हिंदुस्थानात व विशेषत: सर्वच पौर्वात्य देशांत भातशेतावर राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संघटना जन्म पावली आहेत. जेथे राष्ट्रीय विचार व राष्ट्रीय जीवन उभारली गेली, जेथे सहकार्याची शक्ती अजमावता आली- असे भारतीय कार्यक्षेत्र म्हणजे शेत होय. या शेतीच्या कामात अनेक कुटुंबेच्या कुटुंबे सामील होतात व एकमेकांची कामे उरकून टाकतात. एका मुख्य माणसाच्या देखरेखीखाली म्हातारे, तरणे, बायका, पुरुष, मुले- सारी जणे कामे करतात. सशक्त वा अशक्त मनात शक्तीचा विचारही न येता कामाला लागतात. सारे समान भावनेने झटतात. ते पेरणी करतात, आवण काढतात, लावणी करतात, भात कापतात, भारे बांधतात, उडव्या रचतात. कोणालाही असे वाटत नाही की आपण मोठे. कोणालाही असे वाटत नाही की, मी जास्त काम केले, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. कोणीही म्हणणार नाही, “ही युक्ती मी शोधून काढली.” कारण आपण इकडचे काढून तिकडे लावावयाचे- यासाठी कोणी युक्ती शोधून काढली तरी त्याला बक्षिसाची आशा नाही, काही नाही. सर्वांचा श्रम सारखा, सारख्याच उद्योगाचा, एकाच प्रकारचा. म्हणून तर खेडयांतील संस्था, पंचायती, कुटुंबपध्दती, निरनिराळे धंदे, जाती सारे टिकून राहिले. हिंदुस्थान हा लोकसत्ताक देश आहे. खेडी स्वतंत्रच होती. सर्वांची समान किंमत. सारे श्रीमंत काम करीत. वरती राजा-महाराजा कोणी असो. खेड्यातील संघटनेवर त्याचा परिणाम होत नसे. या संघटनेमुळे हिंदुस्थानने टिकाव धरला, नाही तर प्रचंड हल्ल्यांनी केव्हाच कोलमडून जाता. खेड्यातील ह्या साध्या परंतु प्राणमय संघटनेचे हे फार उपकार आहेत. पश्चिमेबरोबर तुलना करताना एकाच बाबतीत हिंदुस्थान कमी ठरतो. पश्चिमेकडे सामुदायिक संगीत आहे, सामुदायिक धर्म आहे. सामुदायिक जीवन अत्यंत गुंतागुंतीचे असूनही ते अत्यंत यशस्वी रीतीने तिकडचे लोक चालवीत आहेत.

युरोपातील कोणत्याही मध्ययुगीन शहराइतकेच बनारस शहर सुंदर आहे. या वाराणशी शहराशी तुलनेसाठी उभी राहतील अशी युरोपमध्ये एक-दोनच पुररत्ने आहेत. परंतु ज्याने ज्याने म्हणून युरोपमधील प्रार्थनामंदिरे पाहिली असतील, त्याला त्याला तेथे बहुविध विविधतेत कसे ऐक्य निर्मिलेले आहे, ते दिसून आल्याशिवाय राहिले नसेल. पाश्चिमात्य देशांतील प्रार्थनामंदिर म्हणजे केवळ एक टोलेजंग हवेल नसते. दक्षिण हिंदुस्थानांतील भव्य व प्रचंड मंदिरासारखेच ते असते. त्या मंदिरांतील दगडांवर व लाकडांवर नक्षी असेल; वस्त्रांचे सुंदर नमुने तेथे असतील; प्राचीन काळातील धातुकामाचे बहुमोल नमुने तेथे असतील; सुंदर ग्रंथसंग्रह तेथे असेल; तेथे वाजविणारे, गाणारे असतील. थोडक्यात काही लेखकांनी म्हटल्याप्रमाणे सर्व धंद्यांचे व सर्व कलांचे परमेश्वरासमोर ते प्रदर्शनच असते. म्हटल्याप्रमाणे सर्व मिळविले, याची ती प्रभूसमोर दिलेली जणू हजेरी होय. एक प्रार्थनामंदिर परंतु ते उभे राहावे म्हणून सारी विविधता एकत्र येऊन श्रमत होती. एका ध्येयाभोवती, एका वस्तूभोवती प्रभावळीतल्याप्रमाणे सार्‍या कला व सार्‍या विद्या हारीने उभ्या राहिल्या होत्या. अनेक विभिन्न सुरांतून एक दिव्य संगीत तेथे निर्माण केले जात होते. युरोपातील जनतेला आपण सारे एक आहोत व स्वतंत्रही आहोत, हा जो मध्ययुगाच्या अंती एकदम साक्षात्कार झाला, आपण जोडलेले असूनही विभक्त आहोत व विभक्त असूनही जोडलेले आहोत हा जो विचार त्यांना स्फुरला, तोच या मंदिराच्या रूपाने प्रकट झाला. अंतरीचे बाहेर धावले. युरोपमधील सरदारांची सत्ता जाऊन मध्ययुगांतील स्वतंत्र मोठी शहरे ज्या वेळेस उदयाला आली, त्याच वेळेस या प्रार्थना मंदिराचाही जन्म झाला.

