ज्या माणसाचे जीवन उंदीरघुशींच्या जीवनाप्रमाणे आहे, जो क्षणापुरतेच पाहतो, या चालू क्षणासाठीच जो जगतो, या क्षणी हे खाल्ले, पुढच्या क्षणी ते खाईन असे ज्यांचे जीवन चालले आहे, ते जीवन अनिर्बंध, स्वच्छंद, सूत्ररहित व विस्कळीत आहे; आणि ज्या माणसाच्या जीवनाचे सारे क्षण एकाच ध्येयासाठी खर्च होत आहेत, ज्याच्या जीवनात हेतुमयता आहे, सूत्रबध्दता आहे, संयम आहे असे जीवन. अशा या दोन जीवनांमध्ये जमीनअस्मानाचे अंतर आहे. केवळ भोगमय जीवनापेक्षा “भरि भरि उदर विषयकों धावी जैसे सुकर ग्रामी” अशा जीवनापेक्षा, चुकीच्या ध्येयासाठी का होईना परंतु सूत्रमय व हेतुमय जे जीवन, वैचारिक असे जे जीवन, ते शतपटींनी, अनंत पटींनी थोर आहे. स्वार्थ व सुख विलास यांच्यात जो दंग आहे, यासाठीच ज्याची सारी शक्ती व साधने खर्च होत आहेत अशा माणसाजवळ सैतानाची सारी शक्ती जरी असली व त्याचा वरचा दिमाख जरी दिपविणारा असला तरी त्याच्यापेक्षा संतांचा मागोवा घेत जाणारा, संतांच्या पावलावर पावले टाकून जाण्याची धडपड करणारा, अत्यंत दरिद्री व हीनदीन मनुष्यही श्रेष्ठ व थोर आहे. बाह्य देखाव्याने आपण कधीही भुलून जाता कामा नये. बाह्य लखलखाटाने दिपून जाता कामा नये. ह्या जीवनात विवेक नाही, विचार नाही. ते जीवन पै किंमतीचे समजावे. ज्या जीवनात केवळ विकाराचा धांगडधिंगा आहे ते काय कामाचे ? सर्व सद्गुणांवर झळकणारी आध्यात्मिकतेची झिलई म्हणजे विवेक होय.

जो खुशाल एकदम देऊन टाकतो, जो मागेपुढे पाहत नाही, त्याची तरुण लोक स्तुती करतात; त्यांना तो प्रिय वाटतो. कोणाही सोम्यागोम्याने येऊन मागताच जो मनुष्य कधी कधी देण्याचे नाकारतो व नकाराचे जो कारणही सांगू इच्छीत नाही, असा मनुष्य आपणास आवडत नाही. मागितल्याबरोबर जो देतो तो खरा उदार, तो खरा मोठ्या मनाचा, असे आपण मानतो. परंतु सात्त्विक दानाची श्रीमदगीता जी व्याख्या करते, ती तर अशी आहे की, देशकाल पाहून, योग्य माणूस पाहूनच दान द्यावे. देशे, काले च पात्रे च अशा मर्यादा गीतेने घातलेल्या आहेत. विवेकपूर्वक दिलेली लहानशीही देणगी अविवेकाने दिलेल्या मोठ्या देणगीपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अविवेकाने देणारा आपण कोणाला देतो, आपण कोणाला देतो, त्याचे परिणाम काय होतील, ह्या गोष्टी पाहात नाही.

मनुष्य देहाला भजतो की आत्म्याला भजतो, इंद्रियाची पूजा करतो की ध्येयाची पूजा करतो, आपले जीवन विलासाला अर्पण करतो की विकासाला यावरून त्या त्या माणसाची विवेकशक्ती दिसून येते. मनुष्याचे खालचे किंवा वरचे स्थान यावरूनच ठरविले जाते; ठरविले गेले पाहिजे. ज्या गोष्टींना आपण आपले सर्वस्व देतो, ज्या गोष्टींची आपण पूजा करतो त्यावरून आपण किती पूज्य आहोत, आपली काय लायकी आहे, ते तात्काळ दिसून येते. बायबलमध्ये एका राजाची गोष्ट आहे. त्या राजाने स्वत:चा एक सोन्याचा पुतळा करवून घेतला व सर्व जगाने त्या पुतळ्याची पूजा करावी म्हणून सार्वजनिक ठिकाणी तो स्थापिला. परंतु तो राजा पुढे कशाने तरी भ्रमिष्ट व वेडा झाला आणि गुराढोरांबरोबर रानात चरावयास जाऊ लागला ! त्याच्या जगाला दिपवू पाहणार्‍या झुलवू पाहणार्‍या अहंकाराच्या खाली अत्यंत अनिर्बंध व नीच अशी पशुता झाकलेली होती. ह्याच राजाने एके दिवशी एक नवीन धर्म स्थापन केला व लगेच चतुष्पाद जनावरांप्रमाणे हातापायांवर चालू लागला ! अशा अहंकारी व विषयपंकात बरबटलेल्या किड्यापेक्षा, या द्विपाद मनुष्याकरता वावरणार्‍या पशूपेक्षा मनुष्य गरीब व हलक्या जातीचा का असेना, तो जर प्रामाणिकपणे, अंत:करणपूर्वक त्यागाच्या मार्गाकडे जाण्यासाठी झटत असेल, संयमासाठी तडफडत असेल, प्रेम देण्यासाठी जगत असेल, तर तो शतपटीने थोर आहे. गरिबी हा काही गुन्हा नाही. गुन्हा जर कोणता असेल तर तो मनुष्य असून पशूसारखे वागणे, मनुष्य असून माणुसकी न दाखविणे हा होय. म्हणून मानवजातीच्या उध्दारासाठी सदैव झटणार्‍या व जळणार्‍या संतांनी पुन:पुन्हा ही गोष्ट सांगितली आहे की, “मनुष्याची पात्रता त्याच्या संपत्तीवर किंवा समाजातील त्याच्या स्थानावर नाही. माणसामाणसांमधील खरे अंतर संपत्ती व सत्ता, कुलशील व दर्जा यांनी दाखविले जात नाही; त्या दोघांजवळ संयम किती आहे, त्याग व विवेक किती आहे, यावरून त्यांच्यातील फरक ओळखावा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel