आजे पुन्हा सत्याचे रणशिंग आपल्यामध्ये वाजविले जात आहे. पुन्हा एकदा भारतवर्ष जागा होत आहे. आपल्या इतिहासात ज्या ज्या वेळेस उज्ज्वल काळ यावयाचा असतो, त्या त्या वेळेस धर्म आधी पुढे येतो. धर्माचे वैभव प्रथम दिसू लागते. तो काळ पुन्हा येत आहे. हळूहळू पण निश्चितपणे येत आहे. भारताचा प्राचीन विचार नवविचारांत घुसेल व नवविचार प्राचीन विचारात मिसळून जाईल, तेव्हा भारतीय नवयुगाला सुरूवात होईल व अर्वाचीन काळातील ही फार महत्त्वाची व दूरवरचे परिणाम घडविणारी गोष्ट झाली असे इतिहासज्ञांस व मर्मज्ञांस वाटेल.
परंतु सध्या आपण काय करावयाचे ? भारताचे प्राचीन विचारभांडार सार्या जगाला देऊन आपण भिकारीच रहावयाचे की काय ? जगाला श्रीमंत व समृध्द करून आपण करंटे व हतपतितच राहावयाचे की काय ? तसे जर राहावयाचे नसेल व बलशाली व्हावयाचे असेल तर त्याला मार्ग कोणता, उपाय कोणता ? कर्मद्वारा मोक्षप्राप्ती, कर्मद्वारा ब्रह्म हा तो मार्ग होय. आजच्या युगात आपण आपले तत्त्वज्ञान यशस्वी करून दाखविले पाहिजे. विज्ञानाच्या मैदानावर जाऊन तेथेंहि भारतीय तत्त्वज्ञानाने विजयी ठरले पाहिजे. भारतवासीयांचे हे काम आहे. प्राचीन भारतीय विचारांची भव्यता व सत्यता पटवून द्यावयाची ही जबाबदारी आपणांवर आज आहे. काळपुरुषाने सर्व राष्ट्रांना आपापले विचार घेऊन येण्यास बजाविले आहे. तो हातात तराजू घेऊन बसला आहे. आपण आपले विचार वजनदार व सारभूत आहेत, सत्य, भरीव व कसदार आहेत, हे पटवून देऊ या.
दुसरेही एक महत्त्वाचे काम आपणास करावयाचे आहे. जसजसे नवीन ज्ञान मिळवू, तसतसे ते आपलेसे करू. अशा संतत साधनेनेच आपले ज्ञान यथार्थ होईल. अशानेच ज्ञान कर्मात प्रकट झाले म्हणजे त्यालाच सद्गुण म्हणतात. सॉक्रेटिस ज्ञानाची व्याख्या अशीच करी. ज्ञान म्हणजे वाचन अशी तो व्याख्या करीत नसे, तर ज्ञान म्हणजे सद्गुण अशी व्याख्या तो करी. असा आजचा हा कार्यक्रम आहे. ही धडपड आहे. या कर्मावर, ह्या आजच्या धर्मावर सारे लक्ष द्या. या गोष्टीने वेडे व्हा. असे केल्यानेच नवीन आध्यात्मिक स्नायू, नवीन आध्यात्मिक बाहू आपणास मिळतील; असे केल्यानेच आपल्या पायांना पंख फुटतील व आपण चिखलात रुतून न बसता नीट उड्डाण करू.