परंतु भूत व भविष्य या दोहोंतून एकालाच चिकटून बसावयाचे असेल, तर भूतकाळापेक्षा भविष्यकाळालाच धरून ठेवलेले बरे. काही झाले तरी आपली इच्छा नसली तरीही, थोडे तरी परंपरेचे रक्त आपल्याबरोबर येणारच येणार. थोडा तरी तो सुगंध बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. जुने काही तरी थोडे बरोबर येणार व आपण पुढच्यासाठी नवीन काहीतरी करून ठेवणार. दुसर्यांना मुळीच स्वातंत्र्य न देण्याची जी पुरातन्यांची, सनातन्यांची वृत्ती, त्या वृत्तीमुळे तरुण बेताल व अधिर होतात. गुलाम करू पाहणार्या या जुन्या लोकांची गाठोडी भिरकावून द्यावी, असे त्यांना वाटू लागते. जुन्यांच्या या वृत्तीनेच तरुण आंधळे होतात. कृतीला प्रतिकृती, ध्वनीचा प्रतिध्वनी. तुम्ही मागेच ओढीत बसाल तर तरुण पुढेच खेचणार. तुम्ही बध्द करू पाहाल, तर ते बंधनाच्या पलीकडे जाण्यासाठी उठणार. जुन्याला चिकटून राहणे हा दोष नाही, परंतु दुसर्यालाही मोकळीक न देणे हा गुन्हा आहे ही गोष्ट तरुणही कबूल करतील. जुन्या लोकांनी ‘ जुने ते सारे सोने ’असे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी ते उराशी धरून बसावे. परंतु त्यांनी तरुणांना मोकळीक द्यावी. दुसर्यानेही ते सोनेच म्हणावे, असला दुराग्रह त्यांनी धरू नये. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणत, “सर्व धर्म सत्य आहेत. त्यांच्यांतील बहुतेक सारे अनुभवातही सत्य आहे. परंतु दुसर्या धर्मातील गोष्टींना, दुसर्या धर्मातील तत्त्वांना एकमेक असत्य मानतात हे एक महान असत्य मात्र या सर्व धर्मांत आहे.” त्याचप्रमाणे जुन्याला चिकटून बसणारे पुराणप्रिय लोक हेही सत्य आहेत. फक्त ‘तुम्ही मूर्ख चुकता’ असे जेव्हा ते तरुणांना म्हणतात, तेव्हा मात्र ते असत्य वागतात, चूक करतात, त्यांच्याविरुध्द कोल्हेकुई करतात, तेव्हा मात्र ते चुकतात, जेव्हा ते असत्य मार्गाने जातात. मला स्वातंत्र्य पाहिजे असेल, तर मी दुसर्यासही ते दिले पाहिजे.
वृध्दाने तरुणाला व तरुणाने वृध्दाला प्रेम दिले पाहिजे. परस्परांचे शुभचिंतन केले पाहिजे. “शुभास्ते पंथान: सन्तु” तुमचा मार्ग मंगलप्रद ठरो असे परस्परांनी परस्परांस प्रेमाने म्हणावे व स्वत:चे प्रयोग करीत राहावे, स्वत:च्या धर्माकडे जात राहावे. कोणाचा मार्ग चांगला, हे काळ ठरवील. परस्परांच्या मंगलार्थ व सिध्दीसाठी परस्परांनी प्रार्थना करावी. आपणाला हिंदुस्थान म्हणजे युरोप-अमेरिकेची निर्जीव प्रतिकृती करावयाची आहे का ? नको रे देवा ! असले दुर्दैव या भारतवर्षाच्या माथी नको. परंतु तरुणाचे जर असेच ध्येय असेल, हिंदुस्थान म्हणजे युरोप अमेरिकेची नक्कल, त्यांची छाया, असे करण्याचे जर ध्येय असेल, तर मग या प्राचीन खजिन्यांना, जुन्या ठेवण्यांना, प्राणापेक्षाही काही जास्त जपून ठेवणारे असे जे श्रध्दावान कडवे वडील लोक, ते या तरुणांच्या उल्लूपणाला अडवण्यासाठी उभारलेले भक्कम किल्लेकोटच आहेत, असे म्हटले पाहिजे. तरुणांचे असले विवेकहीन अनुकरणाचे ध्येय असेल, तर वडील लोक मोलवान सेवा करीत आहेत, असे समजले पाहिजे. राष्ट्राचा पूर्वीचा रंग, पूर्वीचा गंध राखून ठेवणारी, परंपरेचा नंदादीप विझू न देणारी, नवीन निर्जीव, विवेकहीन, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते, या प्रकारच्या गोष्टींना अडवणारी अशी वडील मंडळी फार मोठे काम बजावीत आहेत, असे म्हणावे लागेल. परंतु त्याचप्रमाणे हिंदुस्थानचे पंख तोडून टाकावे, त्याला हिंडू-फिरू देऊ नये, त्याच्या विचाराला विश्व मोकळे करू नये, त्याने पिंजर्यातच त्या ठरलेल्या दांडीवरच ‘पढो प्रभाते श्रीभगवान’ करीत राहावे, हे तरी आपणास पाहवते का ? आमच्या वडील मंडळींना असला दु:खीकष्टी हिंदुस्थान, परकी सत्तेच्या पारतंत्र्याच्या शृंखलेपेक्षाही अर्थहीन व सारहीन अशा ज्या रुढी व जे आचार त्यांच्या जड शृंखलेपेक्षाही शतकानुशतके जखडलेला व म्हणून आज जगाच्या मागे पडलेला व पारतंत्र्यात पडलेला असा हिंदुस्थान पाहण्यात आनंद व कृतार्थता वाटते का ? हिंदुस्थान असा स्थाणूच राहावा, हे त्यांचे ध्येय आहे का ? जर असे तुम्हा पुरातन प्रियांचे ध्येय नसेल तर तुमच्या स्वातंत्र्यप्रिय व तुम्हाला स्वछंदी वाटणार्या मुलाबरोबर तुमचे आशीर्वाद पाठवा, तुमचे प्रेम त्यांच्या पाठीशी असू दे. भविष्यकाळावर जोरदार हल्ले करावयास तुमची मुले निघत आहेत. भविष्याच्या डोंगरात सुंदर लेणी खोदावयास ते जात आहेत- उत्साहाने व उमेदीने जात आहेत. म्हणा त्यांना “शुभास्ते पंथान: सन्तु ।” म्हणा, “जा शूर बाळांनो जा; छातीच्या वीरांनो जा, धैर्यशील, बलवान् युवकांनो जा, पुढे जा, आणखी पुढे जा. तुमचे प्रगतीचे प्रयोग करा, तुमचे नवीने बावटे फडकवा; तुमच्या अदम्य उत्साहाने, ज्वलंत आशेने पुढे जा; निर्भयपणे कूच करीत पुढे जा. तुम्ही कोठेही गेलेत तरी एक गोष्ट आम्हाला पक्की माहीत आहे की, तुम्ही कोठेही साता समुद्रांपलीकडे गेलात वा पाताळात गेलात, तरीही तुमच्या खेडयांमध्ये आंबराईत असणारे जे तुमचे घर त्या घराबद्दल तुमच्या हृदयात सदैव प्रेम जागृत राहील. जा. आमच्या जगण्यापेक्षा तुम्ही जगणेच जास्त श्रेयस्कर आहे, असे आमचे मत आहे, आमचे काय, दस गेले, पाच राहिले. तुम्ही भविष्यकाळाला बनवणारे ! तुम्ही नसून आम्ही असण्यापेक्षा आम्ही नसून तुम्ही असण्याने देशाचे अधिक कल्याण होईल. परंतु एक दिवस येईल की, ज्या दिवशी बाहेर भटकून भटकून, प्रयोग करून करून तुम्ही कंटाळला; पाखरे भटकतील भटकतील व दमून परत घरटयाकडे येतील; तुमच्या लढाया लढून तुम्ही दमून जाल; तुमचे अपूर्ण राहिलेले काम तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या हातात सोपवून द्याल व पुन्हा एकदा तुम्ही आपली हृदये, तुम्ही आपले मिटू पाहणारे डोळे व उडू पाहणारे प्राण या सर्वांना घेऊन प्राचीन ऋषिमुनींच्या ज्ञानमंदिराकडे याल; त्या शांतिप्रद थोर अध्यात्मविद्येच्या सहाय्यानेच तिचा हात व आधार घेऊनच शेवटी मुक्त व्हाल, शांत व्हाल; त्यावेळेस ज्या तुमच्या वृध्द वाडवडिलांनी-तुम्ही तिरस्कृत केलेल्या वाडवडिलांनी हा जो ज्ञानविधी राखून ठेवला, ही जी अध्यात्मविद्या जतन करून ठेवली, ही जी अमृतवल्ली जपून ठेवली, ज्या पूर्वजांचे पुण्य स्मरण होऊन तुमच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू खळखळ धावून आल्याशिवाय राहणार नाहीत, शेवटल्या क्षणाला डोके ठेवावयास हे हक्काचे स्वत:च्या मालकीचे राष्ट्रीय ध्येयरुप मंदिर, ही आपल्याच अध्यात्ममाऊलीची मांडी ज्यांनी तुमच्यासाठी राखून ठेवली, परंतु ज्यांना तुम्ही शिव्याशाप दिलेत व हिडीसफिडीस केलेत, याचे थोर स्मरण होऊन तुमचा कंठ भरून येईल व हृदय सद्गदित होईल. या जुन्या घरात, या तुमच्या मठात तुम्हाला जी शांती व शीतलता मिळेल, अशी तुम्हाला कोठेही मिळालेली नसेल ! या नदीकाठच्या जुन्या मंदिरातील धुपारतीच्या वेळेचा सायंकाळचा घण घण घंटानाद, त्याच्याहून अधिक मधुर व अधिक पवित्र संगीत आपण कोठेही ऐकले नाही असे तुम्हास वाटेल ! जा, बाळांनो, जा. परंतु लक्षात धरा. भूतकाळ हा भविष्यकाळासाठी तिष्ठत असतो. त्याची अवहेलना झाली तरी तो थोरपणाने ती गिळून उभा असतो; तो मरून जाऊ इच्छीत नसतो; कारण आपल्या मुलांना आपली जरुरी लागेल, हे आईबाप ओळखून असतात. भूतकाळ हा भविष्यकाळाचा देव आहे व भविष्यकाळासारखा दुसरा कोणीही भक्तोत्तम त्याला नाही !”