गलबतावरील संघटनेने प्रार्थनामंदिरे बांधावयास शिकविले व प्रार्थनामंदिरे बांधावयास शिकून कारखाने व प्रचंड उद्योगधंदे बांधावयास युरोप शिकले. एक अनुभव दुसर्‍या अनुभवाला जन्म देतो. युरोपातील आजच्या संघटनेचे व शिस्तीचे स्वरूप पाहात पाहात असे मागे गेले म्हणजे मूळच्या लहान प्रवाहाचीच ही महानदी झाली आहे हे, व महानदीच आज सागराप्रमाणे होऊन जगाला वेढून बसली आहे हे सारे लक्षात येते. जे लोक लहान लहान कामे शिरावर घेऊन प्रामाणिकपणे, चिकाटीने, निष्ठेने व एकजुटीने तो पार पाडतात, त्यांना उत्तरोत्तर आणखी मोठी कामे शिरावर घेऊन पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त होत असते. गलबते नीट चालविणारे साम्राज्ये चालवू लागतात, प्रार्थना नीट चालविणारे प्रचंड कारखाने सांभाळू शकतात. कामे करुन शक्ती येते व त्या शक्तीने आणखी मोठी कामे. ह्याप्रमाणे व्याप वाढतो व व्यापाबरोबर वैभवही वाढते.

आपण भारतवासी मोठमोठी कामे शिरावर घेणार नाही का ? परंतु मोठ्या कामास लायक होण्यासाठी छोटया छोटया कामांत प्रामाणिक राहावयास शिकले पाहिजे. एखादे चाक, एखादा स्क्रू -परंतु त्याच्यावर सर्व यंत्राचे सुरळीत चालणे अवलंबून नसते. आपण जबाबदारी पार पाडण्यास शिकू या. आपापले नेमून दिलेले काम, शिरावर घेतलेली जोखीम पार पाडू या. आपली पत वाढवू या, विश्वास वाढवू या, स्वत:ची किंमत वाढवू या. कामे करीत गेल्याने किंमत वाढेल व आपली हिंमतही वाढेल. आपला शब्द दिला हेच नैतिक बंधन. “रघुकुल रीति सदा चलि आई । प्राण जाय पर वचन न जाई ।।” श्रीरामचंद्र व हरिश्चंद्र हेच आपले आदर्श. ज्याचा हात एकदा हातात घेतला, तो मृत्यूनेच वियुक्त केला जाईल. अशा रीतीने जर आपण कामे करीत गेलो, तर प्रत्येक कामांतून नवीन शक्ती उत्पन्न होईल, पूर्णपणे पार पाडलेले प्रत्येक कर्म राष्ट्राचे बळ वाढवील, राष्ट्राचे किल्लेकोट अधिकच बळकट करील.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel