ही फ्रायर संन्याशांची गोष्ट झाली, तेराव्या शतकातील. परंतु त्याच्याही आधी अकराव्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये अत्यंत तपस्वी व त्यागी लोकांचा एक संघ निघाला होता. यांना सिस्टरशियन म्हणत. र्हाइन नदीकाठच्या व फ्रान्सधील दर्याखोर्यांत रानावनात व दलदलीच्या प्रदेशात हे लोक गेले. त्यांनी जंगले तोडली. दलदली सुकवल्या; मोठ्या प्रमाणावर त्यांनी शेती सुरू केली; त्यांनी मंदिरे बांधली, मठ बांधले. त्यांच्यातील काही लोक पुढे नॉर्वे देशात गेले. तेथे त्यांनी दगडांची घरे कशी बांधावी ते शिकवले; तेथील लोकांना रोमन लिपी व तेथील लोकांस राष्ट्रीय महाकाव्ये रचण्यास समर्थ केले.
ज्या युरोपमध्ये आज स्वार्थाचा जयजयकार केला जात आहे, जेथे स्वार्थ हाच देव होऊन बसला आहे, कोणतेही कार्य करण्याची प्रेरणा जेथे आज द्रव्यांतून व स्वार्थातून मिळत आहे, त्या युरोपचा पाया त्यागावर उभारलेला आहे. या युरोपियन लोकांच्या आजच्या संस्कृतीच्या पायात असे त्यागाचे शक्तिमान दगड घातलेले आहेत, म्हणून युरोप उभा आहे. त्यागामुळेच युरोपियन संस्कृती जिवंत आहे. त्या संस्कृतीच्या पायात असे सेवा करणारे महान् संत गाडले गेलेले आहेत. आजन्म श्रमणार्या, मुकेपणाने काम करणार्या त्या थोर पुरुषांनी आपल्या श्रमाचा मोबदला स्वत: न घेता समाजाला दिला व तेथे तो वाढीस लागला. त्या त्यागावरच, त्या भांडवलावरच युरोप उभा आहे. कोणतीही नवीन गोष्ट, नवीन शोध असो. ती गोष्ट तावून-सुलाखून आधी पाहावी लागते; ती निर्दोष व्हावी लागते; नीट व्यवस्थित पध्दतशीर व्हावी लागते. कोणाच्याही हातात देण्यासारखी ती झाली म्हणजे मग त्या गोष्टीपासून, त्या शोधापासून, फायदा मिळू लागतो. मग ती परिणत यंत्रे घरोघर जातात, बाजारात येतात. व्यवहार सुरू होतो; धंदे सुरू होतात; दर ठरतात, मजुरी ठरते. परंतु तो शोध, ते यंत्र अशा पूर्ण स्वरूपाला येण्यापूर्वी, नि:स्वार्थपणे सेवा करावी लागते; घरदार विकावे लागते; शोध करावे लागतात; प्रयोग करावे लागतात; अनेकांची आयुष्ये जातात; अनेकांना प्राण द्यावे लागतात, हुतात्मे व्हावे लागते. या अशा त्यागमूर्ती पुरुषांच्या डोळ्यांसमोर सर्व समाजाचे, सर्व जगाचे कल्याण, एवढाच प्रश्न असतो.
हिंदुस्थानची आज जी सामुदायिकरीत्या सुसंघटित रीतीने इंग्लंडहून लूट चालली आहे, तिचा पायाही त्यागावरच उभारलेला आहे व ही गोष्ट इंग्रजही अभिमानाने सांगतो व आपणही इंग्रजांच्या देशभक्तीचे उदाहरण म्हणून शाळांतून शिकवितो. दिल्लीच्या बादशाहाची मुलगी बरी केल्याबद्दल डॉक्टर हॅमिल्टन याने स्वत:साठी काहीएक न मागता, आपल्या कंपनीसाठी व्यापारी सवलती मागून घेतल्या; आपल्या संस्थेचा, संघाचा फायदा त्याने पाहिला. ज्या चळवळीत त्याग नाही, ज्या चळवळीच्या मुळाशी त्यागाची आध्यात्मिक शक्ती नाही, ज्या चळवळीत संन्याशाचे धगधगीत तेज नाही; त्या चळवळीची कोणासही भीती वाटावयास नको. परंतु त्यागावर उभारलेली चळवळ, फकिरांनी चालविलेली चळवळ ही विश्वाला गदागदा हलवील. या अशा संन्याशाच्या मनात समाजाच्या हिताची व कल्याणाची कल्पना सदैव जागृत असते. आपल्या व्यापारी बंधूंच्या अडचणी डॉक्टर हॅमिल्टन यास माहीत होत्या व त्यांच्या फायद्यांतच अप्रत्यक्षपणे माझा फायदा आहे, हेही त्याला माहित होते. त्यामुळे त्या व्यापारी संघासाठी स्वार्थत्याग करावयास तो सिध्द झाला. ज्या ज्या वेळेस नवीन संबंधाचे नवीन स्वरूप दाखवले जाते, त्या त्या वेळेस नवीन युगाचा उदय होत असतो, नवती मनूचा आरंभ होत असतो.