काही लोक भारताच्या भूतकाळाकडेच सदैव दृष्टी ठेवून प्रयत्न करीत असतात; तर काहींची दृष्टी भविष्यकाळावरच खिळलेली असते. आपणाला दोन्ही दृष्टींची जरुरी आहे; परंतु त्यातल्या त्यात डावे-उजवे पाहावयाचे झाले, तर दुसरी दृष्टी ही अधिक महत्त्वाची आहे. भूतकाळाची जरुरी आहे. कारण भूतांतूनच भविष्य निर्माण होते. भूतकाळ हे भविष्यकाळाचे बीज आहे. पेरलेल्या दाण्यांतूनच उद्याचा अंकुर फुटणार, पंरतु बीज जरी पेरले असले तरी त्याला पुढे कोणते वळण द्यावे, अंकुरास कोणत्या दिशेने वाढवावे, या बीजाला कोणते खत घातले असता अंकुर तेजाचा येईल, भावी वृक्ष जोमदार होईल, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. खरे शिक्षण हे उपहासाने मिळत नसते; एकमेकांचे उणे पाहून, शिव्याशाप देऊन मिळत नसते; ज्या गोष्टींची आपणांस तहान आहे, ज्या गोष्टींसाठी आपली सारी धडपड आहे, त्या गोष्टी ज्याला अधिक नीट कळतात, अधिक पूर्णपणे त्या ज्याला माहीत आहेत, तोच आपला खरा शिक्षक होय व तोच आपणास तयार करतो. आपण जो प्रयत्न करीत आहोत, तो बरोबर आहे का चुकत आहे, आणखी काय केल्याने तो प्रयत्न अधिक सुंदर व यश:शील होईल, हे शिक्षक दाखवून देत असतो. आपले खरे स्वरूप काय हे जो आपणास समजावून सांगतो व जीवनाची दिशा आपणास दाखवून आशा देतो, तोच खरा शिक्षक.
राष्ट्राचे व्यक्तीसारखेच आहे. राष्ट्राची सदैव निंदा करून राष्ट्र वर चढत नसते. आपली स्वत:ची उगीच निंदा करून घेणे म्हणजे ती आत्महत्या आहे. निंदा म्हणजे महान हत्या होय. आपण वाईट, आपले पूर्वज वाईट, आपला धर्म वाईट, संस्कृती वाईट असे म्हटल्याने आपणच आपल्या पायांवर कुर्हाड घालून घेत असतो. पाय तुटल्यावर, पांगळे झाल्यावर प्रगती कशी करणार? ज्याचा भूतकाळ कुचकामाचा व अपेशीचा ठरला, त्याला भविष्यकाळच नाही. निस्सारच जर भूतकाळ असेल व त्याच्यावरच जर आपण भविष्यकाळ उभारू पाहू, तर तो गडगडून खाली येईल. कच्च्या पायावरचे, बाजूवर बांधलेले घर टिकणार कसे ? शिकावयास लागण्यापूर्वी शिकणार्या मधील दिव्यता आपण प्रथम पाहिली पाहिजे. सेवा म्हणजे पूजा आहे; भूतदया म्हणजे पूजा आहे; शिक्षणही त्याचप्रमाणे पूजा आहे. तुमच्यामध्ये स्वतंत्र, विशुध्द, सर्वशक्तीमान व शाश्वत-सुंदर असे आत्मतत्त्व मला दिसते, व ते प्रकट होण्याच्या बाबतीत असणारे जे अडथळे ते दूर करण्याच्या कामात मी तुम्हास मदत करावयास येतो - म्हणजेच शिक्षण- म्हणजेच सेवा म्हणजेच सर्व काही. जर सर्व मानवजात तुमच्यात साठलेली नसेल, सारे ब्रह्मांड तुमच्या पिंडी भरलेले नसेल, तर आमच्या प्रयत्नांनी काय होणार आहे ? बीजामधला टपोरेपणा दिसतो व म्हणून आपण पाणी घालतो. मनुष्यातील दिव्यता दिसते व आपण ती प्रकट व्हावयास मदत करतो. तुमच्या जीवनभमीत काहीच नसेल, तर कितीही खणले तरी दगडमाती शिवाय आमच्या हातात काय येणार ? तुमच्या जमिनीत ठेवा नसेल, जुने ठेवणे नसेल तर तुम्ही-आम्ही कितीही प्रयत्न केले तरी काय मिळणार ? ते प्रयत्न निष्फळ होतील.
व्यक्तींच्या प्रगतीप्रमाणेच राष्ट्रांची प्रगती असते, समाजाची प्रगता असते. प्रगती व्हावयास, विकास व्हावयास ध्येय डोळ्यांसमोर स्वच्छ दिसले पाहिजे. आज दोन पावले या रस्त्याने, उद्या त्या रस्त्याने, असे धरसोडीचे वर्तन केल्याने प्रगती तर होत नाहीच, उलट निराशा पदरी येते. कष्ट भरपूर पडूनच्या पडून, उत्साहशक्ती खर्च होऊनच्या होऊन पदरात फळ नसते. पुन्हा जागच्या जागीच मनुष्य येऊन बसतो. ध्येय ठरले पाहिजे व त्या ध्येयासाठी भूतकाळात जे प्रयत्न झाले असतील, त्या प्रयत्नांबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. यामुळेच ज्या ज्या महान चळवळी होतात; त्या चळवळींतूनसुध्दा थोडे तरी पुराणप्रियत्व असतेच असते. पूर्वेतिहासाबद्दल भक्ती थोडी तरी त्या चळवळींतून दिसून आल्याशिवाय राहणार नाही.