आपली जात काय ती इतरांपेक्षा श्रेष्ठ व वरिष्ठ, आपले राष्ट्र तेवढे थोर, आपला देश सर्वांत चांगला- इतर हीन- असे जर आपल्या मुलांबाळांना आपण शिकवू तर त्यात फार धोका आहे. आपण स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजून इतरांपासून जर आपण अहंकाराने दूर राहिलो, तर यात स्वाभिमान नसून अत्यंत क्षुद्र व पोरकट, सर्वस्वी निंद्य व त्याज्य असा दुरभिमान मात्र आहे. ज्यांना आपण तुच्छ, हीन-पतित असे मानू, त्यांचा तर पाणउतारा आपण केलाच, परंतु जे खरे थोर आहेत, सत्यासत्याची पर्वा करणारे जे आहेत, त्यांच्या दृष्टीने आपणही तुच्छ, पतित ठरू. आपले कुळ कितीही उच्च असो, श्रेष्ठ असो; जगात आपणंपेक्षा दुसर्या कोणत्याही बाबतीत कोणी वरचढ नाही; कोणी श्रेष्ठच नाही, ही गोष्टच अशक्य व असंभवनीय आहे. शेराला सव्वाशेर हा जगाचा न्याय आहे. आपण श्रेष्ठ कुळात जन्मलो याने वाटणारा अभिमान व आनंद यांना मर्यादा आहे. हा अभिमान सदैव सापेक्ष आहे व तसाच तो असला पाहिजे. आणि पुढे एक दिवस आपणास समजेल की, “सर्वांत मोठे भूषण म्हणजे माझा साधेपणा, माझी निरहंकारी वृत्ती; सर्वात मोठा अलंकार म्हणजे माझे सच्छील; आणि कोणत्याही प्रकारचा अभिमान किंवा वारसदारी सांगणे म्हणजे क्षुद्रत्वाचे निदर्शक होय.”
कुलाभिमान याचा अर्थ एवढाच की, अंगावर जबाबदारी आली. ती जबाबदारी अंगावर न देता फुकट ऐट मात्र आपण मिरवू पाहतो व दुसर्याला तुच्छ लेखतो. हरिश्चंद्राच्या वंशात जन्मणे याचा अर्थ हा की, सत्यासाठी सर्वस्वावर पाणी सोडून भिकारी होण्याची तयारी राखणे. कुलाभिमान म्हणजेच आपणावर टाकलेला विश्वास, पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला दिव्य व भव्य नंदादीप. हा नंदादीप हाती असल्यामुळे, ही दिव्य उदाहरणे डोळ्यांसमोर असल्यामुळे, श्रेष्ठ व थोर कार्य करावयास आपणास स्फूर्ती व धैर्य ही मिळतील- हाच कुलाभिमानाचा अर्थ. माझ्या कुळात ही गोष्ट शेकडो पूर्वजांनी केली, मग मी का रडावे ? मी का डरावे ? त्यांना साजेसा सुपुत्र मला व्हावयाचे असेल तर मलाही त्यांच्याप्रमाणे वागू दे. मर्द होऊ दे. त्यांनी तसे केले तर मला का करता येणार नाही ? हिंमत बाळगीन तर मीही तसे करीन- अशा प्रकारचे तेज कुलाभिमानापासून मिळते. कुलाभिमान कार्य करावयास आधी संधी देईल, धैर्य देईल. कुलाभिमान त्याचबरोबर कर्तव्यही दाखवीत असतो. कुलाभिमान ध्येय दाखवितो व ध्येयाकडे जाण्यासाठी आपणास स्फूर्ती व धैर्य देतो. माझे स्थान जितके ज्येष्ठ व श्रेष्ठ, त्या मानाने माझी जबाबदारी मोठी; त्या मानाने माझे कर्तव्यही अवघड व अधिक दगदगीचे. माझ्या कुलाची ज्या मानाने विशुध्दता व पवित्रता अधिक, त्या मानाने कष्ट सहन करण्याची, सत्व न गमावण्याची मजवरची जबाबदारी मोठी.
परंतु खर्या दृष्टीने जर आपण पाहिले तर आपणास दिसून येईल की, मनुष्यजन्माला येणे म्हणजेच मोठ्या कुळात जन्माला येणे. प्रत्यक माणसाने आपण मनुष्य आहोत, हे दाखवावे म्हणजे झाले. आपण पशू नाही, वृकव्याघ्रापरीस नाही, मर्कटचेष्टा करणारे वानर नाही, हे प्रत्येकाने दाखवावे म्हणजे झाले. मी मानवजातीत जन्मलेला- मी मानवजातीला कलंक लागेल असे वागता कामा नये. मी माणूस आहे, असे माझ्या माणुसकीने मला पटवून दिले पाहिजे. प्रत्येक मनुष्य तो मनुष्य म्हणूनच थोर आहे. त्याने ते सिध्द करावे म्हणजे झाले. सर्वांना सर्व काही शक्य आहे. कारण तो अनंत अपार परमात्मा, तो सर्व-स्वतंत्र, सर्व-पवित्र, सर्व-समर्थ परमात्मा सर्वांतर्यामी सारखाच भरून राहिलेला आहे, मनुष्यामनुष्यांमध्ये मनुष्याला फरक करू दे, भेद पाडू दे, श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवू दे. ईश्वराजवळ भेदभाव नाही. त्याने आपले दिव्यत्व सर्वांमधे ठेवलेले आहे व हे तो विसरणार नाही. ईश्वर मनुष्याला तुच्छ मानील तर स्वत:लाच त्याने तुच्छ मानले असे होईल. परमेश्वराने सर्वांच्याजवळ सदबीज दिले आहे. प्रत्येकाने ते वाढवावे. झगडण्याचा, धडपडण्याचा हक्क सर्वांना त्याने दिला आहे. ‘मामनुस्मर युद्ध्य च’ - माझे स्मरण राखून झगडत राहा, स्वत:चा विकास करीत राहा, अर्थात् हा झगडा त्याचे स्मरण ठेवून करावयाचा, म्हणजे अशा साधनांनी व अशा मार्गांनी झगडत राहावयाचे की, जी साधने व जे मार्ग परमेश्वराला प्रिय व मान्यच असतील. हे विश्वरणांगण मोकळे आहे. येथे परमेश्वराने शर्यत लावून दिली आहे. तो खेळ पाहात आहे. ह्या शर्यतीत आपण कोणता खेळ खेळावा, कोणते स्थान घ्यावे, हे ज्याचे त्याने ठरवावे व पाहून घ्यावे. सर्वांना मोकळीक आहे व स्वातंत्र्य आहे. सर्वांना सामर्थ्य दिलेले आहे.