सार्वजनिक जीवनात नाना प्रकारचे प्रयोग करण्याचा जो उत्साह, तो काय काय करू शकतो हे पाहावयाचे असेल, तर आपण पश्चिमेकडे वळले पाहिजे. यात कोणाचे दुमत होणार नाही असे वाटते. हिंदुस्थानात विचारांचे दर्शन जास्त सम्यक् कदाचित् होत असेल, परंतु ते विचार कृतीत कसे आणावे, सामाजिक संघटनेत कसे ओतावे, हे पाश्चिमात्यांनाच अधिक माहीत आहे. पाश्चिमात्यांच्या या अनुभवांचा आपण अभ्यास केला पाहिजे, मनन केले पाहिजे. निरीक्षण केले पाहिजे. सत्याचे दर्शन झाल्याशिवाय, सत्यज्ञान झाल्याशिवाय चूक कळून येत नाही व चूक कळलीच नाही, तर दूर कशी करता येणार ? सामाजिक बाबतीत सुधारणा केल्याच पाहिजेत किंवा जुन्यालाच चिकटून बसले पाहिजे असे काही नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे की, डोळे उघडून पहा व नीट समजून घ्या. केवळ नवीन म्हणून उतावीळपणे अविवेकाने ते घेणे, किंवा ‘जुने तेवढे सोने’ असे म्हणून नवीनाकडे ढुंकूनही न पाहणे या दोन्ही वृत्तित आग्रह आहे. जेथे आग्रह आहे. तेथे सत्यदर्शन नाही. बुध्दे फलं अनाग्रह:- कशाचाही आग्रह न धरणे हे तर बुध्दीचे फळ. विचाराला पटेल ते घेतले पाहिजे वस्तुस्थितीचे नीट आकलन होण्यासाठी पूर्वग्रहदूषित दृष्टी घेऊन चालणार नाही. पक्षपातात, निरहंकारी व निरपेक्ष, अशी शांत वृत्ती घेऊन विशाल दृष्टीने नवे व जुने, पौर्वात्य व पाश्चिमात्य पाहिले पाहिजे व जे योग्य वाटेल ते घ्यावयास निर्भयपणे तयार झाले पाहिजे.
युरोपमध्ये निरनिराळे प्रश्न कसे सोडवले जातात, त्याची आपल्या पध्दतीशी तुलना करू या. आणि यापासून काही शिकण्यासारखे असेल, घेता येण्यासारखे असेल तर शिकू या, आनंदाने घेऊ या.
धार्मिक गोष्टीच प्रथम घेऊ. हिंदुस्थानातील पूजा म्हणजे एक यजमान व एक उपाध्याय. हिंदुस्थानातील पूजेत सामुदायिक जीवनाची भावनाच नाही. त्याच्या उलट युरोपमध्ये बघा. तेथील धार्मिक प्रार्थना म्हणजे एक विशाल व भव्य संघटनाच असते. त्या कार्यात अनेकांचे सहकार्य असते. गाणारे, वाजविणारे, सांगणारे, म्हणणारे, प्रवचन करणारे सर्वांमिळून प्रार्थना होते. हिंदुधर्मातील संन्यासी घ्या. तो कोणतीही जबाबदारी न घेता या ठिकाणाहून त्या ठिकाणी असा भटकत राहतो व गुरूपासून मिळविलेले आपले वैयक्तिक ध्येय-त्याला वाढवू बघतो. पुष्कळ वेळा त्याच्या जीवनात दिव्यतेचेही दर्शन होते. कधी कधी तर परमोच्च वेयक्तिक विकास त्याच्या ठिकाणी प्रतीत होतो. परंतु नीट सुसंघटित रीतीने बांधलेले जे समाजरूपी मंदिर- त्या मंदिराचा तो भाग होऊ शकत नाही. कारण समाजाची शिस्त, बंधने व जबाबदारी तो घेऊ इच्छीत नाही, पाळू इच्छीत नाही. ज्याला समाजमंदिरात, समाजघटनेत नांदावयाचे आहे त्याने ‘मेलो तरी हरकत नाही, परंतु ही आज्ञा पाळीन, काहीही होवो ही जबाबदारी पार पाडीन, काहीही नुकसान होवो, मी वेळेवर हजर राहीन’ अशी बंधने पाळावी लागतात. नीट व्यवहार करू, चालरीत पाळू, सभ्यता दाखवू..... या सगळ्या गोष्टी सामाजिक जो घटक आहे त्याला अवश्य असतात. आणि भारतीय संन्यासी तर बंधनातील असणार. त्याला स्वत:ची काय बंधने असतील तेवढीच. समाजाची मानावयास तो तयार नसतो. युरोपमध्ये संन्यास सामाजिक जीवनाशी एकरूप होऊन गेला आहे. सामाजिक हिताहिताशी निगडित झाला आहे. संन्याशांनी लोकहिताच्या व लोककल्याणाच्या मोठमोठ्या चळवळी तिकडे केल्या. शेती करणारे व शेती शिकविणारे सिस्टरशियन् शिक्षणप्रचार करणारे डोमिविकन् व जेसुइट, नीतिप्रसार व भूतदयेचा प्रसार करणारे केवळ सेवामय असे फ्रॅन्सिस्कन हे सारे संन्यासी संघच होते. फ्रॅन्सिस्कन संन्याशांच्या उदाहरणानेच दवाखाने, रुग्णालये, आरोग्यधामे, स्वस्तिकमंडळे, शुश्रूषा करणारी सेविकापथके, रोगप्रतिबंधक संस्था, दुष्काळनिवारणमंडळे वगैरे सारे सेवेचे प्रकार युरोपमध्ये सर्वत्र रुढ झाले व आता सार्या जगभर पसरले. तसेच जेसुइट लोकांच्या शिक्षणाच्या कामावरच आजच्या युरोपातील मोठमोठ्या विद्यापीठांची उभारणी झालेली आहे. ही सारी सेवेची बीजे संन्याशांच्या संस्थांनी पेरली व आज त्यांचे विशाल वृक्ष झाले आहेत.