंतावर दया करण्यात काय अर्थ ? त्याला त्या केलेल्या दयेची आठवणसुध्दा राहणार नाही. “त्यात काय मोठेसे केलेत, नसतेत जरा थांबलेत, तर भरले असते दंडाचे पैसे.”  असे उर्मटपणाने तो खुशाल मागून बोलेल. जबाबदार मनुष्याने या सर्वांचा विचार करून वागावे. त्याच्या वागण्याला स्वार्थाची दुर्गंधी येऊ नये म्हणजे झाले. नाहीतर पुष्कळ वेळा गरिबांच्या बाबतीत अधिकारी कंटक असतात व श्रीमंतांच्या बाबतीत ते मऊ असतात. ‘सार्वजनिक जागेचे अतिक्रमण झाले’ या सबबीवर गरिबाची झोपडी ताबडतोब जमीनदोस्त होते; श्रीमंताची हवेली मात्र उभी राहते. गरिबाने कर भरला नाही तर लगेच जप्ती, परंतु मातब्बरास मात्र वाटेल तितकी सवलत. अशा ज्या गोष्टी सार्वजनिक जीवनात, स्थानिक संस्थांच्या कारभारात होतात याच्या पाठीमागे स्वार्थ, भीती, मानसन्मानाच्या इच्छा- नाना वृत्ती असतात. अंगावर जबाबदारी घेणार्‍याने या वृत्तीपासून दूर राहिले पाहिजे.

सार्वजनिक जीवनात मोठे होण्याची इच्छा, स्वार्थ, सत्तेची व कीर्तीची लालसा ह्या गोष्टी तितक्या प्रेरक असतात. सर्वांत अत्यंत जोरदार प्रेरणा “ही गोष्ट मीच करू शकेन. मला तेथे जाऊ दे-” ही होय. इंग्लंडच्या इतिहासात थोरला पिट म्हणाला, “राष्ट्राला मीच काय तो वाचवू शकेन. दुसरा कोणी ते करू शकणार नाही.”   ज्याला असे म्हणता येईल, त्याच्या भाग्याला सीमा नाही. “ हे काम माझ्यावर सोपवा. मी ते जितके उत्कृष्टपणे करू शकेन तितके दुसरा कोणी करू शकणार नाही. या माझ्या खांद्यावरच ती जबाबदारी शोभेल-” असे अहमहमिकेने म्हणणारे उत्साही, आत्मश्रध्द व कार्यधुरंधर लोक जेथे भरपूर निघतात, त्या देशाचे भाग्य थोर होय. याच विचाराने पहारेकरी, चौकीदार आपापल्या ठिकाणावरून न हालता तेथे जरूर पडली तर मरून जातील. याच ध्येयाने व प्ररणेने आगीचे बंबवाले आगीत घुसतील; हाच विचार झोपाळू जीवांना जागृती देईल, मागे मागे रेंगाळणार्‍यांना पुढे खेचून आणील; आणि हाच धर्म होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel