सर्व प्रश्नांचा नीट अभ्यास करू या. मोठमोठे ग्रंथ वाचू या, माहिती मिळवू या, आकडे जमा करू या, उत्कृष्ट ग्रंथालये, संग्रहालये, प्रयोगालये स्थापू या. हीच खरी मंदिरे व देवालये. तेथे ज्ञानपूजा करू या. सत्यशोध करू या. कोणत्याही अडचणीने डगमगून जाता कामा नये, खचून जाता कामा नये. घोडे कोठेही न अडता दौडत गेले पाहिजे. आपल्या मार्गात दुर्दैव संकटे आणून रचीत असते. त्याचा हेतू एवढाच की, त्या संकटांतून तरून जाऊन आपला आत्मविश्वास वाढावा, आपल्या असीम सामर्थ्याची आपणास कल्पना यावी. संकटात सुप्त शक्ती जागृत होते. घर्षणाने अप्रकट व अज्ञात वन्ही प्रकट होतो. येऊ देत संकटे. संकट म्हणजे विकासमाता. वटवृक्षाची मुळे फत्तरांतून, दगडधोंडयांतून वाढीस लागतात, परंतु पुढे त्याचा केवढा विस्तार होतो. तो आपला माथा गगनाला भिडवितो, विश्वाला हातांनी कवटाळतो. चिरंजीव वटवृक्ष! तो हजारोंना छाया देतो व आश्रय देतो. त्याच्या अंगप्रत्यंगांतून शेकडो महान् वृक्ष निर्माण होतात; हा शक्तिसंग्रह त्या दगडधोंडयांतील झगडण्यात त्याला मिळाला. जो संकटात वाढला, त्याची वाढ देवांनी केली; तो देवांचा लाडका झाला. त्याला दिव्यशक्ती मिळाली, तो मर्त्यांत अमर्त्य झाला.

मोठमोठे संग्राम, मोठमोठ्या धडपडी ज्या होत असतात, त्यात सारे सारखेच धडपडत असतात, लढत असतात. कोणीही त्यात दाखल व्हावे व झगडावे. तेथे कुणाला मज्जाव नाही. जो जिंकील त्याला पदक. परंतु ज्याला पदक मिळाले ते त्याचे एकटयाचे नाही. ते सर्वांचेच आहे. सर्वांतर्फे म्हणून ते पदक घेण्यासाठी तो उभा असतो. तो झगडणार्‍या सर्वांचा प्रतिनिधी असतो. व्यक्ती... मग ती स्त्री असो वा पुरुष असो... श्रेष्ठ असो वा कनिष्ठ असो- तिला एकटयाने मोठे होता येत नाही. समुदाय, संघ संस्था यांतूनच एकमेकांस धीर येतो व सारे लढत राहतात, कष्ट करीत राहतात. व्यायामशाळेत व्यायाम करण्यात घरच्यापेक्षा काही निराळेच असते. दुसर्‍याच्या पाचशे बैठका पाहून आपणास हजार माराव्या असे वाटू लागते. परस्परांस परस्परांपासून उत्साह मिळतो. एकाला यश यावे ह्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची जरूरी आहे. जो वर चढतो त्याला आपल्या पाठीमागून वीस येत आहेत या कल्पनेने धीर येतो असतो व त्या पुढे जाण्याने पाठीमागच्या वीसजणांस हुरूप येतो. तटावर ‘हर हर महादेव’ करून चढणार्‍या पहिल्या तुकडीला- पाठीमागून हजारो सैनिक आहेत, ते आपले काम अपुरे राहिले तर पुरे करतील असा आधार असतो. आपल्या पाठीशी ते पाठपुरावा करावयास आहेत, मदत व साहाय्य देण्यास ते वेळ पडताच धावून येतील अशी आशा असते. तसेच आपले ज्ञान; ते सारे केवळ एकटयाचे नसते. हजारोंची ती कमाई असते. आपण दुसर्‍यांपासून मिळवितो व स्वत: त्यात जमले तर भर घालतो. सारे ज्ञान सामुदायिक आहे, यश हे सामुदायिक आहे. एकटयाला सर्व क्षेत्राचे आक्रमण करता येणार नाही. सर्वत्र श्रमविभाग आहे. समाज आपणास वर नेऊन बसवितो. समाजाच्या खांद्यावर आपण उभे असतो व चमकतो. मंदिराचा कळस दुरून चमकतो, परंतु न दिसणारे पायांतील अभंग व मजबूत दगड, भिंतीच्या विटा, यांच्यावर तो उभारलेला आहे. जो आज विजयी म्हणून दिसतो, त्याला अनेकांच्या त्यागाचे साहाय्य मिळाले आहे; त्याच्या विजयाला दुसर्‍या हजारोंच्या विजयांची मदत मिळालेली आहे. एकाची कीर्ती ती सार्‍यांची होते. सीतेची दिव्यता सर्व स्त्रीजातीच्या मालकीची आहे. बुध्दांचा त्याग सर्व मानवजातीला भूषणास्पद आहे. थोर पुरुषांचा अभिमान सार्‍या मानवजातीला वाटत असतो; कारण त्यांच्या यशांत आपण सारेच आपआपल्यापरी भाग घेत असतो.

विचार, विचार, विचार ! निर्मळ विचार व निर्मळ दृष्टी यांची अत्यंत आवश्यकता आहे. संशयातीत अचूक विचार ! असा विचार मिळावयास श्रमांची जरूरी असते; अभ्यासाची जरूरी असते. कोणत्याही ध्येयाला प्राप्त करून घेण्यासाठी, कोणत्याही क्षेत्रात विजय मिळविण्यासाठी दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. स्पष्ट व नि:संदिग्ध विचार व ध्येयाबद्दल अपरंपार प्रेम. ते ध्येय म्हणजे आपल्या जीवनगर्भात वाढलेले जणू बाळ असे आपणास वाटले पाहिजे. त्या ध्येयाला वाढवू, त्याला पुजू. त्या ध्येयासाठी तडफड व तळमळ सारखी असली पाहिजे. ध्येयाचा क्षणभर विसर पडताच गुदमरल्यासारखे झाले पाहिजे. ध्येय म्हणजे प्राण असे झाले पाहिजे. गुरुनानकाने म्हटले आहे, “देवा, तुझे नाव श्वासाच्छवासाप्रमाणे मला होवो.” ध्येयासंबंधी अशीच वृत्ती आपली झाली पाहिजे.

जे राष्ट्र स्वत:च्या परंपरेला पारखे झाले नाही, स्वत:चे चारित्र्य विसरले नाही, जे राष्ट्र स्वत:च्या हृदयाची प्रतारणा करीत नाही, जे राष्ट्र स्वत:शी सत्यनिष्ठ असते, ते राष्ट्र युगधर्म ओळखत, नवीनाची हाक ऐकते, ते राष्ट्र लाखो मोठ्या पुरुषांना जन्म देईल, मग ते मोठे पुरुष जगाला दिसोत वा न दिसोत, त्यांची नावे जगाला कळोत वा न कळोत. डोळ्याला न दिसणारे लाखो तारे आकाशगंगेत आहेत; ते न दिसले तरी आपंल्या ठिकाणी राहून आपला निर्मळ प्रकाश विश्वमंदिरात ओतीतच आहेत. लाखो थोर पुरुष निर्माण होतील यात आश्चर्य नाही; कारण परमात्म्याचे दिव्य वैभव सर्वांमधून अमर्याद उसळत आहे आणि एकाचा मोठेपणा हा सर्वांना मोठे करील.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel