ध्येयाशी अशी एकरूप होण्याची शक्ती हृदयाजवळ असते. ज्याला हृदय आहे, त्याला ओलावा आहे; व ज्याला ओलावा आहे, तो दुसर्यात मिळू शकतो. दगड दगडात कधी मिळणार नाही. परंतु दोन दगडांच्या मध्ये ते सिमेंट ठेवा, ते दगड भक्कमपणे जोडले जातील. ओलावा हा जोडणारा आहे. ज्याला हृदय आहे तो मुलासारखा आहे. आणि मुलासारखा असल्यामुळे तो देवाच्या राज्यात जाऊ शकतो. आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा थोर ध्येये, महनीय वस्तू या जगात आहेत, ह्याबद्दल कधीही त्याला शंका येत नाही. असा सहृदय मनुष्य मोठ्या ध्येयासाठी झिजतो. श्रमतो, त्याग करतो. मग व्यवहारी लोक, केवळ सांसारिक लोक त्याला काहीही म्हणोत. तो तिकडे लक्ष देत नाही. तो आपल्या हृदयाची हाक ऐकतो, हृदयाचा सूर ओळखतो व जातो. ज्यांची हृदये निगरगट्ट झालेली असतात, त्यांना तो मूर्खपणा वाटतो. परंतु तो मनुष्य ध्येयाच्या आनंदात असतो. जे प्रचंड मंदिर बांधिले जात आहे त्यातील मी एक दगड आहे. जी भव्य भगीरथी भगीरथप्रयासाने महापुरुष आणू पाहत आहेत, तिच्यातील मी एक बिंदू आहे. असे जाणून तो समाधान मानतो. असा श्रध्दावान् त्यागी पुरुष एक का असेना, जेथे जन्माला येतो, तेथे त्याच्या पाठोपाठ दुसरे हजारो जन्मणारच. राम येताच लक्ष्मण येतो, हनुमान येतो. अंगद येतो, बिभीषण येतो-हजारो सेतू बांधणारे व झुंझवणारे वानर येतात. ज्या ईश्वराच्या इच्छेच्या सिध्दीसाठी एक त्यागी पुरुष जन्मला, ती इच्छा आणखी अनेकांना जन्माला घातल्याशिवाय कशी राहील ?
गुरु व शिष्य यांच्यात जो अ-विना-भाव असतो, ऐक्यभाव-अद्वैतभाव असतो, तोच नेता व अनुयायी यांच्यात असला पाहिजे. सद्गुरूला सर्वत्र चिन्मयाचे एकछत्री साम्राज्य झळकताना दिसते. शिष्यालाही ती तहान लागते. तो धडपडतो व विविधतेला जिंकून एकतेचा अनुभव मिळवितो. गुरु व शिष्य एकच आहेत. जगदुध्दारक सद्गुरूइतकाच तरून गेलेला लहानसा जीवही शुध्द आहे. हिंदुधर्मातील तार्यामध्ये तेज कमी-अधिक असेल, परंतु पावित्र्य समानच आहे. विवेकानंद हे हिंदुधर्मातील मोक्षाचे अत्यंत उत्कट असे प्रकट रूप असतील, तर त्याच मोक्षाच्या दुसर्या टोकाला रस्त्यात प्रामाणिकपणे काम करणारा मजूरही असेल. एका टोकाला विवेकानंद, दुसर्या टोकाला भंगी. एकाच मोक्षाची दोन्ही टोके. दोन्ही एकच. दोघांची दृष्टी एकच. आस्था व श्रध्देच्या सूत्राने ते एकत्र जोडले गेले. दोघांमध्ये कळकळ आहे. हातात घेतलेल्या त्या त्या कामात तन्मय होण्याची जी बलवृत्ती ती दोघांत आहे व म्हणून दोघे देवाच्या राज्यात जाणार.