“भारताला ऐक्याचा संदेश जगाला द्यावयाचा आहे. भेदभागांत अभेद पाहावयास शिका, हें भारत सांगत आहे. भारतांतच अद्वैत तत्त्वज्ञान का निर्माण झाले? तत्त्वज्ञानें परिस्थितींतूनच जन्मास येत असतात. जरुरी-जरूरीमुळेंच अध्यात्मिक शास्त्रांतहि शोध लागत असतात. या भारतवर्षांच्या भाग्यानें हजारों मानवप्रवाह येथे येतील. त्यांच्यांत संगीत निर्माण व्हावयास अद्वैताची जरूर होती. म्हणूनच तो महान् विचार येथे निर्माण झाला.
“बंधूंनी! हृदये हृदयास मिळावयास पाहिजे असतील तर परस्परांच्या संस्कृतींतील जें जें सत्य, शिव व सुंदर असेल त्यांचा अभ्यास करावयास हवा. आपण पाश्चिमात्य ग्रंथ वाचतों. त्यांच्या काव्यातील वचनें पाठ म्हणतों. परंतु हिंदु कुराणांतील वचन व्या्यानांत सांगणार नाही, किंवा मुसलमान गीतेंतील श्लोक म्हणणार नाही. परस्परांच्या संस्कृतीतील ही देवाण घेवाण आपण अकबराच्या कारकीर्दीत करावयास लागलों होतों. परंतु ती गोष्ट आपण विसरलों. प्रत्यक्ष व्यवहारहि सुंदर व मधुर करावयास आपण शिकत होतो. ईदच्या प्रार्थनेच्या वेळेस ‘हिंदुमुसलमान यांना सांभाळ,’ असें मुसलमान म्हणतो. आधीं हिंदूचे नांव तो घेतो. मुसलमानी राजांनी हिंदु देवस्थानांना व हिंदू राजांनी मुसलमानी पीरांना व दर्ग्यांना देणग्या दिलेल्या आहेत. आपण या विशाल भारताची पूजा करावयास शिकत होतो. तें भव्य, दिव्य कर्म पुन्हा नव्याने सुरू करू या.
“सूर्यफूलाची अधी गंमत सांगतात की जिकडे जिकडे सूर्य वळेल, तिकडे तिकडे तें तोंड करतें. आपली मनें अशीच झाली पाहिजेत. जेथून जेथून प्रकाश मिळेल, तेथून तेथून तो घेऊन आपण आपला विकास करून घेतला पाहिजे. एकमेकांचे वाईट पाहाणें हे मानवांचा शोभत नाहीं. गिधाडाची दृष्टी सडलेल्या मांसखंडावर असते, त्याप्रमाणे आपण होतां काम नये. सुफी कवीनीं म्हटलें आहे, ‘ अरे, तुझ्या मशिदीचा दगड भंगला तरी चालेल, परंतु दुस-याच्या दिलाची मशीद नको फोडूं.’ आमच्या संतांनीहि सांगितले आहे कीं,
‘कोणाहि जीवाचा न घडो मत्सर | कर्म सर्वेश्वर पूजनाचें ||’
दोन्ही धर्मांतील संतांनी एकच प्रेमाचा व शांतीचा संदेश दिला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ काय ? इस्लाम म्हणजे शांति ! आणि हिंदूंच्या प्रत्येक मंत्राच्या शेवटी ‘अँ शांति: शांति: शांति:’ असेंच म्हटलेलं असतें. ज्या धर्मांचा अवतार शांतीसाठी आहे, त्या धर्मांनी आग लावीत सुटणें हे योग्य नाहीं.
“या हिंदुस्थानचा इतिहास हिंदुमुसलमानांनी बनविला आहे. अशोक व अकबर, प्रताप व शीरशहा, अहिल्याबाई व चांदबिबी, कबीर व चैतन्य सर्वांनी ही इमारत रचीत आणिली आहे. आग-याचा ताजमहाल व अजिठ्याची लेणीं यांनी या संस्कृतीत भर घातली आहे. इस्लामी गुलाब व आर्यांचे पवित्र कमळ, दोन्ही एकेठिकाणी आली आहेत. एकमेकांस नांवे न ठेवता पुढे जाऊ या. एकमेकांवर बहिष्कार न घालतां सहकार्य करा, सख्य जोडा. मुसलमानांची आतां येथेच घरेंदारे, येथेच शेतीवाडी, येथेंच पूर्वजांची कबरस्थाने. हा भारतवर्ष त्यांना आपलासा वाटला पाहिजे. भारतीय भवितव्यतेशीं त्यांनी लग्न लाविलें पाहिजे. हिंदूनींहि त्यांना जवळ करावें. मुसलमान सारे वाईट असा मंत्र जपत बसू नये. आपलें तत्त्वज्ञान निराळा मार्ग सांगत आहे. ‘अस ब्रह्मास्मि व तत्त्वमिसि’ हा आपला मार्ग आहे. मी राम, राम. मी राम व तूं राम. आपण सारीं देवाची लेंकरे. आपण दैवी आहोंत, दानवी नाही. हा मंत्र आपणांस जपावयाचा आहे. शिक्षणशास्त्रज्ञ म्हणतात, ‘मुलांना दगड म्हटलेंत तर तो खरोखरच दगड होईल.’ त्याप्रमाणेंच आपण मुसलमानांस ते वाईट आहोत वाईट आहेत, असें सारखे म्हटलें, तर ते वाईट नसले तरी वाईट होतील. जो वाईट असेल त्याचेंहि लक्ष त्याच्यामधील दिव्यतेवर, त्याच्यामधील संदेशावर आपण खिळविले पाहिजे. या उपनिषत् प्रणीत शास्त्रशुद्ध सनातन मार्गानेंच एकमेकांस श्रद्धेनें सुंदर करीत आपण पुढें गेलें पाहिजे.