भारतवर्ष नवीन संस्कृती निर्माण करीत आहे, पूर्वीच्या संस्कृतीला उजाळा देत आहे, नवरंग देत आहे. पूर्वीच्या संस्कृतीचा विचार करीत आहे. क्षितिजावर नवीन ध्येये, नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन साधने, नूतन कार्यपध्दती- इत्यादींचा उदय होत आहे. नानाविध रीतीने नवीन नवीन कार्यक्षेत्रांत प्रगती करून घेण्यासाठी भारतवर्ष सज्ज होत आहे. नव्या तरुणाप्रमाणे नवभारत पुढे येत आहे. कात टाकलेल्या सर्पाप्रमाणे भारत पुन्हा सतेज होऊन नवीन जोमाने उडी घ्यावयास उठला आहे. अशा वेळेस आजपर्यंतची स्थिर झालेली जी नीती, ती अस्थिर होण्याचाच एक धोका असतो.
सदैव श्रेष्ठ नीती दाखविणे, श्रेष्ठ नीती पाळावयास सांगणे हाच संस्कृतीचा प्रयत्न असतो. संस्कृतीचे हेच ध्येय असते. प्रचंड क्रांतीचा जेव्हा समय येतो मोठमोठ्या घडामोडी व उलथापालथी जेव्हा होत असतात, सारे राष्ट्र खालपासून वरपर्यंत जेव्हा ढवळले जात असते, अशा वेळेस सर्व जुनी बंधने, सार्या जुन्या संस्था, सारे जुने आचारविचार व रुढी यांना मोडून तोडून फेकून द्यावे अशी प्रवृत्ती साहजिकच बळावत असते. कारण सारे ढवळल्यामुळे सारे गढूळ वर येते, सारी घाण वसकन् वर येते- आणि ही घाणच आहे, हे सारे सडलेले कुजलेले आहे, अशी वर वर पाहणार्याची प्रामाणिक समजूत होते. पाश्चिमात्य संस्कृती हा शब्द आपल्याकडच्या ‘धर्म’ शब्दासारखा आहे. ज्या वेळेस उत्कृष्ट चारित्र्य, निष्कलंक नीती हेच मुख्य सामाजिक किंवा राजकीय ध्येय किंवा साधन राष्ट्राकडून मानले जाईल, त्याच वेळेस राष्ट्राने गतेतिहासाची, गतजीवनाची, भूतकाळातील सार्या प्रयत्नांची व धडपडीची किंमत ओळखली असे समजण्यात येईल. नास्तिक व अश्रध्दावान् मनुष्याची योग्य ती किंमत करून समाज ज्या वेळेस त्याला ढकलून देतो, आणि सत्यं शिवं सुंदराकडे हृदय उचंबळून घेऊन जातो, असत्याला दूर करून सत्याचीच पूजा करावयास जेव्हा तो अधीर होतो..... तेव्हा मागील सारा भूतकाळ मातीत न जाता सार्थकीच लागला असे आपण समजू.
आमच्या राष्ट्रीय जीवनात आम्ही सदासर्वदा सत्याचीच पूजा केली, जे थोर आहे, उदात्त आहे त्याचीच कास धरली- असे कोणत्याही राष्ट्राला छातीवर हात ठेवून सांगता येणार नाही. निरनिराळ्या राष्ट्रांची सत्यपूजेत जणू स्पर्धा व शर्यत लागून राहिली आहे. थोड्याथोड्या प्रमाणात कधी याला, तर कधी त्याला यश मिळत आहे. कधी हा देश थोर ध्येयाची पूजा करताना दिसतो, तर कधी तो दिसतो. पूर्णता कोणीच गाठली नाही. अखंड सत्यपूजन कोणीच चालविले नाही. यश हे नेहमी सापेक्ष आहे. राष्ट्राचा दर्जा बाह्य वैभवावरून न ठरविता शेवटी त्या त्या राष्ट्राच्या सामाजिक, राजकीय वगैरे एकंदर राष्ट्रीय कारभारात दिसून येणार्या नीतीवरच तो ठरविला पाहिजे. संपत्ती, उद्योगधंदे, कारखाने किंवा सुखे ह्यांवरून राष्ट्राची श्रेष्ठता अजमावयाची नाही. राष्ट्राने नैतिक श्रेष्ठता, ध्येयोदात्तता दाखविली पाहिजे. नैतिक तृषा राष्ट्राला सदैव लागलेली असली पाहिजे.
‘सामाजिक चालीरीती’ एवढाच अर्थ नीतीचा नाही. एखादी जुनीपुराणी रुढी आपण जिवंत ठेवली, पुष्कळ काळ उराशी बाळगली, एवढ्यावरून आपण श्रेष्ठ नीतीचे, श्रेष्ठ सामर्थ्याचे असे ठरत नाही. रुढी चालू ठेवण्यात सामर्थ्य असेल, अथवा दुर्बलताही असेल. रुढी शौर्याने चालू ठेवण्यात सामर्थ्य असेल, अथवा दुर्बताहि असेल. रुढी शौर्याने चालू ठेवण्यात अथवा भीरूतेमुळेही चालू ठेवली असेल, पावित्र्य, चारित्र्य, त्याग व सर्व विरोधांचे पाणी पाणी करून टाकणारी दृढ इच्छाशक्ती या चार सद्गुणांनी खरी नीती तयार होते. राष्ट्राने खरोखर काय कमाई केली ती या सद्गुण चतु:सूत्रीवरून ठरवावी; केवळ बाह्य लखलखाटावरून व दिमाखावरून ती ठरवू नये.