‘संन्यासी’ या शब्दांत आज आपणास नवीन अर्थ दिसेल. या शब्दात नूतन अर्थ आज ओतलेला आहे, या शब्दात नवीन तेज, नवीन विद्युत् संचरली आहे. भगवे वस्त्र ही अत:पर संन्यासाची खूण नसून त्याग ही त्याची खूण झाली आहे. आज संन्यास अनेक ठिकाणी दिसून येईल. शास्त्रसंशोधनातील संन्यासी, ज्ञानपूजक संन्यासी, कारखाने चालविणारी संन्यासी, राजकारण चालविणारे संन्यासी. अनाथालये चालविणारे संन्यासी, शाळा चालविणारे संन्यासी, स्थानिक राज्यातील संन्यासी, गोरक्षण करणारे संन्यासी, विधवांचे अश्रू पुसणारे संन्यासी, पतित स्त्रियांची चिंता वाहणारे संन्यासी, - सर्वत्र संन्याशांची आज जरुरी आहे व ते दिसून येत आहेत. जीवनाच्या सार्‍या क्षेत्रांतून संन्याशांची जरुरी आहे संन्यासाची भावना, त्यागाची भावना परम थोर आहे. जो आजन्म संन्यस्त वृत्तीने राहून ध्येयपूजा करील, त्याचे जीवन तर फारच थोर. त्यागाची क्षणिक चमक, झळकफळक नको. सतत टिकणारी व उत्तरोत्तर वर्धमान होत जाणारी अशी त्यागाची ज्वाळा पाहिजे आहे. जो महात्मा असतो तो शिपाईही असतो व संन्यासीही असतो. कोणती वृत्ती त्याच्या ठिकाणी आधिक्याने असते हे सांगणे कठीण. शिपायांचे शौर्य व साहस आणि संन्याशाची नि:संगता ही त्याच्याजवळ असतात. वाढत्या वयाबरोबर त्याचा उत्साहही वाढत जातो. केस पिकतात, तशी त्याची बुध्दीही परिपक्व होते- परंतु कधी नासत नाही. वृध्दावस्थेचा, अशा महात्म्याच्या बाह्य शरीरावर जरी परिणाम झाला तरी त्याची बुध्दी तरतरीत असते, हृदय ओलेच असते. असा महापुरुष तरुणपणातल्याप्रमाणे वार्धक्यातही ताडाच्याझाडावरून खाली उडी घेण्यास तयार असतो, आकाशात उड्डाण करावयास उत्सुक असतो. संन्यासी खरा, परंतु त्याचा आशावाद अमर असतो. वाढत्या वयाबरोबर त्याची आध्यात्मिक शक्तीही वाढत जाते; त्याची इच्छाशक्ती वाढत जाते. त्याच्या कोणत्याही कार्यात स्वार्थ नसतो व म्हणून त्याला भीती नसते. माझे काय होईल, माझे कसे होईल, मला काय मिळेल, मला किती मिळेल- याची विवंचना करणार्‍याकडून महाकार्ये उठत नसतात. परमोच्च ध्येय सर्व गोष्टींचा स्वाहाकार करण्यास मागेपुढे पाहात नाही. तो महात्मा ध्येयसिध्दीसाठी सारे पणास लावतो. त्याच्या मनात स्वार्थ कधी डोकावतच नाही. ही संस्था मी वाढविली, हिचा होम ज्या हातांनी मी वाढविला त्याच हातांनी कसा करू ? असा क्षणभरही आसक्तीचा विचार त्याच्या मनाला शिवत नाही. ध्येयासाठी वाढलेला सारा संसार- त्याला तो हसत आग लावतो व एक सुस्काराही सोडीत नाही. एकदा कामाला हात घातला की ते काम संपेपर्यंत त्या महापुरुषाचा हात मागे येत नाही, तेथेच तो हात दृढावत जातो. संन्याशाला माघार माहीत नाही. दैन्य व दु:खाची बाधा कधी त्याला होत नाही. दैन्य-दु:ख-निराशा त्याल पाहून दिगंतांत पळून जातात. पराजय म्हणजे    क्षणांत निघून जाणारे ढग असे त्याला वाटते. अंतिम विजयसूर्य तळपणार, ही त्याची दृढ श्रध्दा असते. परंतु त्या विजयाचीही हुरहूर नाही. पराजयाने असा महात्मा होरपळत नाही, यशाने हुरळून जात नाही. जयापजय येवोत. प्रयत्न फळो वा जळो, तो चळत नाही. अभ्रांचा ज्याप्रमाणे गगनाच्या गाभ्याला स्पर्श होत नाही-ती येतात जातात त्या गगनाप्रमाण सुखदु:खाचा, जयपजयांचा साक्षी होऊन असा महात्मा कर्म करीत राहतो.

आणि गुरुभक्ती म्हणजे काय ? तिचाही नवीनच अर्थ. ध्येयसिध्दीसाठी तळमळत असणे, ध्येयासाठी अधीर होणे वेडे होणे म्हणजे गुरुभक्ती. ध्येयसिध्दी कशी सत्वर होईल या तळमळीने नाना साधने, नाना उपाय धुंडाळणे म्हणजे गुरुभक्ती. तसेच मिळविलेली प्रत्येक सिध्दी म्हणजे आत, आध्यात्मिक विजयच. ज्याप्रमाणे गुरु आपला अनुभव शिष्याला देतो. त्याप्रमाणे राष्ट्रही आपले मागील अनुभव भावी पिढीला देत जाईल. भावी पिढीला देता येण्यासारखे अनुभवांचे ठेवे जोपर्यंत आपण मिळवीत नाही, तोपर्यंत आता विश्रांती नाही. त्याचप्रमाणे शिस्त व संयम यांचेही महत्त्व म्हणजे गुरुभक्तीचेच-ते अंग. जो मुमुक्षू आहे, जो आरुरुक्षू आहे, त्याने प्रथम सेवा केली पाहिजे. भरपूर सेवा केल्याशिवाय सत्याचा अंकुर त्याच्या हृदयभूमीत फुटणार नाही. ज्याला वर चढण्याची इच्छा आहे तो भक्त पाहिजे, सेवक पाहिजे. भक्त झाल्याशिवाय मुक्त होता येत नाही. आज्ञा पालनाशिवाय आज्ञा करण्याचा अधिकार मिळत नाही. पूजेशिवाय, निष्ठा व श्रध्दा यांच्याशिवाय पुरुषार्थप्राप्ती होणार नाही. जरा जर तुमच्यात दंभ असेल, अगदी इवलीही जर स्वार्थाची दुर्गंधी असेल, तर ‘ज्याच्यासाठी गुरु तळमळत असतात, तो हा चेला नाही’ असे गुरु पटकन् समजून घेईल. गुरुला त्या चेल्याला दूर करावे लागेल. आपलाच हात, आपलाच पाय तोडून टाकण्यासारखे जरी ते कठोर कर्म वाटले तरी, सडलेला अवयव कापून काढण्याखेरीज गत्यंतर नसते.

प्रेम व तिरस्कार ह्या आता प्रचंड शक्ती झाल्या पाहिजेत. प्रेम जेव्हा नि:स्वार्थ व अनासक्त असते तेव्हा ते अत्यंत बलवान् असते. ते प्रेम दुसर्‍याला जागृती देते, स्फूर्ती, जीवन देते. तिरस्कार म्हणजे तडजोडीसाठी तयार नसणे. क्षुद्रता व असत्य यांची पाळेमुळे उपटून फेकून द्यावयाची; त्यांना बिलकूल थारा द्यावयाचा नाही. जे असत्य आहे, दांभिक आहे, क्षुद्र व नीच आहे त्याच्याशी कसली तडजोड? जे जे सत्य आहे, उत्कृष्ट आहे, तळमळीचे आहे, त्यांच्या पाठीमागे नेहमी एकच हेतू असणार हे प्रेमाला आता समजून येईल. खरा स्वाभिमान हा असत्यावर, पापमय गोष्टीवर उभा राहण्यास तयार नसतो. सत्याच्या पायावर, स्वाभिमान शोभतो. सत्याचीच बैठक खर्‍या स्वाभिमानाला लागत असते. जोपर्यंत मनुष्य प्रत्यक्ष काही करून दाखवीत नाही, तोपर्यंत तो आता मुका राहील; खोटी अहंता तो मिरवणार नाही. खरा स्वाभिमानी मनुष्य केवळ आपल्य पूर्वजांची किंवा आपल्या मित्रांची शेखी मिरवून आपण मोठे आहोत, असे दाखविणार नाही. तो पूर्वजांची किंवा मित्रांची बढाई मारणार नाही; अशा मोठ्यांचा मी म्हणून मोठा, असे सांगणार नाही. खर्‍या स्वाभिमानी पुरुषांच्या महनीय आकांक्षांत उज्ज्वल नम्रता असते, तेजस्वी विनय असतो. नालायक लोकांच्या तोंडची स्तुती म्हणजे सर्वात मोठा अपमान हे तो समजून असतो व म्हणून स्वत: काही करून दाखविल्याशिवाय, पूर्वजांस व स्वत:च्या मित्रांस शोभेसे स्वत:चे जीवन झाल्याशिवाय तो त्यांची पोकळ स्तुतिस्तोत्रे गात बसत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel