आपण फुललो ही बातमी कमळाला भ्रमराकडून कळावी, किती आश्चर्य ! परंतु आध्यात्मिक कार्ये अशीच निमूटपणे, नि:स्तब्धपणे घडत असतात. सृष्टी गाजावाजा करीत नाही. फुले किती मुकाटयाने फुलतात, जाहिराती लावीत नाहीत, फुलणार फुलणार म्हणून बातमीपत्रे पाठवीत नाहीत. शांतपणे परंतु अश्रांत श्रम. असे आध्यात्मिक श्रम, असे हे दिव्य श्रम फुकट जाणार नाहीत. त्याचे परिणाम दिसू लागतातच. फळे डोलतील, प्रकाश येऊन नाचेल, ज्याला साधने वापरता येतात, त्याच्याकडे साधन चालत येतात, यात संशय नाही. ज्याला ज्याची तळमळ, त्याला ते मिळेल. ज्याची जी लायकी त्याप्रमाणे त्याला ते मिळेल. जेवढे श्रम, व्यवस्थित व निरपेक्ष श्रम, तेवढा विकास. या जगात माझा वाटा काय ? माझे काम काय ? जय का पराजय ? मूर्ख कोठला ! धडपड हा तुझा वाटा, सारखे प्रयत्न एवढेच तुझे काम.
ज्या मानाने ध्येय मोठे व उच्च त्या मानाने पंथ बिकट व लांबचा असणार. प्रत्येक पाऊल लढत लढत टाकावे लागेल. तसू तसू जमीन रक्त सांडून जिंकून घ्यावी लागेल आणि इतकेही करून ज्यासाठी एवढी खटपट, ज्यासाठी मरावयाचे, ती गोष्ट अगदी क्षुद्रही असेल. तोफेला बत्ती देत असताना कित्येक शिपाई मरून पडतील. परंतु तो शेवटचा क्षण ? अत्यंत आणीबाणीचा कडोविकडीचा क्षण; त्या क्षणी तेथे आगीचा वर्षाव होत असता आपल्या तोफेजवळ अविचलपणाने उभे राहून तिची किल्ली फिरावयास पाठीमागची सारी तपश्चर्या लागत असते; पाठीमागचा सारा अभ्यास, सारा संयम, सारी शिस्त, सारी कवाईत ह्यांची त्या एका क्षणासाठी जरूर असते. ग्लॅडस्टन काय किंवा डार्विन काय, त्यांनी पुढे जी लोकात्तर बौध्दिक शक्ती प्रकट केली, ती का एकदम त्यांना प्रकट करता आली ? विद्यालयात, महाविद्यालयात असताना ते किती आस्थापूर्वक श्रम करीत होते. त्या पूर्वीच्या तपश्चर्येचे ते फळ होते. अपूर्व व लोकात्तर बुध्दी याचा अर्थ अश्रांत श्रम करण्याची पात्रता, एवढाच आहे. ग्लॅडसटनला रोजच्या कामात, शिकत असता वेळच्या रोजच्या अभ्यासात पार्लमेंटमधील भावी लढायाच दिसत असत. प्रत्येक दिवस लढाईचाच दिवस, असे वाटले पाहिजे. जो आजपर्यंत सुखविलासात लोळला तो वेळ येताच लढाईस कसा उभा राहणार ? मोठ्या लोकांना उपजतच मोठेपणाची स्वप्ने दिसत असतात. लहानपणी मिल्टन म्हणे, “मी मोठ्या कामासाठी जन्मलेला आहे.” या जाणीवेमुळे इतर मुले खेळत खिदळत असता मिल्टन होमरच वाचीत बसे, भावी महाकाव्याची तयारी करीत असे. परंतु ते काहीही असो. भावी डोळ्यांसमोर दिसो वा ना दिसो, मिल्टन असो, ग्लॅडस्टन असो, अशाक असो वा राणाप्रताप असो. आपण कोण होणार हे आपल्या हाती नाही. परंतु प्रामाणिकपणे आपण सारेजण सारखे प्रयत्न करू या. मग काय जे व्हायचे असेल ते खुशाल होवो. काम करीत राहणे एवढेच आपले काम.
झगडण्यासाठी उत्तरोत्तर उदात्त ध्येये पाहिजेत. यासाठी झगड. त्यासाठी मर. ह्याप्रमाणे दिव्य ध्येये आपणास कोणी दाखविली पाहिजेत किंवा आपण निश्चित केली पाहिजेत. ध्येय इतके उज्ज्वल दिसले पाहिजे, सुंदर दिसले पाहिजे की त्याला मिठी मारावयास सारे विसरून आपण धावत गेले पाहिजे. पाणबुड्या मोत्यांसाठी सागरात नि:शंकपणे बुडी मारील. कृपण धनासाठी वाटेल ते आनंदाने करील. प्रियकर प्रियेसाठी सापाची दोरी करून वर चढेल, भरल्या पुरात वाहत जाणार्या मढ्याला लाकूड समजून पलीकडे जाईल. आपल्या ध्येयाकडे जीव कसा ओढला पाहिजे, सारे जीवन त्याच्याकडे धावून गेले पाहिजे. सर्व इंद्रियांनी ध्येयदेवाला आलिंगन दिले पाहिजे. डोळ्यांनी ध्येय पाहावे, कानांनी ते ऐकावे, पायांनी तिकडे चालावे, हातांनी काम करावे. ध्येयाच्याच ओलाव्याने जगले पाहिजे.