विचारांचा विकास ही गोष्ट फार भव्य व थोर आहे. माणसे मरून विचारच जगावयाचे असतात. जीव सान्त आहे, परंतु ज्ञान अनंत आहे. ज्ञानाला अंत नाही, विचाराला अंत नाही. त्याचा सारखा विकासच होत जातो. एकेका विचारासाठी, एकेका कल्पनेसाठी माणसे आपली जीवने देतात. कल्पना जगावी व वाढीस लागावी म्हणून हजारो स्वप्राणांचे खत घालतात. शतकापाठीमागून शतके जातात व अनेकांच्या प्राणार्पणामुळे ती ती ध्येये, ते ते विचार बलवान् होत जातात. ब्रह्मचर्य, साक्षात्कार, प्रेम, स्वातंत्र्य, ज्ञानोपासना, सत्यनिष्ठा, वचनपालन- शेकडो ध्येये- व ती जगात वाढविण्यासाठी, त्यांना मानवी समाजात दृढमूल करण्यासाठी लाखो जीवांनी बलिदान दिले व पुढे देतील.

आपण मरून गेलो तर आपल्या पाठीमागे त्या सत्याचे काय होईल, असे मनात आणून कष्टी नको होऊ. ‘ज्या सत्याने, ज्या थोर विचाराने तुला मरण्याची स्फूर्ती दिली, तो आणखी हजारोंना अनंतकाल अशी स्फूर्ती देतच राहील.’ हजारोंना ओढण्याची शक्ती त्या विचारात आहे. तुझ्या मरणाने सत्याचे काही नुकसान होणार नाही. सत्य दुबळे व अनाथ होणार नाही. तू आपले जीवन दिलेस. मग त्यात काय मोठेसे झाले ? ते देण्यासाठीच मुळी होते. काय तो विचार तू निर्माण केला होतास ? तू त्या विचारबाळाचा जन्मदाता आहेस ? म्हणून तुला त्याची चिंता वाटते ? चिंता सोड. विचारस्त्रष्टयांच्या जीवनार्पणानेच त्यांचा विचार वैभवशाली होती, श्रीमंत व बलवान् होतो. तुमचा विचार वाढावा म्हणूनच तुम्ही मरा. तुमच्या मरणांतून जीवन मिळेल. तुमच्या पाठीमागे, तुमच्या मरणानंतर, तुमच्यामधून अनंताचा प्रकाश जर प्रकट होणार असेल तर काय जगण्यात अर्थ ? तो प्रकाश दिसावा म्हणून कधीकधी हे मडके फोडण्याची; हे वस्त्र फाडण्याची जरूरी नसते का ?

मरणकाळच्या एक क्षणात मनुष्याचे खरे आंतरिक जीवन प्रकट होत असते. जीवंतपणी जे आपले स्वरूप लोकांना कळले नाही, किंवा स्वत:लाही कळले नाही ते मरताना कळून येते. अजामीळ जन्मभर वाईट वागताना दिसला, परंतु मरताना एकदम त्याची दिव्यता प्रकट झाली. संभाजीचे स्वरूप त्या शेवटच्या अग्नि दिव्याच्या वेळी जसे त्याला स्वत:ला न् महाराष्ट्राला व जगाला दिसले, तसेच पूर्वी कोठे दिसले होते ? कितीदा तरी अशा गोष्टी दिसतात. जीवनातील सारी प्रकट वा अप्रकट श्रध्दा त्या मरणाच्या वेळेच्या क्षणात भरून राहते. मृत्यू पवित्र करतो, पावन करतो; स्वत:ची ओळख जास्तच यथार्थपणे करून देतो. मरणकाळी मनुष्याचे क्षुद्र देहस्वभाव जणू लुप्त होतात व त्याचा खरा मोठेपणा दिसून येतो. त्याच्या हृदयातील खरा गाभा पाहावयास मिळतो. समकालीन लोकांसमोर त्या मरणार्‍या महापुरुषांचा दुबळेपणा त्यावेळेस नसून, त्याची सारी भव्यता, त्याचा सारा मोठेपणा त्यावेळेस उभा असतो. मनुष्याचा प्रकट मोठेपणापेक्षा त्याचा अप्रकट मोठेपणा कितीतरी पटींनी मोठा असतो व मरताना त्याची सर्वांना कल्पना येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel