पुष्कळवेळा माणसाने पडद्याआड जाणे, कर्मक्षेत्रांतून अंतर्धान पावणे- अशानेच तो आपल्या ध्येयाची जास्त सेवा करू शकतो. आपले संदेश सांगून झाला, मंत्र सांगून झाला की, महात्म्यांनी महायात्रेस निघून जाण्याची काळजी घ्यावी. विजेने क्षणभर चमकावे व पुन्हा मेघोदरात विलीन व्हावे. अनंतसागरातून महापुरुषांची लाट वर यावी, क्षणभर उंच व्हावे व तिने विलीन होऊन जावे. आपण ज्याला नवीन विचार दिला, त्याला त्याचा साक्षात्कार एकटे असताना घेता येतो. विद्यार्थी गुरुजवळून एखादी नवीन गोष्ट शिकतो व एकटा असताना प्रयोगालयात प्रयोग करून त्याचा तो अनुभव घेतो. त्या वेळेस जर जवळ गुरू असेल तर त्याला मोकळेपणा वाटत नाही, तो जरा भांबावतो. गुरूने जे दिले, ते गुरूच्या गैरहजेरीत वाढते व फोफावते. बी रुजत घालतो व तेथे भूगर्भात त्याला एकटयालाच वाढू देतो. जर क्षणोक्षणी त्याच्याजवळ आपण जाऊ तर त्या बीजातून कधीच अंकुर वर येणार नाही. बीजाला पेरून तुम्ही दूर व्हा. विकास ही फार गूढ वस्तू आहे. विकासाचे नियम सांगता येत नाही. कारण विकास अंधारात, एकांतात होत असतो. आपण नेहमी आपल्याहून मोठ्या वस्तूस जन्म देऊ इच्छित असतो. दशरथाला रामाचा जन्म देण्याची इच्छा असते. परंतु आपण असे महाप्रसू व्हावे म्हणून फळाकडे व परिणामाकडे आपले डोळे कधी न जाणे ही गोष्ट आवश्यक आहे, मी दिलेल्या विचारांचे कसे होईल, तो वाढेल की नाही याची नका काळजी करू. ते विचारबीज द्या व निघून जा. द्या आणि मरा; सांगा व जा; दुसर्याला स्वातंत्र्य द्या. कर्म करा. माझ्या क्रांतीचा मार्ग तयार होत असतो. मोठ्या वृक्षाच्या छायेत त्याची पडलेली बीजे वाढणार नाहीत त्या मोठ्या वृक्षाने नाहीसे व्हावे की, तेथे शेकडो वृक्ष त्याच्या जातीचे वर माना करतील व वाढू लागतील. तुमच्या मरणानेच तुम्ही हजारोंना जन्म द्याल- तुमचा विचार सहस्त्र हृदयांत वाढेल.
उंच ताडावर चढून तेथून किती जण खाली बेशेक उडी घेऊ शकतील ? सत्यावर श्रध्दा असल्यामुळे ज्यांना उडी मारणे शक्य असेल तेच भविष्यकाळचे भाग्यविधाते आहेत. तेच उद्याचे स्वामी आहेत. कारण यांच्यामधूनच अदृश्य व अव्यक्त परमात्मा भरपूर प्रकट होत असतो. ख्रिस्ती धर्मात पुढील प्रार्थना आहे.
मी कोणी नाही. प्रभूने भरावे म्हणून मी रिता आहे; त्याने नीट करावे म्हणून त्याच्या चरणांजवळ मी फुटके भांडे पडलो आहे. त्याने भरताच मी पुन्हा सेवेला धावेन व पुन्हा रिता होऊन येईन. त्याने भरलेला जीवनरस जगाला संपूर्णपणे मिळावा, माझ्यातील सारे जगाला मिळावे म्हणून मी फुटत आहे, मी कोणी नाही; सारा तो तो.”
दादू पिंजारी तेच म्हणाला, “तूंहि तूंहि तुमही” देवा ! तूं तूं तूं.