श्रेष्ठ वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी हलक्या वस्तूचा त्याग करावयाचा; तुच्छ वस्तू सोडून उच्च वस्तूंचा स्वीकार करावयाचा, म्हणजे संन्यास होय. पावित्र्य म्हणजे चिर यज्ञ. उत्तरोत्तर अधिक पवित्र होण्यासाठी अधिकाधिक त्याग आपण करीत असतो, नीच वस्तूसाठी उच्च वस्तूचा त्याग करणे याला संन्यास म्हणत नाहीत. कठीण करण्यासाठी सोपे सोडावयाचे; वरती चढण्यासाठी खालचे टाकावयाचे; उथळ व वरपांगी सोडून गंभीर व गगनाला मिठी मारावयाची; मिळमिळीत सोडून उत्कट, भव्य घ्यावयाचे. याला संन्यास म्हणतात. संन्यास म्हणजे नवीन जबाबदारी घेणे; संन्यास विश्रांतिसुखाच्या वार्ता न करता नवीन कर्तव्य आणून देतो.

पोरांनी ढेकळे मारमारून हीनदीन होऊन गेलेल्या सर्पाची जी अद्भुतरम्य गोष्ट श्रीरामकृष्ण सांगत असत, त्या गोष्टींतील सर्पाला जो उपदेश केलेला आहे, त्या उपदेशाच्या एका वाक्यात धीरोदात्तता व स्वाभिमान म्हणजे काय, सामर्थ्य व संयम म्हणजे काय, हे सुंदरपणे सांगण्यात आले आहे. “फणा वर कर, फुत्कार कर, परंतु दंश करू नको.”  आपल्या जीवनात पदोपदी असे प्रसंग येत असतात की, ज्या वेळेस हेच वर्तन आपण करावयास पाहिजे असते. पुष्कळ लोक आपणाजवळ चांगले वागतात; त्यांचे व आपले संबंध सलोख्याचे असतात, याचे कारण हे की, त्या लोकांना पूर्णपणे जाणीव असते की, जर का आपण नीट वागलो नाही, समजुतीने घेतले नाही, जर का आपण योग्य मर्यादेचे अतिक्रमण करून अरेरावी करू, तर मग कठीण प्रसंग आहे. तर मग काही सुटका नाही. साप फणा उभारील याची त्यांना भीती असते व म्हणून ते जपून गुण्यागोविंदाने वागतात. फणा उभारणे म्हणजे सात्त्विक दिव्य संताप प्रकट करणे होय. तो क्रोध अपवित्र नसून पवित्रच असतो.

क्रोधो हि निर्मलधियां रमणीव एव ।

उठल्या-बसल्या फणा वर करावयाची नसते. जरा काही खुट्ट झाले की केली फणा वर असे करण्यात स्वारस्य नाही. महत्त्व नाही. सर्पामध्ये जातिवंद नागांमध्ये- संतापही विकास पावलेला असतो; क्रोधाचीही नीट वाढ झालेली असते. सर्प आपला संताप मर्यादेत व संयमात राखतो. शेवटचा क्षण येईपर्यंत तो सहन करतो. स्वत:च्या सामर्थ्याचा विश्वास असल्यामुळे तो उतावीळ होत नाही. ‘प्रसंग पडेल तेव्हाच जगातील अत्यंत प्रखर व अजिंक्य शस्त्र धारण कर,’ अशी स्वत:च्या शक्तीला, स्वत:च्या सामर्थ्याला त्याने शिकवण दिलेली असते. योग्य क्षण येईपर्यंत स्वत:च्या शस्त्राला, स्वत:च्या शक्तीला, स्वत:च्या संतापाला तो संयमात राखतो आणि एकदा का संयम दूर झाला की भात्यांतून बाण सणसण करीत निघालाच, मग दयामाया नाही. तो बाण आपले काम पूर्ण करावयाचाच. भोळा सांब आधी संतापत नाही; परंतु संतापला म्हणजे तो रुद्र होतो व त्रिभुवनाचे भस्म करतो. नागामध्ये ही जी निश्चयाची व संयमाची शक्ती आहे, त्यामुळेच तो फार भयंकर झाला आहे, अजिंक्य झाला आहे. जग त्याला भिते, वचकते. मूर्खांनी व भित्र्यांनी फणा वर करण्याचे बोलू नये. कारण दुर्बळाच्या, त्याचप्रमाणे अनिश्चयी, अनिग्रही अशा लहरी माणसाच्या संतापाचे उलट हसे मात्र होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel