अवतारी पुरुष समाजात जन्मास येणे हा चमत्कार नाही. ही एक अपरिहार्य गोष्ट आहे. भटकणारे लोहकण चुंबकाभोवती जमा होतात. भटकणारे ग्रहोपग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालू लागतात. मानवजातीच्या भ्रमंती करणार्या भावनांना, अस्थिर व चंचल विकारांना व विचारांना स्थिरता देण्यासाठीच अवतारी पुरुषाची नितांत आवश्यकता असते. आपल्यामधील पतितांतील पतित, हीनांतील हीन, यांनाही अवताराची आवश्यकता आहे. अवतारी पुरुष निर्माण करण्यात त्यांचाही भाग असतो; त्यांनाही त्याचे श्रेय असते. आपले सर्वांचे प्रयत्न, आपल्या सर्वांच्या धडपडी, पतितांच्या वा पावित्र्यांच्या, तो अवतारी पुरुष निर्माण झाल्याने सफळ होतात. आपल्या सर्वांच्या लहानमोठ्या चुकतमाकत होणार्या धडपडींची बनणारी, बनत बनत येणारी जी प्रचंड लाट, हेलकावणारी काळीसावळी अस्थिर चंचल लाट- तिच्यावरचा शुभ्र स्वच्छ फेस म्हणजे महापुरुष होय. आपल्या या प्रयत्नांमुळे आपण महापुरुषांशी जोडले जातो. आपल्याच चिंतनाचे व श्रमांचे फळ म्हणून तो प्रकट झालेला असतो. आपले क्षुद्र प्रयत्नही आपणास महापुरुषाकडे घेऊन जातात; त्याच्या कार्यात, त्याच्या जीवनात भागीदार करतात. सेतुबंधनात वाळूचे अंगाला चिकटलेले कण नेऊन झाडणारी खारकुंडी हिचाही भाग आहे. रामाच्या कार्यात तिलाही स्थान आहे. रामाशी हनुमानाप्रमाणे तीही जोडली गेली. कळत वा नकळत आपले सारे लहानमोठे प्रयत्न, आपली सर्व कर्मे व आपले सर्व विचार आपणास अवतारी पुरुष व त्यांचे महान कार्य यांच्याशीच जोडीत असतात. लहानमोठे सारे ओहोळ, पवित्र ओहोळ किंवा गाळीचा लेंडओहळ महान नदीला मिळण्यासाठीच चालले आहेत; व ती महान गंगा नदी त्यांना सागराकडे घेऊन जाणार आहे. आपणास ही दृष्टी एकदा आली म्हणजे मग उत्तरोत्तर अधिक काम करावे, असे आपणास वाटू लागेल. “माझा कार्यभार कमी कर” अशी प्रभूला प्रार्थना करीत न बसता “काम करावयास अधिक सामर्थ्य व उत्साह दे, उदंड कामे करू दे,” अशी प्रार्थना आपण करावयास लागू. मग आपण म्हणू, “हे देवा, मला शांती नको, मला बळ दे.” मनाची शांती हा अभ्यास व सवयीचा, संयमाचा व विवेकाचा परिणाम आहे. परंतु दुबळ्याला खरी शांती असू शकत नाही. अनंत सागर अनंत लाटांनी हेलकावत असतो, परंतु अंतरी गंभीर असतो; भगवान विष्णू सहस्त्र फणांच्या शेषावर शांतपणे पडून राहतात; भीष्म शरपंजरावर शांत होते; हरिश्चंद्र आगीत घातला जात असता शांत होता; सुधन्वा तप्त तेलात तळला जात असता कमळाप्रमाणे हसत राहिला. बळाशिवाय शांती नाही-जर खरे बळ, खरा निश्चय, खरी श्रध्दा ही असतील तरच खर्या शांतीचा आनंद उपभोगता येतो, ज्या जीवनतरूला अलोट श्रध्देची व अपार सामर्थ्याची बळकट मुळे आहेत. त्याच जीवनतरूला खर्या शांतीची फळे लागतात. दुर्बळाला व निराश जीवाला शांती नाही, समाधान नाही, काही नाही.
शारीरिक अहंकार, हा देह म्हणजेच मी, या गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, या कल्पना जो उराशी धरून बसला आहे, त्याची दृष्टी स्थूल असते. बाह्य विषयांवर, बाह्य सुखदु:खावर त्याची दृष्टी खिळलेली असते. पार्थिवाच्या पलीकडे त्याची दृष्टी भेदून जात नाही. “त्यांनी मला मारले, ते माझी निंदा करतात, त्यांनी वाईट म्हटले, त्यांनी टीका केली,” असल्याच क्षुद्र अनुभवात तो एकरूप झालेला असतो; गुरफटून गेलेला असतो. या सुखदु:खाच्या, मानापमानाच्या पंकिल पल्वलात तो बरबटलेला असतो व तेथूनच बोंबलत असतो; परंतु ज्याचा अहं परब्रह्मात मिळून गेला, ज्याचा जीव शिवात मिसळला, ज्याने आपला जीवनबिंदू त्या महान जीवनसिंधूत मिसळून दिला, त्याच्या वार्यालादेखील असल्या क्षुद्र गोष्टी, ही चिरचिर व ही रडारड, दुसर्यांच्या शिव्या वा स्तुती उभ्या राहत नाहीत. फारच झाले तर या गोष्टींचा तो साक्षी बनतो. आकाशात ढग येतात व जातात; वादळे उसळतात व शांत होतात; परंतु आकाश निळे निळे, शांत अखंड वर पसरून राहिलेच आहे. ही वरची वादळे वरच विरून जातात. ती आकाशाला भेदून आत शिरत नाहीत. थोर महात्म्यांची वृत्ती अशीच गगनाकार असते. दु:खे, संकटे यांची त्यांना भीती वाटत नाही. आपल्या हृदयाकाशाची परीक्षा पाहावयास आलेले हे ईश्वरी दूतच आहेत, या भावनेने तो कष्टक्लेशांकडे पाहतो. द:खाची काळी घोंगडी वरून पांघरुन आलेला हा आत मुरलीधर सावळा श्रीकृष्णच आहे हे तो जाणतो व बाहू उभारून या दु:खाचे स्वागत करावयास पुढे येतो. दु:खांना, विपत्तींना तो हृदयाशी धरतो. या आपत्तीचे स्वागत करावयास उभे राहा, घाबरू नका असे भीतिग्रस्तांस तो धीर देत सांगतो व आपण स्वत:पुढे होतो. परमेश्वर नाना रुपांनी नटून येईल. तो कधी प्रियकर म्हणून येईल, कधी छळकर म्हणून येईल; तर कधी भिकारी म्हणून येईल, कधी राजराजेश्वर म्हणून येईल; कधी रुद्र म्हणून येईल, कधी शिव म्हणून येईल. या सर्व रुपांत तोच आहे, जीवनाचा पेला देणारा व मरणाचा पेला देणारा एकच आहे, हे ओळखणे हे आपले काम आहे. ही एकदा दृष्टी आली, हा लपंडावाचा खेळ खेळावयास जो शिकला, सर्व गोष्टीत लपलेल्या त्या नटमूर्तीला ओळखावयास जो शिकला, या सर्व विश्वाशी एकरूपता पाहावयास जो शिकला, त्याला जीवनात असहाय असे कधीच वाटत नाही. अनंत परमात्मा अनंत हातांनी मला कवटाळीत आहे, असे त्याला दिसते. चावणारा सर्व चुंबन देऊनच गेला असे त्याला वाटते, त्याला भय ना भीती. तो कोणाला भिणार ?