ज्या कामाबद्दल उत्साह वाटत असेल, ज्या कामाची माहिती असेल, ते काम, ती सेवा करावयास त्या त्या मनुष्याने पुढे यावे. लायकी पाहावी, मग त्याची जात, त्याचा वर्ण याचा विचार करू नये. मानवजातीचा जो सेवक झाला, त्याचा जन्म कुठेही झालेला असो, तो पवित्र आहे. तत्त्वज्ञानी ज्ञानाने ऋषी बनतो, तर सेवा करणारा सेवा करून मनाने पवित्र व शुध्द होत होत संत होतो.
आपण दहा जण जेव्हा कमर कसून एकाच कामासाठी पुढे येतो, तेव्हाच ते कर्म सुकर वाटते; त्या कर्माबद्दल उत्साह वाटतो, कर्तृत्वशक्ती दुणावते. जेव्हा कर्म एका व्यक्तीचेच न राहता, एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या संघाचे ते होते, तेव्हा कर्मशक्तीला भरते येते; अडचणी व संकटे पळून जातात. मला कोण मदत करणार, कोण साहाय्य देणार, अशा रडगाण्याला मग अवसरच राहत नाही. येथे एकटयाची मुशाफरी नसून, संबंध जथाच्या जथा यात्रेला निघालेला असतो; यामुळे वाटेतील संकटे पाहून भीती न वाटता उलट आनंदच होतो. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन अनेकांनी एखाद्या कार्यास लागणे, ही प्रचंड शक्ती आहे. समान भावना आपणास प्रबळ करते, अजिंक्य करते. लहान लहान धर्मपंथांनी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रचंड चळवळी केल्या, याचे कारण त्या पंथाचे अनुयायी सारे एकाच विचाराने भारलेले असत. उदाहरणार्थ, लहानशा ब्राम्हो समाजाने हिंदुधर्माच्या मोठमोठ्या व ठळक ठळक अशा रूढींच्या बुरुजांवर हल्ले चढविले व त्यात त्यांना बरेचसे यशही आले. सेवकाला असे लहान लहान संघ म्हणजे मोठा आधार वाटतो. हे संघ, हे आश्रम म्हणजे जणू सेवकांचे घर. हा संघ म्हणजे जणू सेवकाची आईच. ही संघमाता, ही आश्रममाता सेवकास काम करावयास पाठवते; त्याच्या कामात यश आले म्हणजे त्याची पाठ थोपटते; त्याचे अभिनंदन करते; तो काम करून आश्रमात घरी परत आला म्हणजे त्याचे निंबलोण उतरते. सेवक आजारी पडला तर संघमाता त्याची शुश्रूषा करते. प्रेमळ मातेप्रमाणे त्याला जपते. अशा प्रकारचा प्रेमाचा विसावा, अशा प्रकारचे आधारधाम असल्याशिवाय, सेवकाचा उत्साह कसा टिकावा ? त्याने कोठवर धैर्य धरावे ? अशा प्रकारचे आधारभूत आश्रय नसतील, सेवकांचे कौतुक करणारे, त्याला साहाय्य देणारे, त्याच्याकडे लक्ष ठेवणारे जर आश्रय नसतील, तर सेवकास सेवा करावयास जोर कोठून येणार ? त्याला एकाकी काम करणे जड जाईल. आपल्या प्रेमळ बंधूंचा जो संघ, त्या संघाने आपणास उत्तेजन द्यावे, आपले काम पाहून आनंद दर्शवावा, असे सेवकास वाटत असते. या गोष्टीसारखी गोड गोष्ट सेवकाला अन्य कोणती असणार ? या प्रेमाच्या बळावरच, जी संकटे एरव्ही दूर करावयास आली नसतीं, ती तो सहज लीलया दूर करतो. ती संकटे दूर करावयास त्याला स्फूर्ती मिळते, चैतन्य मिळते. ही स्फूर्ती मिळाल्याने ज्या संकटांना पाहून तो पळाला, त्यांनाच तो धैर्याने तोंड देतो. ‘नेति नेति’ या निषेधात्मक ज्ञानाने आत्म्याने वाटेल तितके वर चढावे, परंतु ही वर सांगितलेली सेवेची व संघटनेची गोष्ट विसरता कामा नये.
आज संघटना करून सामुदायिकरीत्या अनेक प्रश्न हाती घेतले पाहिजेत. ते प्रश्न आपली वाट पाहत आहेत. मी एकटा दुनियेला हलवीन या भ्रमात, या पोकळ घमेंडीत अत:पर कोणी राहू नये. लावलेला प्रत्येक शोध, लिहिलेले प्रत्येक काव्य, कल्पनेत खेळवलेले प्रत्येक स्वप्न, संपादिलेली कोणतीही गोष्ट- ती सामुदायिक होऊ दे, सर्वांची मिळून होऊ दे, सर्वांसाठी होऊ दे त्या त्या गोष्टीच्या सिध्दीसाठी समाजाने सहाय्य केले आहे. म्हणून समाजालाही त्यांची फळे चाखू दे; जो खरा धर्ममय सेवक आहे, त्याने स्वत:चा अहंकार आधी साफ पुसावा. मी म्हणजे मुख्य कार्यकर्ता, ही भावना त्याने आधी दूर फेकून द्यावी. प्रबळ स्नेहबंधनांनी एकत्र बांधलेले, एकाच ध्येयाचे भक्त बनलेले, अशा दोन-चार लोकांनी प्रथम एकत्र यावे, आणि नंतर मानवजातीचे ज्यात कल्याण आहे, स्वबांधवांचे ज्यात खरे हित आहे, असे कोणते तरी कर्म अंगावर घ्यावे. ते प्रथम शाळेत किंवा महाशाळेत एकत्र शिकलेले असतील; कदाचित एकाच गुरुच्या हाताखाली शिकल्यामुळे ते गुरुबंधू झालेले असतील; कधी ते एकाच गावचे असतील वा एकाच धंद्यात काम करणारे असतील. त्यांना एकत्र आणणारे, परस्परांस जोडणारे बंधन मुळात कोणतेही असो, त्यांच्यात समान ध्येय असावे, प्रयत्नात सहकार्य असावे. त्यांच्यातील ज्या व्यक्ती संस्थेच्या प्राणभूत अशा असतील, त्या व्यक्तीत अभंग प्रेमबंध असावा, अतूट व अखूट प्रेम असावे. अशा तर्हेने जर एकत्र येऊन कार्याला आरंभ केला, तर यश येण्याचा संभव असतो.