छळणारा मीच व छळला जाणारा मीच. मीच मला तारीत आहे. मीच मला मारीत आहे. रडणारा व रडवणारा व छळाला जाणारा दोघां मिळून आईचा खेळ चालवला आहे, त्या विश्वमातेची लीला चालली आहे. आईच्या नाटकातील आम्ही दोन पात्रे एवढेच तो जाणतो व खेळत राहतो व अखंड सच्चिदानंदाचा अनुभव तो अंतरी घेत राहतो. अव्यंग व अलोट सुख त्यांच्या वर्तनात दिसून येते. सूर्याची प्रसन्नता त्याच्या मुखावर असते; तार्यांची शांती डोळ्यात असते; अर्भकाचे हास्य ओठांवर असते. झर्यासारखा बुडबुड जणू तो आनंदाने उसळत असतो. “आनंदसागराचे कुंभ चुबकळोन भरले” असे ते महात्मे असतात. हात, पाय, नाक, डोळे फुटलेल्या अशा आनंदाच्या चल मूर्तीच जणू आहेत असे दिसून येते. त्याच्या अंत:करणात तंबोरा लागलेला असतो, सिंहासनावर सच्चिदानंद विराजमान असतो, संगीत सुरू असते. अखंड सुरू असते. असा जो अवतारी पुरुष जगाला आनंदाचे आवारू घालू पाहणारा पुरुष, दु:खालाही सुखमय करणारा, आपत्तीच्या काळ्याकुट्ट ढगांना हृदयातील सूर्यकिरणांचा स्पर्श करून सुवर्णमय करणारा असा जो हा महात्मा तोच आपली आशा तोच आपली विश्रांती, तोच सखा; तोच जीवविता, तोच उठविता, तोच सुखकर्ता, दु:खहर्ता, उध्दर्ता; अशा विभूतीचीच, अशा अवतारी पुरुषाचीच आपणास तहान असते, तळमळ असते. आपले सारे लहानमोठे प्रयत्न त्यालाच निर्माण करण्यासाठी असतात. लहान हिरवीं झाडे जीवन देणार्या मेघाला ओढून आणतात त्याचप्रमाणे आपली लहानमोठी जीवने, कोणाची उंच, कोणाची ठेंगणी, कोणाची सरळ, कोणाची वेडीवाकडी, पवित्र, कोणाची अपवित्र, परंतु ही जीवने त्या करुण्यामृताने भरलेल्या महामघाला, महापुरुषाला खेचून आणण्याचा कळत वा नकळत सारी प्रयत्न करीत असतात; आणि तो आला म्हणजे आपण तृप्त होतो, कृतार्थ होतो.
देवाघरातील साक्षात्कार निराळा व जगाच्या धांगडधिंगाण्यात येणारा साक्षात्कार निराळा. देवघरातील देव मंजुळ मुरली वाजवणारा मुरलीधर आहे; परंतु बाहेरच्या विशाल जीवनातील देव तो जनार्दन मुरहर आहे. घरातील देव शिवशंकर आहे, बाहेरचा देव भीषण रुद्र आहे. दोन्ही अनुभवच. कारुण्यमय व कोपमय दोन्ही रुपांतील साक्षात्कार हवा. हातात प्रेमाने वडी देणारी आई व रागाने थोबाडीत देणारी आई-आई एकच व ती मला प्रिय आहे- हजारो हात, हजारो डोळे, लसलसणार्या हजारोंच्या जिभा असा हा बाहेरचा नानारुप विराट परमेश्वर, त्याला ओळखले पाहिजे व गोंडस गोजिरा श्यामल कृष्ण तोही पाहिला पाहिजे. दोन्ही ओळखी हव्यात. दोन्ही मार्ग परब्रह्माकडे जाण्यासाठी तयार कलेले आहेत. रस्त्यावरील, बजारातील विविध जीवनात कसे वागावे, तेथेही त्या परमात्म्याचा साक्षात्कार कसा करून घ्यावा, हे अवतारी पुरुष दाखवीत असतो. सारे आनंद व ज्ञान याची परिसीमा म्हणजे सच्चिदानंद होय. जगाचे ज्ञान व जगातील आनंद यांनाही शेवटी त्यात विलीन व्हावे लागते. विलीन होतातच. आपले सर्वांचे बरेवाईट प्रयत्न व अनुभव महापुरुषांच्या प्रयत्नात परिणत होतात व महापुरुषांची इतरांना जवळ घेऊन वाढलेली जीवनगंगा शेवटी अनंत सागरात जाऊन मिळते.